Friday, December 13, 2024
Homeसाप्ताहिककोलाजविद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यावरील उपाय

विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यावरील उपाय

आनंदी पालकत्व – डाॅ. स्वाती गानू

शाळेत जाणाऱ्या मुलांचेही काही प्रश्न असू शकतात हे जर आपण समजून घेतले, तर त्यांच्यावरही मानसिक ताण असतो ह्याची आपल्याला जाणीव होईल. मुलांना जाणून घेता येईल. आपण त्यांच्याशी बोलताना भान राखू शकतो. आपण शाळेत, काॅलेजमध्ये असताना अभ्यासाचे पॅटर्न आणि आताच्या मुलांसमोरील आव्हाने, स्पर्धा, पालकांच्या वाढत्या अपेक्षा, अभ्यासाची काठिण्य पातळी, अतिशय व्यग्र दिनक्रम, डिजिटल माध्यमांचा प्रभाव, मित्र-मैत्रिणींच्या गटाचे प्रेशर हा मोठा फरक आहे. या साऱ्या गोष्टींना तोंड देत आपला अभ्यासावरचा फोकस टिकवून ठेवणे आणि आपला अभ्यास व इतर उपक्रमांचा स्तर कायम राखणे यासाठी त्यांची खूप शक्ती खर्च होत असते. झोप अजिबात पूर्ण होत नाही.

म्हणूनच मुलांचे किमान सर्वसाधारण प्रश्न तरी जाणून घ्यायलाच हवे.
१)वेळेचे व्यवस्थापन
२) स्वयंप्रेरणेची कमतरता
३)एकाग्रतेचा अभाव
४)खूप अडथळे
५)निराशा
६)अपुरी झोप
७)बाहेरच्या जगात स्वच्छंदी फुलपाखरू
८)गोष्टी पुढे ढकलत जाणे
९)वास्तवाचे भान नसणे
१०)अभ्यासात रस नसणे
११)परीक्षेविषयीची भीती

आता एकेक प्रश्न पाहू या.
●१) वेळेचे व्यवस्थापन : मुले सकाळी शाळेत जातात. शाळेतून आल्यावर अर्ध्या तासात क्लासला जातात. अभ्यासाचे क्लास झाले की, खेळाच्या क्लासचे कोचिंग असते. घरी आल्यावर होमवर्क, सबमिशन्स असे एकामागोमाग एक सुरूच असते. सेल्फ स्टडीला वेळच मिळत नाही.
मग याच्यावर सोल्युशन काय काढता येईल?
१)स्वतःचे एक शेड्युल तयार करा.
२) प्रायोरिटी लिस्ट बनवा.
३) आपली कामे, वास्तव उद्दिष्टे, जाणीवपूर्वक घेतलेले ब्रेक्स यांचे नियोजन करा.
४)स्मार्ट गोल्स अर्थात
S- specific
M- measurable
A- attainable
R- Realistic
T-Timebound
उद्दिष्टे असावीत. POMODORO ही अभ्यास पद्धत वापरा

●स्वयंप्रेरणेची कमतरता:
जर मुलांमध्ये स्वयंप्रेरणेची कमतरता असेल, तर मुलांबाबत हा खरंच खूप मोठा प्रश्न असतो. हा प्रश्न बहुतेक मुलांना सतावत असतो. होमवर्क, असाईनमेन्टस्, सबमिशन्सच्या डेडलाईन्स, अपेक्षांचे ओझे या साऱ्याचा तोल सांभाळण्याचा मुले प्रयत्न करतात. या सगळ्या गोष्टींनी मुले बर्न आऊट होतात. उद्दिष्टांबद्दल अस्पष्टता यामुळे खूप जास्त तणावात येतात.
काय करता येईल?
मुलांना सपोर्ट सिस्टीमची गरज आहे. जसे की, अभ्यास गट किंवा मार्गदर्शक यांच्या मदतीने नक्कीच चांगला बदल घडून येईल. कारण यात एकमेकांबरोबर अनुभव शेअर केले जातात आणि त्यातून मुले चांगले शिकतात.

●एकाग्रतेचा अभाव : खूप मोठ्या प्रमाणात असाईनमेन्ट पूर्ण करण्याच्या दडपणामुळे मुलांवर सतत ताण येतो. सोशल मीडिया आणि सबमिशन्सच्या डेडलाईन्समुळे त्यांचा पाॅपकाॅर्न ब्रेन सारखा स्विच ऑन – स्विच ऑफ करत असतो. त्यामुळेच एकाग्रतेचा अभाव हा त्यांचा प्रश्न अगदी उघड, स्पष्ट, चटकन कळून येतो जो पुढे जाऊन एक भयंकर शत्रू बनतो.
अशावेळेस मुलांना स्वतःचे मनाने ठरवून अभ्यासाचे एक रुटीन सेट करणे आवश्यक आहे. हाच योग्य पर्याय आहे. वास्तववादी उद्दिष्टे ठरवून माईंडफुलनेस टेक्निकचा वापर करून मुले हा प्रश्न सोडवू शकतात.

