कणकवली : उद्धव ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट झाली अशी माध्यमांपर्यंत पोहोचलेली बातमी काँग्रेस पक्षाच्या सोर्समधून गेलेली आहे.त्याच काँग्रेसवाल्यांसोबत संजय राजाराम राऊत मांडीला मांडी लावून बसतो आणि त्याच नेत्यांचे बाप काढतो. जर तुम्ही भाजपच्या नेत्यांना भेटला नसाल आणि तुमच्या मनात काहीच काळेबेरे नसेल तर एवढी तडफड कशाला? असा सवाल करत, चोर के दाढी मे टिनका नसेल तर तुम्हाला राग येण्याचे कारण नाही. ज्या अर्थी तुमची चिडचिड होते आहे. तडफड होते आहे.याचा अर्थच दाल मे कुछ तो काला है..! या पुरी दाल ही काली है..! असा टोला भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी लगावला.
कणकवली प्रहार भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले,जे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत ते काँग्रेसचे कधीच होऊ शकणार नाहीत.त्यामुळे काँग्रेसने सुद्धा या गोष्टीचा विचार करावा आणि संजय राजाराम राऊतसारख्या बिन भरोशाच्या माणसावर किती विश्वास ठेवावा हे ठरवावे.
आतापर्यंत राऊतांचे कुठले आरोप खरे ठरलेत. याबाबत माध्यमांनी त्याला विचारले पाहिजे.कोणाची रोकडं सापडली की, संजय राऊत ती रोकडं महायुतीची आहे असे ओरडतो.लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची पण बॅग चेक केली होतीच ना काय मिळालं? त्यामुळे संजय राऊतांच्या आरोपांना मनोरंजन म्हणून महाराष्ट्र पहात आहे. एकता कपूरने त्याला सीरिअलमध्ये घ्यावे.कारण त्याचे डायलॉग कोणीच गांभीर्याने घेत नाही,अशी टीका यावेळी नितेश राणे यांनी केली.