Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीफटाके महागल्याने आतषबाजीवर येणार मर्यादा!

फटाके महागल्याने आतषबाजीवर येणार मर्यादा!

खरेदीसाठी बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या

मुंबई : दिवाळीच्या आनंदोत्सवात आकाश उजळून टाकणाऱ्या आतषबाजीला यंदा महागाईची झळ बसली आहे. विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किमतीत १० ते ४० टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. दिवाळीसाठीची लगबग सुरू झाली असून खरेदीसाठी बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या आहेत. नागरिकांमधील उत्साह लक्षात घेता फटाक्यांच्या विक्रीतून उलाढाल होण्याची शक्यता आहे; मात्र फटाका व्यवसायाला दरवाढीचे ग्रहण लागले आहे. तरीदेखील ग्राहकांचा फटाके खरेदीला उत्साह आहे.

सुतळी बॉम्ब, बुलेट बॉम्ब, पोपट, लवंगी अशा आवाजांच्या फटाक्यांचे दर पाच ते १५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. फुलबाजी, पाऊस, चक्री, रॉकेट या प्रकारच्या फटाक्यांच्या नामांकित व इतर कंपन्यांच्या किमतीत १५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सर्वाधिक २० ते ४० टक्के दरवाढ आकाशात उडणाऱ्या फटक्यांची झाली आहे. एकूण सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या दरवाढीत सरासरी २० टक्के वाढ झाली आहे.

वाडा येथील फटाका मार्केट पालघरसह ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या भागात प्रसिद्ध असून चांगल्या प्रतीचे आणि स्वस्त मिळणारे फटाके यासाठी वाडा प्रसिद्ध आहे. म्हणून या वाडा फटाके मार्केटमध्ये ठाणे, मुंबई, नवी मुंबई या शहरांमधूनही ग्राहक फटाके खरेदी करण्यासाठी येत आहेत.

दिवाळीच्या उत्साहात फटाके फोडताना ते ब्रँडेड आहेत का? याची पडताळणी करून फटाके विकत घ्यावेत, असे आवाहन फटाकेविक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. ब्रँडेड फटाके हे सरकारच्या नियमांनुसार कच्चा माल आणि दारूगोळा वापरून तयार केले जात असतात. यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचण्याचा धोका कमी होतो, असे फटाके विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे, तसेच लहान मुलांमध्ये फटाके फोडण्याची उत्सुकता अधिक असते. या वेळी फटाके हाताळताना लहान मुलांच्या आरोग्याला कोणताही धोका पोहोचू नये म्हणूनदेखील योग्य प्रकारे तयार करण्यात आलेल्या फटाक्यांचीच खरेदी करावी, असे आवाहन फटाकेविक्रेत्यांकडून केले जात आहे.

पर्यावरणाला हानी पोहोचू नये म्हणून गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक फटाक्यांचा ट्रेंड बाजारात आलेला पाहायला मिळतो. बाजारात सध्या कमी धूर उत्सर्जित करणारे फटाके उपलब्ध आहेत. त्याचसोबत मोठ्या आवाजापेक्षा कमी आवाजातील आणि विविध रंगांच्या छटा उडवणारे फटाके लहानांपासून मोठ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहेत. नागरिक पर्यावरणपूरक फटाके घेण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -