Sunday, December 15, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी अनेक शुभकार्यांचा प्रारंभ झाला आहे. याच दिवशी  महिषासुरमर्दिनीनी महिषासुराचा वध केला. अधर्मावर धर्माचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून या दिवसाला आपण विजयादशमी असेही  म्हणतो. १९२५ सालच्या विजयादशमीला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघाने शताब्दी वर्षात पाऊल टाकले आहे. राष्ट्रीय विचार मानणाऱ्या लाखो करोडो स्वयंसेवकांच्या कार्यातून खूप मोठी काम कार्यकर्त्यांनी करून दाखवली आहेत. संपूर्ण भारत वर्षामधील दुर्बल, अशिक्षित, गरीब, दुर्लक्षतांसाठी विविध सेवाकार्य या कार्यकर्त्यांकडून घडत आहेत. सामाजिक भेदभाव नष्ट व्हावा यासाठी स्वतः पदरमोड करून, स्वतःच्या  कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने काम करत आहेत. अशा कार्यकर्त्यांना संघाबद्दल काय वाटतं ते जाणून घेऊया.

शिबानी जोशी

१९२५ साली संघ स्थापन झाल्यानंतर महिलांसाठी देखील अशा प्रकारची एखादी संघटना असावी यासाठी वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांनी १९३६ साली विजयादशमीच्याच दिवशी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. महिलांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, मानसिक स्तर उंचवावा  यासाठी समितीच्या कार्यकर्त्या झटून काम करतात. डॉक्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका वंदनीय शांतक्काजी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थ, सशक्त, संघटित आणि जागृत हिंदू समाज निर्माण  करण्यामध्ये  महत्त्वपूर्ण योगदान देणारी एक अनोखी आणि जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना आहे. प. पू. डॉक्टर केशवराव बळीराम हेडगेवार यांच्या  चिंतनाच्या निखाऱ्यातून लाखो लोकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची ज्वाला प्रज्वलित झाली आणि त्याचा परिणाम म्हणून  राष्ट्रहित आणि मनामनात समाजा प्रति संपूर्ण समर्पण भाव ठेवणाऱ्या निष्ठावान आणि कर्मठ कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण झाली आणि अशा समर्पित कार्यकर्त्यांनी आज समाजातील विविध क्षेत्रांमध्ये समर्थक नेतृत्व करत जगात भारताला सन्माननीय स्थान प्राप्त करून द्यायला मदत केली आहे. स्वाभिमानी भारताचं योगदान  जागतिक पटलावर आज दिसून येत आहे आणि हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाची सार्थकता आहे असं मला वाटत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विलक्षण अनुशासित कार्यपद्धती तसच ‘राष्ट्र सर्वोपरी’ भाव महिलांमध्ये ही निर्माण करण्याच्या दृष्टीने १९३६ मध्ये विजयादशमीच्याच दिवशी वंदनीय  लक्ष्मीबाई केळकर यांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. देशामध्ये निम्मा वर्ग महिलांचा आहे. समितीच्या संस्कारानी संस्कारीत सुशील, सुधीर, समर्थ सेविका, जागृत आणि देशभक्त  नागरिकांच्या निर्माणकार्यामध्ये आपलं निरंतर योगदान देत आहेत.या निमित्ताने मी समस्त भारतीय समाजाला निवेदन करते की, त्यांनी वसुधैव कुटुंबकम या आपल्या भारतीय संस्कृती चिंतनानुसार जाती पंथ मतभेद भाव विसरून राष्ट्रवादी विकासामध्ये आपलं योगदान द्याव. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त सर्वांना शुभेच्छा त्यांनी दिल्या.  वंदे मातरम फाऊंडेशनचे प्रमुख सतीश सिन्नरकर हे देखील अनेक वर्ष राष्ट्रीय विचार अनुसरून विविध संस्थात काम करत आहेत. त्यांनीही आपल्या संघाप्रती भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले,”१९२५ साली आद्यसरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे बीज रोवले त्याचा आज विश्वव्यापी वटवृक्ष झाला आहे. स्वत:ला “हिन्दू” म्हणण्याची लाज वाटण्याचा तो काळ होता. तोच समाज “गर्व से कहो, हम हिन्दू है” अशी उच्च स्वरात आज घोषणा देत आहे. हे संघाच्या प्रदीर्घ तपश्चर्येचे अभूतपूर्व यश आहे. या मातृ संघटनेशी गेली ६८ वर्षे सक्रीय संबंध असल्याचा मला अभिमान आहे. लक्षावधी स्वयंसेवकांच्या असीम त्यागातून व अनेक संकटांचा सामना करत संघ आज देशाच्या घडामोडीत केन्द्रीय भूमिका निभावत आहे. २०४७ या वर्षी आपली “हिन्दुराष्ट्र” ही धारणा पूर्ण यशस्वी होईल या निश्चयाने संघकार्याची दमदार वाटचाल सुरू आहे. हाच संकल्प शताब्दीच्या निमित्ताने साकार करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या आम्हां सर्व स्वयंसेवकांमधे हे व्रत आजीवन पाळण्याचा निर्धार आहे.”

