अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली आहे. सगळीकडेच उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळतय. या दिवाळीमध्ये येणारा एक दिवस म्हणजे ‘नरक चतुर्दशी’. अश्विन कृष्ण चतुर्दशीला ‘नरक चतुर्दशी’असं म्हणतात. या दिवशी दिवाळीची पहिली अंघोळ अर्थात अभ्यंग स्नान केलं जाते. विधिवत पूजा करुन कारेटे चिरडण्याचा यादिवशी प्रघात आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की नरक चतुर्दशीलाच कारेटे का चिरडतात? जाणून घेऊयात यामागील कारणांविषयी.
प्राग्ज्योतिषपूर नगरीचा एक राजा होता ज्याचं नाव नरकासूर. त्याला भूदेवीकडून वैष्णवास्त्र प्राप्त झालं होतं. त्यामुळे तो फार बलाढ्य झाला होता. आणि देवीदेवतांना फार त्रास देऊ लागला. त्याने इंद्राचा ऐरावत हत्ती आणि घोडाही हरण केला. काहींना तुरुंगात डांबले, त्यांची संपत्ती लुटली. त्याच्या या अत्याचाराला सगळे देवीदेवता त्रासून गेले होते. मग इंद्राने कृष्णाला आपल्या मदतीसाठी येण्याची विनंती केली. कृष्णाने या विनंतीचा मान ठेवत नरकासुराचा अंत करण्याचे आव्हान स्वीकारलं होतं.
कृष्णाने गरुडावर स्वार होत प्राग्ज्योतिषपूरावर स्वारी केली. नरकासुराचे त्याने दोन तुकडे केले. व बंदिखान्यातील देवीदेवतांनाही सोडवले. या कैदेत पृथ्वीवरील अनेक राजांच्या एकूण सोळा हजार कन्यांनाही डांबण्यात आले होते. नरकासुराच्या कैदेतील या कन्यांना त्यांचे नातेवाईक स्विकारण्यास तयार नाहीत हे पाहून कृष्णाने त्या सर्व कन्यांशी विवाह केला. मरत असताना नरकासुराने कृष्णाकडे आशीर्वाद मागितला की ‘माझा मृत्यूदिन सर्वत्र दिवे लावून साजरा केला जावा आणि यादिवशी जो मंगल स्नान करेल त्याला नरक भोगावा लागू नये.” कृष्णाने यावर “तथास्तु” म्हटले. तेव्हापासून श्रीकृष्णाचा विजयोत्सव आणि नरकासुराचा वध हा दिवे लावून साजरा केला जातो.
कशी साजरी करतात नरक चतुर्दशी ?
सर्व लोक यादिवशी उठून स्नान करतात आणि कारेटे डाव्या पायाच्या अंगठ्याने चिरडतात. याला नरकासुराला मारण्याचे प्रतीक समजले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्रातील काही ठिकाणी शेणाची राक्षसी आकृती काढली जाते. आणि त्यावर घरामधील सर्व केरकचरा ओतला जातो. त्या ढिगावर रुपया, दोन रुपये पैसे ठेवले जातात. तर काही ठिकाणी त्याचा रस जिभेला लावण्याचीही पद्धत आहे.