पुणे : पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रोस्थानकात मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. मध्यरात्री बाराच्या सुमारास मंडई मेट्रो स्टेशन येथे तळमजल्यावर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु अवघ्या काही क्षणात या आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी निर्माण होत होत्या. मात्र अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात यश आले.
वेल्डिंगचे काम सुरु असताना येथे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही सध्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील ट्वीट केले आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सदरील घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती. मेट्रो स्टेशनच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
मंडई मेट्रो स्टेशनची आग नियंत्रणात, सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही !
मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार काही वेळापूर्वी घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.… pic.twitter.com/KxsEHOqQPo
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 20, 2024