Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकाँग्रेस-ठाकरे सेनेतील जागावाटपाचा तिढा बाळासाहेब सोडवतील?

काँग्रेस-ठाकरे सेनेतील जागावाटपाचा तिढा बाळासाहेब सोडवतील?

आज दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते चर्चेला बसणार

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच नाराज असलेले आणि उतावीळ झालेले स्थानिक नेते बंडखोरी आणि पक्ष सोडून जाण्याच्या धमक्या देताहेत. त्यातच पक्षश्रेष्ठींकडून नाराजांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेत अद्याप एकवाक्यता झालेली नाही. विदर्भातील जागांवर चर्चेचे घोडे अडले असून ठाकरे गटाने केलेला दावा मागे घ्यावा, अशी काँग्रेस नेत्यांची ठाम भूमिका आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम असताना सोमवारी दिल्लीत काँग्रेसने सुमारे ९६ उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले. त्यातील ६२ उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी मंगळवारी जाहीर होणार आहे. या जागांपैकी ५८ जागांबाबत कोणताही वाद नसून तिन्ही घटक पक्षांचे एकमत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांवर जाहीर हल्लाबोल केल्यानंतर उबाठा गटाने आम्ही पटोले असतील तर चर्चेला बसणार नाही अशी भूमिका घेतली. त्यावर आता काँग्रेसने मवाळ भूमिका घेत जागावाटपाबाबत काँग्रेस व ठाकरे गटातील वाद मिटवण्याची जबाबदारी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली आहे.

थोरात आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते चर्चेला बसणार आहेत. त्यात जागावाटपाचा तिढा सुटला तर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होईल. त्यानंतर तिन्ही पक्षांची पहिली यादी घोषित होणार आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या एन्ट्रीनंतर तरी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा घोळ संपतो का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -