‘असे’ असतील पर्यायी मार्ग
पुणे : दिवाळी (Diwali Festival) सण अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त राज्यभरातील सर्व बाजारपेठा दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व सामानांनी उजळून गेल्या आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी दिवाळीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी रेलचेलही दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस व वाहतूक यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. दिवाळी सणानिमित्त पुणे (Pune) शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीकरीता ग्राहकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी पाहता पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल (Changes in transport) करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांना सुखरुपरित्या दिवाळीची खरेदी करता यावी यासाठी पुणे वाहतूक प्रशासनाने ५ नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीत बदल केले आहेत. याअंतर्गत बाजारपेठालगत असणारे मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आले असून तेथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.
कशी असेल वाहतूक व्यवस्था?
- शिवाजीनगरवरून शिवाजी रोडने जाणारी चारचाकी वाहने स. गो. बर्वे चौकातून जाणारी वाहतूक जंगली महाराज रस्ता- टिळक चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.
- स्वारगेटवरून बाजीराव रोडने शिवाजीनगरकडे पुरम चौक मार्गे जाणारी चारचाकी वाहने पुरम चौकातून डावीकडे वळून टिळक रोडने एस. पी. कॉलेज अलका चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
- आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. ही वाहने बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
- तसेच, फुटका बुरूज वरून जोगेश्वरी चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. त्यासाठी इच्छितस्थळी जाण्यासाठी शिवाजी रोडवरुन सरळ पुढे जाणारा पर्यायी मार्ग राहील.
- शनिपार चौकाकडून तसेच कुमठेकर रोडवरून मंडईकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. याकरिता पर्यायी मार्ग म्हणून बाजीराव रोडने सरळ पुढे जाता येईल.
शहरातील पार्किंग व्यवस्था
दिवाळीसणानिमित्त बाजारपेठेत बाजीराव रोड, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड व मंडई या भागात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने बाबू गेनू पार्किंग, मिसाळ पार्किंग, हमालवाडा पार्किंग व साने वाहनतळ याठिकाणी पार्क करावीत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी दिली.