मुंबई : उन्हाळी सुट्टीसह विविध सणात अनेक चाकरमानी गावाकडे जातात. अशातच दिवाळी सण अवघ्या १० दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरु झाली आहे. बस स्थानक, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहता मध्य रेल्वेने (Central Railway) दिवाळीनिमित्त ५७० विशेष सेवा (Diwali Special Train) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार असून कन्फर्म तिकीटाची चिंताही मिटणार आहे.
मध्य रेल्वेने मुंबई, पुणे आणि नागपूर येथून देशाच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेच्या ५७० विशेष सेवा सुरू केल्या आहेत. या सेवा ८५ एक्स्प्रेस गाड्यांद्वारे दिल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या या सेवेमार्फत १८० गाड्या लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणाहून धावणार आहेत. तर ३७८ सेवा उत्तर भारतातील दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळ, संत्रागाछी या विविध भागातील प्रवाशांसाठी असणार आहेत.
याशिवाय दक्षिण भारतातील प्रवाशांसाठी ८४ विशेष गाड्या करीमनगर, कोचुवेली, काझीपेट आणि बेंगळुरूपर्यंत धावणार आहेत.