बडोदा इथले कार्यकर्ते नितीन शहापूरकर हे गुजरातमध्ये अनेक संस्थात काम करतात. त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात,”सर्व प्रथम आपल्या संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहे त्यासाठी आम्हाला अभिमान आहे. ह्यासाठी आमचे आधीचे वरिष्ठ कार्यकर्ते त्यांचे मनापासून अभिनंदन. कारण त्यांनी आपली ही संस्कृती, संघटन, सेवा निःश्वार्थ भावनेने जपली म्हणून आजची ही पिढी अखंड भारत व हिंदुत्व पाहू शकत आहे. मी एक साधा स्वयंसेवक आहे. मी संघाबद्दल काय लिहणार? पण एवढे नक्की की आज संघ आहे म्हणून हिंदुत्व टिकून आहे. माझे व्यक्तिगत मत असे आहे की आजच्या नवीन पिढीनी ही संस्कृती जपायची असेल, तर आपण व आपल्या मुलांना शाखेत नियमितपणे पाठवले पाहिजे. प्रत्येक वेळेस संघ काय करतो? संघात जाऊन काय उपयोग? असे बोलण्यापेक्षा आपण संघासाठी काय करू शकतो, ही भावना प्रत्यकजण मानत आलां तर अखंड भारत व्ह्यायला फार वेळ लागणार नाही आणि हीच खरी श्रद्धांजली असेल आपल्या पूर्वजांना. जेवढा संघ मजबूत, संघटित होईल तेवढंच हिंदुत्व मजबूत होईल. त्यासाठी आपण सर्वजण नियमितपणे संघाच्या कार्यक्रमात जाणे जरुरी आहे. पुनःच एकदा सर्व संघाच्या पदाधिकारी, विश्वस्त व कार्यकर्त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

संस्कार भारती, मुंबई विभाग, सहप्रमुखपदी असलेल्या शर्मिला भागवत यांनीही आपलं मत मांडल, त्या म्हणाल्या “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे शिस्त, ध्येयनिष्ठा आणि राष्ट्रसेवेत समर्पित कार्यकर्ते हे समाजात दृढ झालेले समीकरण. भारतभर तसेच विदेशातही वर्धिष्णू असलेल्या अनेक शाखा, जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे प्रकल्प, संस्था, बँका, सेवाकार्य, विविध पारिवारिक संघटना…
गेली  दहा दशके हे अव्याहत असण्यामागे   संघाचे १)वैचारिक अधिष्ठान, राष्ट्रप्रेमी समाज निर्माण करून मातृभूमीला गौरवशाली करण्याचा ध्यास २)समाजातील सज्जन शक्ती जोडून एकात्मतेने अपेक्षित कार्य साधणारी परिणामकारक कार्यपद्धती ३) समाजाला सर्व अंगाने सशक्त करण्यासाठी, आपला नोकरी, व्यवसाय, सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून संघ कार्य करणारे निरलस कार्यकर्ते. संघाच्या सर्वच पारिवारिक संस्थांना हे लागू आहे. संकल्प आणि समर्पणाची प्रेरणा नवीन पिढ्यांमध्ये कशी संक्रमित होते, हे माझ्या  वैयक्तिक उदाहरणावरून सांगता येईल. संघ विचारांशी संलग्न माहेर आणि सासर असल्याने कळत नकळत राष्ट्रीय विचारांचे संस्कार झाले होते. पण लग्नानंतर संघाच्या अनेक प्रचारकांना, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जवळून जाणून घेण्याचा योग आला. माननीय प्रल्हादजी अभ्यंकर, सुरेशराव केतकर, हो. वे. शेषाद्रीजी, वसंतराव तांबे, भय्याजी जोशी, सुधीर फडके, मोहनजी भागवत “दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवनभर अविचल चलता है”   अशी प्रचीती देणारी अगणित श्रद्धेय व्यक्तित्वे. आपापल्या क्षेत्रात कर्तृत्ववान. सगळ्यांशी बोलताना तीच आत्मियता, कौटुंबिक जिव्हाळा, वागण्यात साधेपणा खूप काही शिकवून गेला आणि कार्यकर्ता म्हणून हळूहळू जडण-घडण होत गेली. संस्कार भारतीच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी प्रभावित केले, सर्वांना सामावून घ्यायला शिकवले.  संस्कार भारतीच्या कामाशी मनापासून जोडले गेले, ती आजपर्यंत.”    या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत; परंतु करोडो संघ कार्यकर्त्यांच्या भावना यास असणार यात शंका नाही.

joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -