Saturday, October 25, 2025
Happy Diwali

१०वी च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता; २० गुण मिळाले तरी ११वीत प्रवेश पण...

१०वी च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता; २० गुण मिळाले तरी ११वीत प्रवेश पण...
मुंबई: गणित आणि विज्ञान विषयात दांडी गुल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. १०० गुणांच्या पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला ३५ गुणांची गरज असते. पण आता तुम्हाला ३५ ऐवजी २० गुणांची गरज लागणार आहे. सरकारने एसएससीमधील या दोन्ही विषयांचे उत्तीर्ण गुण १०० पैकी ३५ वरून २० वर आणले आहेत. असे असले तरी यासोबत एक नियमही आहे. वास्तविक जे विद्यार्थी या पद्धतीने उत्तीर्ण होतील. त्यांच्या मार्कशीटमध्ये एक नोटदेखील असेल. ज्यामध्ये ते पुढे गणित किंवा विज्ञानाचा अभ्यास करू शकत नाहीत, असे त्यात लिहिलेले असेल.स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगचे संचालक राहुल रेखावार यांनी या संदर्भात माहिती दिली. 'हा बदल शालेय शिक्षण विभागाने आधीच मंजूर केलेल्या नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्याचा भाग आहे, असे ते म्हणाले. असे असले तरी हा बदल राज्यात नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यावर अंमलात येईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. या निर्णयामुळे ज्या विद्यार्थ्यांना कला शाखेची आवड आहे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गणित किंवा विज्ञानात नापास होऊन विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाते. यानंतर विद्यार्थ्यांकडे क्षमता असली तरी पुढील अभ्यासासाठी कोणताही पर्याय उरत नाही. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर फेकले जाणार नाहीत, यासाठी बदल डिझाइन करण्यात आले आहेत. २० गुण मिळवून विद्यार्थी गणित, विज्ञान विषयात उत्तीर्ण होऊ शकतील. असे असले तरी संबंधित विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर ते पुढील वर्षी पूरक परीक्षा किंवा नियमित परीक्षा देऊ शकणार आहेत. या विषयात उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना नवीन गुणपत्रिका मिळू शकते, अशी माहितीदेखील रेखावार यांनी यावेळी दिली.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा