– डॉ. सुकृत खांडेकर
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविण्यावरून सर्वच राजकीय पक्षांत संघर्षाला उधाण आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होणार, याची सर्वच पक्षांना जाणीव आहे. विधानसभेत जाण्यासाठी पुढील पाच वर्षे थांबण्याची कोणाची तयारी नाही हे त्यामागचे खरे कारण आहे. बड्या नेत्यांचे सगेसोयरे, कुटुंबीय यांना उमेदवारी दिली जाते म्हणून नाराजी असली तरी त्या कुटुंबाची ताकद मोडून काढणे सोपे नाही हे वरिष्ठांना चांगले ठाऊक आहे. सत्ता मिळविण्यासाठी पक्षाला प्रत्येक आमदाराची गरज आहे. म्हणूनच निवडून येण्याची क्षमता असलेल्या इच्छुकालाच उमेदवारी देण्यात येत आहे. मॅन पॉवर, मनी पॉवर नि मसल पॉवर ज्याकडे हे तीन एम आहेत, त्याला पक्षाची उमेदवारी निश्चित मानली जाते. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला मोठा फटका बसला. भाजपा विरोधात मतदान झाले. विधानसभा निवडणुकीत पुन्हा महाआघाडीला यश मिळेल असे सर्वत्र वातावरण बनले. पण हरियाणा विधानसभेचे निकाल आले आणि राज्यात भाजपाला पुन्हा ऊर्जा मिळाली. हरियाणात काँग्रेस सत्तेवर येणार अशी सर्व सर्व्हेंची आकडेवारी सांगत असताना तेथील मतदारांनी पुन्हा भाजपाला सत्तेवर निवडून दिले. हरियाणात भाजपाने विजयाची हॅटट्रीक संपादन केली. लोकसभेत भाजपाला बहुमतापासून मतदारांनी दूर ठेवले तरी भाजपाची लोकप्रियता कमी झालेली नाही, हे हरियाणाच्या मतदारांनी दाखवून दिले.
हरियाणाच्या निकालाने महाआघाडीच्या नेत्यांना महाराष्ट्रात जमिनीवर आणण्याचे काम केले. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नेमके काय होणार हे नामांकित ज्योतिषांना सांगणेही कठीण झाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय स्थिरता असेल काय हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. केंद्रात आपले सरकार आहे म्हणून निकालानंतर आपण कशाही सोंगट्या फिरवू शकतो असे आता भाजपाला करता येणार नाही. सन २०१९ ते २०२४ या पाच वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी अक्षरश: धुडगूस घातला. पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री या राज्याने बघितले. देवेंद्र फडणवीसांचे ८० तासांचे सरकार, नंतर उद्धव ठाकरे यांचे अडीच वर्षांचे आघाडी सरकार व त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे महायुतीचे सरकार या जनतेने अनुभवले आहे. विशेष म्हणजे कोणीही मुख्यमंत्री असले तरी अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री कायम आहेत, हा चमत्कारही याच पाच वर्षांत बघायला मिळाला. सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहावे लागले, याची खदखद भाजपामधील त्यांच्या समर्थकांनी अनेकदा बोलून दाखवली. आता देवाभाऊंना भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या समर्थकांनी काही ठिकाणी फलकांवरही झळकवले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने महाआघाडीला झुकते माप दिले हाच भाजपाचा नि महायुतीचा मोठा पराभव होता. ४८ पैकी केवळ १७ मतदारसंघांत महायुतीचे खासदार निवडून आले ही भाजपा-शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यावर मोठी नामुष्की होती. भाजपाच्या खासदारांची संख्या २१ वरून ९ वर घसरली म्हणून पक्षाने कोणाला जबाबदार धरले नाही याचेच मोठे आश्चर्य वाटते.
