नेवासा (प्रतिनिधी)– नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे आज सोमवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान झाडावर वीज पडून १२ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरच्या वीज पडून झालेल्या दुर्घटनेत संतोष खरात,रामकिसन खोसे, सचिन खोसे, अक्षय पंडित, बाबासाहेब पंडित, अजित पंडित या मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू होऊन सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सदरच्या झालेल्या दुर्घटनेने रांजणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रांजणगावदेवी येथील सहा कुटंबातील सदस्य सामाजिक वनीकरणाच्या परिसरात सुमारे २०० शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले असता सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वीज पडून १० शेळ्या आणि २ मेंढ्या मृत झाल्या असून ४ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
घटनेची माहिती कळताच रांजणगाव परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तर नेवासा पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृत शेळ्या मेंढ्यांचे शिवविच्छेदन केले. तर घटनेची माहिती मिळतात धनगर समाजाचे नेते अशोकराव कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मेंढपाळांशी घडलेल्या दुर्घटने विषयी चर्चा करून शासन दरबारी मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.