कणकवली : राज्यातील राजकीय घडामोडी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अगदी वेगाने सुरु आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचे मोठे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) हे लवकरच शिवसेना शिंदे गटात एंट्री करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या (२३ ऑक्टोबर) संध्याकाळी ४ वाजता ते शिंदे गटात एंट्री करणार आहेत. निलेश राणे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली. नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली, त्याच चिन्हावर आता मी निवडणूक लढवणार असल्याचं निलेश राणे म्हणाले.
निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. निलेश राणे यांनी आज नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी भाष्य केले. २०१९ला मी नारायण राणे साहेबांसोबत भाजपमध्ये आलो. भाजपमध्ये खूप सन्मान मिळाला. अनेक नेत्यांनी आदर दिला. भरभरून प्रेम दिलं. इथे शिस्त पाहायला मिळाली. मला देवेंद्र फडणवीसांनी लहान भावाप्रमाणे सांभाळलं. रवींद्र चव्हाण यांनीसुद्धा लहान भावाप्रमाणे वागणूक दिली. सगळ्याच नेत्यांनी खूप चांगली वागणूक दिली, असे निलेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे हे कायम दैवत
आताची येणारी निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जात आहोत. त्यामुळे भाजप खासदार नारायण राणे यांची ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली, त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार आहे. मला पक्षाच्या हितासाठी जे करता येईल ते मी करेन. तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे कायम माझे दैवत आहेत, आणि ते कायम दैवत राहतील, असे निलेश राणेंनी म्हटले.