राज्यात व केंद्रात सत्ता असून आणि उद्धव ठाकरे व शरद पवारांचे पक्ष फोडूनही भाजपाला लाभ मिळवता आला नाही. उलट सत्तेसाठी झालेली तोडफोड मतदारांना पसंत पडली नाही, हाच लोकसभा निकालाचा संदेश होता. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यानी कंबर कसली आहे, भाजपाला निवडणुकीत धडा शिकविण्याची ते भाषा बोलत आहेत. विशेष म्हणजे आंदोलकांचे नेते शरद पवार, एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार या दिग्गज मराठा नेत्यांवर एका शब्दाने टीका करीत नाहीत. त्यांचे निवडणुकीतील टार्गेट हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे उमेदवार आहेत. मराठा समाजाला शिंदे सरकारने दहा टक्के आरक्षण देऊनही आंदोलक नेत्यांचे समाधान झालेले नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे, हा हट्ट त्यांचा कायम आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीपासूनही ते माघार घेण्यास तयार नाहीत. जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आजवर सहा उपोषणे केली. त्यांच्या पाठीशी विशेषत: मराठवाड्यात मराठा समाज एकवटला आहे, हेच दृश्य वेळोवेळी बघायला मिळाले. मराठा समाजाची नाराजी नुकसानकारक ठरू नये यासाठी भाजपाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. हरियाणात जाट समाज काँग्रेसच्या पाठीशी एकवटला असल्याचे चित्र होते, तेव्हा भाजपाने बिगर जाट समाजाची मोट बांधून मोठी व्होट बँक उभी केली. तसेच महाराष्ट्रात बिगर मराठा समाजांना एकत्र आणणे ही भाजपाची मोठी कसोटी ठरणार आहे. धनगर समाजाला अपेक्षित आरक्षण मिळाले नाही म्हणून धुसफूस आहेच. शिवाय प्रहार संघटनेचे बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, छत्रपती संभाजी राजेंची स्वराज संघटना, अशी तिसरी आघाडी मैदानात उतरली आहे. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर रणसंग्रामात उतरली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये महायुतीला किंवा महाआघाडीला मनसेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याशिवाय प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी मते खेचणारच आहे. महायुतीत असूनही रामदास आठवले यांच्या पदरात काही भरीव पडलेले दिसत नाही. महाआघाडी व महायुती यामधील सहा राजकीय पक्षांची उमेदवारी ज्यांना मिळणार नाही, ते आपली ताकद या निवडणुकीत दाखवणार हे निश्चित आहे. आघाडी व युतीला त्यांच्याच पक्षातील बंडोबांशी मोठा सामना करावा लागणार आहे. हरियाणात एका काँग्रेस नेत्याच्या अहंकार व एकाधिकारशाहीपुढे पक्षात अन्य कोणाला विश्वासात घेतले गेले नव्हते, तशा चुका महाराष्ट्रात होऊ नयेत, दक्षता घेणे हे काँग्रेसचे हायकमांडचे काम आहे. हरियाणात भूपेंदिर सिंह हुड्डा यांच्या फाजिल आत्मविश्वासामुळे विजयाच्या टप्प्यात आलेली निवडणूक काँग्रेसला पराभवाकडे घेऊन गेली तसा फटका महाराष्ट्रात नाना पटोलेंच्या स्वभावमुळे बसू नये असे आघाडीतील नेत्यांनी बोलून दाखवले आहे. राज्यात भाजपा म्हणजे देवेंद्र फडणवीस हेच आहेत. देवेंद्र हाच भाजपाचा महाराष्ट्रातील चेहरा आहे. मोदी, शहा किंवा नड्डा यांचा सर्वाधिक विश्वास फडणवीसांवर आहे. भाजपाच्या जाहीर झालेल्या पहिल्या यादीत पहिले नाव देवेंद्र फडणवीस यांचे होते ही त्याची झलक आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असले तरी पक्षाचे केंद्रस्थान मुंबईतील मलबार हिलवरील सागर बंगला हाच आहे. एकनाथ शिंदे यांची ठाकरेंच्या शिवसेनेत नंबर २ अशी कधीच ओळख नव्हती. आता ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत तसेच महायुतीचे नंबर १ चे नेते आहेत. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे जरी जाहीर झाले नसले तरी महायुती ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे हे भाजपाने सुद्धा मान्य केले आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत चाळीस आमदारांसह बंड करण्याची जी हिम्मत दाखवली त्याला तोड नव्हती. त्यांच्या बंडाने शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. भाजपाच्या आशीर्वादाने व संरक्षक कवचाने एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या सर्वोच्च सिंहासनावर बसले असले तरी संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत जनतेचा नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.
रोज १८ तास काम करणाऱ्या या नेत्याकडे दूरदृष्टी आहे. कामाचा झपाटा आहे. कमी वेळात विकासाची कामे मार्गी लावण्याचे कौशल्य आहे आणि उद्योग व्यवसायात प्रचंड गुंतवणूक त्यांनी महाराष्ट्रात आणली आहे. एवढी ऊर्जा, उत्साह, कार्यक्षमता, तप्तरता त्यांच्याकडे येते कोठून? भाजपापेक्षा कोणत्या नेत्यापेक्षा आपण सरस आहोत हे त्यांनी आपल्या कामांनी सिद्ध करून दाखवले आहे. म्हणूनच मोदी–शहांचा थेट विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी झाले आहेत. कार्यकर्ते संभाळणारा, लोकप्रतिनिधींची कामे विनाविलंब करणारा हा नेता आहे. शहरी व ग्रामीण भागातील जनतेला आपला नेता मुख्यमंत्रीपदावर आहे, असे वाटते, हीच त्यांच्या कामाची पावती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तर गेम चेंजर ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे झालेले नुकसान लाडकी बहीण भरून काढणार आहे. या योजनेमुळे दोन कोटी तीस लाख बहिणींची व्होट बँक एकनाथ शिंदे यांनी आपलीशी केली आहे. लाडकी बहीण योजनेने महाआघाडीला धडकी भरली आहे. आपण लाडक्या बहिणींना दरमहा तीन हजार रुपये देऊ, या आश्वासनाने बहिणी सुखावल्या आहेत. ही योजना बंद होणार नाही, हा फार मोठा दिलासा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीत चढाओढ असली तरी हीच योजना हे महायुतीचे आधार कार्ड ठरणार आहे.