पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की एक लाख तरुणांना आपण राजकारणात आणणार आहोत. कुटुंबवादामुळे देशाचे सर्वात मोठे नुकसान होत आहे. त्यांचे हे वक्तव्य निश्चितच खूप मोलाचे आहे आणि आजच्या घडीला काळाची गरजही आहे. मोदी यांच्या घोषणेमुळे अनेक कौटुंबिक पक्ष किंवा दक्षिणेतील लहान पक्ष, काँग्रेस किंवा शिवसेना उबाठासारखे पक्ष किंवा शरद पवार यांच्यासारखा जो पक्ष आहे तो घायाळ झाला आहे. पण एवढ्यावर मोदींचे वक्तव्य घेता येणार नाही, तर त्यात अनेक कंगोरे भरले आहेत. राजकारणात एका कुटुंबाच्या हाती सर्व राजकारणाची दोरी असलेल्या पक्षांकडे सत्ता गेली की, तिचा कसा दुरुपयोग होतो हे यापूर्वी तामिळनाडू, बंगाल आणि द्रमुक यांच्या पक्षांतही भारताने पाहिले आहे. त्यामुळे मोदी यांचे वक्तव्य आहे ते भारताला जातीय राजकारणापासून मुक्त करण्याचे आणि ते महत्त्वाचे आहे.
भारतात जात ही सर्वत्र पाहिली जाते आणि त्यात उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे त्यापेक्षा तो कोणत्या जातीचा आहे आणि त्याच्यामागे त्याची जात ठामपणे उभी आहे की नाही हे पाहिले जाते. अगदी तिकीटवाटपापासून ते याच निकषांवर सारी रणनीती ठरते आणि तो भारतीय राजकारणाचा सर्वात मोठा पराभव असतो. भाजपा आणि डावे पक्ष वगळता अन्य कोणत्याही पक्षाला यापासून सोडलेले नाही. त्यातच जात हा सर्वात मोठा फॅक्टर आहे. जो उमेदवाराचे भवितव्य ठरवतो आणि उमेदवारासाठी तिकीट मिळणार की नाही. तो जिंकून येणार की नाही हेही ठरवतो. एक लाख तरुणांना मोदी यांनी राजकारणात आणण्याचे ठरवले आहे आणि त्यात ही घोषणा स्वागतार्ह आहे. कारण या तरुणांच्या नात्यातील कुणीही व्यक्ती राजकारणात किंवा राजकीय घराण्यात नसेल अशी अट यामागे आहे. बरेचसे तरुण केवळ आपले सगेसोयरे राजकारणात नाहीत म्हणून राजकारणात प्रवेश करू शकत नाहीत. अशा तरुणांच्या व्यथांना मोदी यांनी वाट करून दिली आहे. स्वतः मोदी केवळ आपल्या बळावर राजकारणतात पुढे आले आहेत. त्यांना कुणाचाही सहारा लागला नाही अथवा त्यांनी कुणाचीही मदत घेतली नाही. पण आज एखाद्याला राजकारणात यायचे, तर कुबड्या घेऊनच यावे लागते. हे ओळखून मोदी यांनी ही घोषणा केली. तशी ही घोषणा जुनीच आहे. पण वाराणसी येथे बोलताना त्यांनी तिचा पुनरूच्चार केला ही बाब महत्त्वाची आहे.
मोदी ज्या तरुणांना राजकारणात आणू पाहतात त्यांचा यापूर्वी राजकारणाशी काहीही संबंध आलेला नाही आणि त्यांच्या नातेवाईकांपैकी कुणीही राजकारणात नसावे अशी अट आहे. ही निश्चितच चांगली अट आहे आणि हा प्रस्ताव चांगला आहे. कित्येक तरुण असे आहेत की, ज्यांची राजकारणात काही तरी करून दाखवण्याची जिद्द आहे. पण ते कोणताच आधार नसल्याने काही करू शकत नाही. आतापर्यंत ही व्यथा सरकारपर्यंत गेलीच नाही. पण आता मोदी यांनी त्यांच्या व्यथा वेदनांना खुली वाट करून दिली आहे. आज आपल्याकडे असे कित्येक तरुण आहेत ज्यांना राजकारणात येऊन बदल घडवायचा आहे आणि त्यांच्याकडे कितीतरी योजना आहेत. पण त्यांना आपल्या योजना अमलात आणण्याची संधीच मिळत नाही. मोदी यांनी या तरुणांना एकप्रकारे संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. आपल्या राजकारणाला भाई भतीजावादाने पोखरले आहे. त्यातून तरुणांना संधी मिळत नाही. ती मोदी यांनी दिली आहे. एक लाख तरुण जे निवडले जाणार आहेत त्यापैकी एकाही तरुणाचे नातेवाईक राजकारणात नसतील. हे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. अन्यथा पुन्हा तेच होईल. म्हणून मोदी राजकारणात येण्यासाठी असेच तरुण निवडतील जे राजकारणात येऊन काही तरी करून दाखवतील आणि त्यांना कसलीही आडकाठी राहणार नाही. मोदी यांच्या या घोषणेचे स्वागत करायला हवे. कारण आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार आणि सरकारी नोकरीत लाचलुचपत, आदींनी पोखरून टाकले आहे. त्यात कोणा ना कोणा राजकारण्याचा वरदहस्त लाभलेला असला, तर तो राजकारणात दादागिरी करतोच. त्यामुळे अशा तरुणांना राजकारणात आणून राजकारण शुद्ध करण्याची ग्वाही मोदी यांनी दिली आहे.
मोदी यांची ही योजना निश्चितच स्तुत्य आहे. तिच्यात काहीही अशुद्ध नाही. केवळ शुद्ध स्वरूपातील ही योजना आहे. मोदी यांचा उद्देश्य राजकारण साफ करणे हा आहे. आज भारतात चांगले राजकारणी नाहीत, काही अपवाद असतील पण ते थोडे आहेत. चांगले शासकीय अधिकारी नाहीत आणि चांगले प्राध्यापक नाहीत. चांगले शिक्षक नाहीत. केवळ भ्रष्ट व्यवस्थेतून ते आले आहेत. त्यामुळे राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांना योग्य दिशा दाखवण्याची आवश्यकता आहे आणि तो तोच मोदी यांनी आपल्या भाषणात उचलल्याचे दिसते. देशातील लाखो तरुण आज राजकारणात येऊन काहीतरी करून दाखवण्याची संधी शोधत आहेत. पण त्यांना अनेक अडचणी आहेत. त्यांच्या मार्गातील अडचणी दूर करून त्यांना योग्य तो मार्ग निवडण्याची संधी मोदी देऊ पाहत आहेत, ही यातील चांगली बाब आहे. विकसित भारत संकल्पापैकीच मोदी यांची ही योजना आहे. त्यामुळे तिचे स्वागत करायला हवे. मोदी यांनी सरकारातून लोकांना काहीही दिले जात नाही, केवळ त्यांच्या नावांवर मोठमोठ्या घोषणा केल्या जातात याकडे लक्ष वेधले आहे. मोदी यांनी एक लाख तरुणांना राजकारणात आणून मोदी यांना त्या तरुणांना सक्षम बनवून त्यांच्या स्वप्नातील विकसित भारत बनवायचा आहे. हेच त्यांचे व्हिजन आहे. त्याचे स्वागत करायला हवे. आज कोणताही पक्ष असा नाही की जो भ्रष्टाचारापासून अलिप्त नाही. अशा पक्षांपासून मुक्त करून राजकारण विशुद्ध करण्याचे शिवधनुष्य मोदी हाती घेऊ पहात आहेत.