मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांचा रेल्वे प्रवास (Mumbai Railway) जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात मुंबई लोकलच्या गर्दीमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा अशीच घटना अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे.
कर्जत येथे राहणारी ऋतुजा गणेश जंगम हिचा मंगळवारी रात्री ८ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास लोकल ट्रेनच्या गर्दीमुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नेमके घडले काय?
ऋतुजा ट्रॅव्हल कंपनीत कामाला होती. ती ठाण्याहून कर्जत लोकलने परतत असताना अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्दीच्या रेट्यामुळे खाली उतरली. पण घरी जायला उशीर झाला हे लक्षात येताच ती पुन्हा त्याच लोकलमध्ये चढली. पण गर्दीमुळे तिला आतमध्ये शिरताच आले नाही. त्यामुळे ती दारातच उभी राहिली. मात्र अंबरनाथ स्थानकातून ट्रेन सुटताच अवघ्या काही अंतरावर गर्दीमुळे तिचा हात सटकला आणि ती खाली पडली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांनी प्रवासावेळी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.