नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी २३ ऑक्टोबरला (बुधवार) वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाडसह उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिला. या ठिकाणाहून प्रियंका गांधी निवडणूक लढवत आहेत. बुधवारी नामांकन अर्ज दाखल करताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह काँग्रेसशासित आणि मित्रपक्षाची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेतेही पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नामांकन दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी भव्य रोड शो करणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमोर नामनिर्देशनपत्र दाखल केले जाणार आहे.
प्रियंका गांधी पहिल्यांदाच प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या अगोदर त्यांनी काँग्रेस पक्षाचा देशभरात जोरदार प्रचार केला. आता त्यांच्या प्रचारासाठी देशभरातून काँग्रेस कार्यकर्ते, आमदार, खासदार यांच्यापासून ते अगदी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी वायनाडमध्ये प्रचार करणार आहेत. पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवण्याचे लक्ष प्रियंका गांधींनी ठेवले असल्याने, संपूर्ण पक्ष ताकद लावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.