वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. वाराणसीमध्ये बोलत असताना, देशातील एक लाख तरुणांना राजकारणात (politics) आणणार असल्याचं वक्तव्य मोदींनी केलं आहे. तरुणांचे कुटुंबवादामुळे सर्वाधिक नुकसान होत आहे. यासाठीच आम्ही राजकारणात अशा एक लाख तरुणांना आणण्याचा संकल्प केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
PM मोदींच्या हस्ते ६७०० कोटी रुपयांच्या २३ प्रकल्पांचे उद्घाटन
रविवारी वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली. देशामधील १ लाख तरुणांना राजकारणात आणणार असल्याचं ते म्हणाले. ज्या कटुंबामधील राजकारणाशी काहीही संबंध नाही त्या तरुणांना नव्या राजकारणाचे केंद्रस्थान बनवलं जाईल असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. आज ६७०० कोटी रुपयांच्या २३ प्रकल्पांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. पंतप्रधान मोदींचा तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा वाराणसी दौरा होता. आरजे शंकरा नेत्र रुग्णालयाचे या भेटीदरम्यान त्यांनी उद्घाटन केले. तसेच शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन त्यांची प्रकृती देखील जाणून घेतली.
तरुणांचे कुटुंबवादामुळे सर्वाधिक नुकसान
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आमच्या सरकारमध्ये कोणाशीही भेदभाव केला जात नाही. घराणेशाहीच्या राजकारणापासून आणि भारताला जातीय मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशात तरुण राजकारण आलं की, लोकशाही जास्तीत- जास्त मजबूत होईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
एनडीए सरकारने कोणाचाही हक्क हिरावून घेतला नाही
राम मंदिराच्या उभारणीचा आपल्या भाषणात संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर बांधले जाईल, असे आम्ही सांगितले होते. लाखो लोक आज रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात असल्याचे मोदी म्हणाले. सरकारने तिहेरी तलाकपासून स्वातंत्र्य आणि महिलांना आरक्षण देण्याचे काम केलं आहे. एनडीए सरकारने कोणाचाच हक्क हिरावून घेतलेला नाही, गरिबांनासुद्धा दहा टक्के आरक्षण देण्याचे काम केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.