Thursday, December 12, 2024
Homeमहत्वाची बातमीनिवडणुकीच्या काळात सर्व तपास यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर

निवडणुकीच्या काळात सर्व तपास यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर

आर्थिक खर्चाच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या मतदारसंघांवर अधिक लक्ष

मुंबई जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिले निर्देश

मुंबई(प्रतिनिधी): विधानसभा निवडणूकीच्याच्या पार्श्वभूमीवर,मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच आर्थिक प्रकरणांशी संबंधित सर्व तपास व अंमलबजावणी यंत्रणांनी अधिक चोखपणे जबाबदारी पार पडावी.पैशांची देवाणघेवाण,मादक द्रव्य,मद्य विक्री व तस्करी,सोने-चांदींची विक्री आणि तस्करी तसेच हवाला आदी संशयास्पद प्रकरणात कारवाई करण्यात कोणतीही हयगय करू नये.संशयास्पद प्रकरणी थेट व तत्काळ जप्तीची कारवाई करावी. तसेच आर्थिक खर्चाच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या मतदारसंघांवर अधिक लक्ष केंद्रीत करुन तेथेही योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

आयकर विभाग,राज्य उत्पादन शुल्क,सक्तवसूली व अंमलबजावणी,महसूल गुप्तवार्ता,केंद्रीय वस्तू व सेवा कर,राज्य वस्तू व सेवा कर,वस्तू व सेवा कर गुप्तवार्ता, सीमा शुल्क,राज्यस्तरीय बँकर्स समिती,अंमली पदार्थ नियंत्रण,वित्तीय गुप्तवार्ता विभाग;रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया,तटरक्षक दल,रेल्वे सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल,भारतीय विमानतळ प्राधिकरण,नागरी उड्डाण सुरक्षा, परिवहन विभाग,आचारसंहिता कक्ष,मुंबई पोलिस दलाचे कायदा व सुव्यवस्था विभाग यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.

सर्व यंत्रणांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले नियोजन तसेच सुरू असलेल्या कार्यवाहींचा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी आढावा घेतला. त्यानंतर सर्व यंत्रणांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मध्ये आलेल्या काही अनुभवांच्या आधारे, केंद्रीय निवडणूक आयोग तसेच राज्य निवडणूक आयोग मुंबईतील निवडणुकीशी संबंधित बारीकसारिक बाबींवर विशेष लक्ष ठेवून आहे. त्यामुळे, मुंबईत कार्यरत असलेल्या प्रत्येक यंत्रणांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. सर्व यंत्रणांचे आपापसांमध्ये योग्य समन्वय राहावे, यासाठी प्रत्येक यंत्रणेने समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. पैशांची देवाणघेवाण, मादक द्रव्य, मद्य विक्री व तस्करी, सोने-चांदींची विक्री आणि तस्करी तसेच हवालांशी संबंधित घडामोडींवर अधिक बारकाईने आणि गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक यंत्रणेने अधिक सक्रिय होऊन अशा संशयास्पद प्रकरणांत कारवाई करण्यात कोणतीही कसूर ठेवू नये. प्रसंगी जप्तीची कारवाई करावी, असे निर्देशही गगराणी यांनी दिले.

ते पुढे म्हणाले कि , संबंधित यंत्रणांनी संयुक्त पथकांची निर्मिती करून त्यांची मुंबईतील ‘चेक पोस्ट’वर नियुक्ती करावी. समन्वयक अधिकाऱयांनी त्यांच्याकडील माहितीची नियमितपणे देवाणघेवाण करावी, जेणेकरुन समन्वयाने कारवाई करता येईल. मुंबईच्या सीमेवर, बंदरांवर, समुद्र किनाऱयांवर, विमानतळ तसेच वाहतुकीच्या अन्य संसाधनाद्वारे केल्या जाणाऱया हालचालींवर बारीक लक्ष ठेवून संशयास्पद प्रकरणांमध्ये तात्काळ कारवाई करावी. मद्य विक्री करणाऱया दुकानांबाबत दक्ष राहावे तसेच त्याठिकाणी काही गैरव्यवहार आढळून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, आर्थिक खर्चाच्या बाबतीत काही मतदारसंघ अत्यंत संवेदनशील आहेत. त्याठिकाणी निवडणुकीच्या काळात पैशांचा व्यवहार होणार नाही तसेच अशा संवेदनशील मतदारसंघांमध्ये होणारी पैशांची देवाणघेवाण, व्यवहार किंवा अन्य कोणत्याही संशयास्पद वित्तीय बाबींवर अधिक बारकाईने लक्ष ठेवून संबंधित यंत्रणांनी तात्काळ कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -