मुंबई : मुंबई उपनगरात असलेल्या रुग्णालयांची अवस्था वाईट असून रुग्णांना हव्या असलेल्या वैद्यकिय सुविधाही देण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. अनेक रुग्णालयांत कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका यांची कमतरता असल्याने त्याचा भार राजावाडी व शीव रुग्णालयांवर पडत असून या रुग्णालयांचीही अवस्था बिकट आहे. याबाबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच परिमंडळ सहाचे उप आयुक्त संतोष कुमार धोंडे यांना याबाबत भेटून योग्य ती कार्यवाही करावी, असे ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले होते. त्याची पालिकेने दोनच महिन्यात दखल घेतली असून लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव व राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्विकासाला मंजुरी दिली आहे.
वांद्रे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितिच्या बैठकीत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासमोर खासदार संजय दिना पाटील यांनी मतदार संघातील विविध समस्यांबाबतचे मुद्दे उपस्थित करीत सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. यावेळी त्यांनी उपनगरातील रुग्णालयातील बिकट वैद्यकियसेवांची अवस्था, प्रदुषण, पाणी समस्या, वाहतूक समस्या तसेच धारावीकरांच्या पुनर्विकासाचे हे अनेक मुद्दे उचलले होते. पालिकेच्या परिमंडळ सहाचे उप आयुक्त संतोष कुमार धोंडे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीतही अनेक मुददे मांडण्यात आले होते. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन लोढा व धोंडे यांनी संजय पाटील यांना दिले होते. त्याची पालिकेने दखल घेत शीव व राजावाडी रुग्णालयांच्या पुनर्विकासाला मंजुरी देण्यात आली आहे. राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी ६६५ कोटी खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्णालयाच्या जागेचा पुनर्विकास करुन १० मजल्यांची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.