‘कद्रु ‘ वृत्तीच्या माणसांमुळेच नारायण राणेंसारखे ‘मास लिडर ‘ सेनेपासून दूर : एकनाथ शिंदे
कुडाळ : कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणात त्या काळात शिवसेना वाढविण्यात नारायण राणे (Narayan Rane) यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्यासारख्या हजारो शिवसैनिकांच्या रक्तातून ही शिवसेना उभी राहिली. मात्र, बाळासाहेबांचे व शिवसेनेचे विचार ज्यांनी खुर्चीसाठी सोडले, बाळासाहेबांच्या विचारांची ज्यांनी बेईमानी केली, बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करणाऱ्यांना ज्यांनी साथ दिली, कोकणच्या विकासात खोडा घातला, त्यांना चारीमुंड्या चित करण्यासाठी व कुडाळ मालवण मतदारसंघाचा थांबलेला विकास पुन्हा मार्गी लावण्यासाठी निलेश राणे (Nilesh Rane) यांनी धनुष्यबाण उचलण्याचा निर्णय घेतला आहे. राणेसाहेबांनी जिथून सुरुवात केली, तिथेच निलेश राणे आले असून एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. धनुष्यबाण कोकणच्या सुपुत्राच्या हातीच शोभून दिसते आणि निलेश राणे आपल्या कर्तुत्वाने ते सिद्ध करतील, हा मला विश्वास आहे. ज्याप्रमाणे नारायण राणे व नितेश राणेवर प्रेम केलेत तसेच प्रेम व विश्वास निलेश राणे यांच्यावर दाखवा, हा एकनाथ निलेश राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.
कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत भगवा ध्वज आणि धनुष्यबाण हाती देत, भगवा शेला अंगावर घालून निलेश राणे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत विजयाचा विश्वास व्यक्त करताना प्रचाराचा नारळ दमदार फुटलाय, आता विजयाची सभाही घेऊ असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासारख्या शिवसैनिकांमुळे शिवसेना उभी राहिली. त्यांच्यासारख्या शिवसैनिकांनी अनेक प्रसंगात सामोरे जाऊन शिवसेना वाचवली. स्वतःच्या कर्तुत्वाने त्यांनी केलेला शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री हा प्रवास आम्ही जवळून पाहिला आहे. मात्र, ज्यांचा स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास नसतो त्यांना स्वकर्तुत्वावर मोठे झालेले राणेसाहेबांसारखे ‘ मास लिडर ‘ चालत नाहीत. त्यामुळेच त्यांना दूर घालवले जाते. खरं तर शिवसेनेत फाटा फूट झाली नसती तर शिवसेनेला आव्हान द्यायला कोणीही उभा राहिला नसता. पण ज्यांना स्वतःला मोठे व्हायचे आहे अशा ‘ कद्रु ‘ वृत्तीच्या माणसांमुळेच राणेसाहेबांसारखे, आमच्यासारखे माणूस दूर गेले, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
दोन्ही ‘राणे बंधु ‘ विधानसभेत असणारचं : उदय सामंत
कोकणात खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आणली ती माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे यांनीच. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे दोन्ही सुपुत्र निलेश व नितेश राणे यांनी विकासाचा हा वारु उधळत ठेवला आहे. राणे साहेबांनी जे काम केलं ते पाहता निलेश व नितेश यांची जबाबदारी ही सिंधुदुर्गवासियांची आहे व ते ती नक्कीच पार पाडतील आणि दोन्ही राणे बंधु आगामी विधानसभेत निवडून जातील, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. कुडाळ येथील विराट जाहिर सभेला संबोधित करताना त्यांनी महायुतीच्या विजयाचा एल्गार केला.
निलेश राणे कुडाळ मालवणचे फिक्स आमदार
कुडाळ मालवणचे पुढील पाच वर्षाचे भवितव्य निलेश राणे यांच्याच हाती असेल. कुडाळ मालवणचे फिक्स आमदार निलेश राणेच. प्रगतशील विकासशील कुडाळ मालवणसाठी आमदार म्हणून निलेश राणे यांच्या हाती नेतृत्व असेल, असे कौतुकोद्गार आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केले.
राणे साहेबांनी हा मतदारसंघ उंचीवर नेला. त्यांचा सर्व ठिकाणी दरारा होता. हे २०१४ पूर्वीचे दिवस विकासाचे होते. मात्र त्यानंतर येथील आमदार अपघाताने झाला. विकास ठप्प झाला. मागील दहा वर्षे पहा या भागातील आमदार यांनी काहीच केले नाही. या आमदाराने काय केले असेल तर खुल्या व्यासपीठावर या आणि सांगा, हिम्मत आहे? मी सत्तेत नसताना दुप्पट निधी आणला. ते सत्तेत असताना आणू शकले नाही. मंत्री दीपक केसरकर यांनी मतदार संघात गतिमान विकास केला. तसाच विकास निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण कुडाळ मतदार संघात होईल, असेही नितेश राणे म्हणाले.
कुडाळ मालवण मतदारसंघाचा बॅकलॉग निलेश राणे नक्कीच भरून काढतील : नारायण राणे
मुंबई व महाराष्ट्रात शिवसेना वाढली ती केवळ नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्या सारख्या हजारो शिवसैनिकांमुळेच. आम्ही शिवसेनेसाठी रक्ताचे पाणी केले. प्रसंगी स्वतःचे रक्तही सांडले. तेव्हा कुटुंबाची पर्वा केली नाही. त्यामुळेच शिवसेना वाढली व सत्तेतही आली. साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला मुख्यमंत्री केले. त्यानंतर त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. आज त्याच शिवसेनेत निलेश राणे प्रवेश करीत असून कुडाळ मालवण मतदार संघाचा बॅकलॉग ते नक्कीच भरून काढतील, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला.
निलेश राणे यांचे कर्तुत्व आहे. लोकहिताची लोक कल्याणकारी काम ते नेहमीच करीत आले आहेत. आमदार नितेश राणे यांनी देखील दहा वर्षात कणकवली वैभववाडी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणून समृद्धी आणली आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघाचा मी आमदार होतो त्या मतदार संघाला पुन्हा एकदा नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी तसेच येथील जनजीवन समृद्ध होण्यासाठी निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून देणे हे आपले कर्तव्य आहे व तुम्ही ते नक्कीच कराल हा माझा विश्वास आहे असे त्यांनी यावेळी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी माणसे महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस काम करतात. तर दुसरीकडे अडीच वर्षात केवळ २ वेळा मंत्रालयात जाणारा मुख्यमंत्री देखील या राज्याने पाहिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर अर्थ हा विषय माझा नाही असे सांगणारा मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे दुर्दैवं आहे. असा माणूस यापुढे कधीही मुख्यमंत्री होणार नाही, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.