●खूप अडथळे : मुले आणि त्यांच्या अभ्यासात येणारे अडथळे हा जरी सामान्य प्रश्न असला तरी आधीच्या तुलनेत आज खरोखरच मुलांच्या अवतीभोवती खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स आहेत. या अडथळ्यांवर मात करणे हे खरंच त्यांच्यासाठी आव्हान आहे. एकीकडे फोनवर नोटिफिकेशन्स आणि दुसरीकडे परीक्षेची तयारी. सोशल मीडिया बुला रहा है और पढाई भी. मनाला ताब्यात ठेवणे त्यांच्यासाठी सोपे नसते.
काय करता येईल?
अभ्यासाची जागा शांत, योग्य प्रकाश, मोकळी हवा असावी. वेळेचे व्यवस्थापन, त्याची टेक्निक्स वापरणे खूप उपयुक्त ठरेल. फोकस कसा करावा, टिकवावा, वाढवावा याची साधने वापरल्यानेही मोठा फरक पडेल.

●निराशा : मुलांवर आताच्या काळात वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही दडपण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मुले निराशेला बळी पडतात. मुलं बऱ्याचदा एकटी पडतात. त्यांच्यावर ओझे असते. अशा वेळेस मित्रांचा पाठिंबा, कुटुंब, कौन्सिलर यांची मदत घेणे सोयीस्कर ठरेल. मुले निराश का होतात कारण त्यांचा अभ्यासातील रस कमी असतो, आयुष्यात घडलेले गंभीर प्रसंग, आनंद नष्ट होणे, पोकळी जाणवणे आणि काही वैयक्तिक प्रश्न, घरातील पैशांची अडचण यातून हे घडते.

यावर काय उपाय करता येईल : मुलांना हे सांगायला हवे की, तुम्ही सध्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेत आहात. आर्थिक गोष्टींचे प्रश्न घरातील मोठी माणसे सोपवतील. त्याची काळजी तुम्ही करू नका. अभ्यासावर फोकस करा. बाकीची सगळी जबाबदारी आम्ही घेतो. कारण मुलांचे मानसिक आरोग्य, मनःस्वास्थ्य अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. म्हणूनच त्यांच्याकरिता अनुकूल वातावरण निर्माण करणे ही पालक या नात्याने आपली जबाबदारी आहे.

●अपुरी झोप : शाळा, क्लासेस, होमवर्क, असाईनमेन्टस, सोशल मीडिया, फ्रेंड सर्कल यामुळे मुले उशीरा झोपतात. झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे एक अनामिक भीती, चिंता मनात सदैव राहते. याचे खरे कारण असते वेळेचे व्यवस्थापन करत नाहीत. इलेक्ट्रॉनिक गॅझेटसचा अतिवापर, अभ्यासाचा ताण यामुळे कमी झोप होत असल्याने विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि एकूणच तब्येतीवर परिणाम होतो.

यावर उपाय म्हणजे : झोप आली नाही तरी विशिष्ट वेळी झोपायची सवय स्वतःला लावायची.झोपेचे रुटीन लावायचे. त्यासाठी पोषक वातावरण तयार करायचे. यातून हा प्रश्न कमी होऊ शकतो. झोपेचे महत्त्व ओळखणे आवश्यक आहे. झोपेमुळे केवळ थकवाच कमी होतो असे नाही, तर मुलांची शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रगतीही होते.

●अभ्यासाचे करिअर की पॅशनची निवड : करिअरची निवड करताना मुलांच्या मनाची ओढाताण होत असते. कारण कशाला महत्त्व द्यावे ते कळत नसल्याने मुले गोंधळून जातात. प्रॅक्टिकल शिक्षण पैसा देते आणि पॅशन मर्यादित पैसा देते. एक असते उपजीविका आणि दुसरी जीविका. यातून मनाविरुद्ध करिअर करावे लागले की चिंता निर्माण होते. ताण वाढत जातो. मनाचे ऐकावे की, मेंदूचे यात बऱ्याचदा वास्तवाचा विजय होतो.

यासाठी हे करता येईल : करिअर कौन्सिलिंग घेणे उचित ठरेल तसेच त्या-त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन घेता येईल.

●सोशल बटरफ्लाय : या वयातील मुले जणू, ‘सोशल बटरफ्लाय’ असतात. सोशल मीडियावर डेडिकेटली कार्यरत राहणे ही आजच्या मुलांची गरज आहे आणि सगळ्यात मोठा प्राॅब्लेम आहे. लेट नाईट पार्टीजमुळे अपुरी झोप. त्यातून शैक्षणिक प्रगतीवर आणि मानसिक स्वास्थ्यावर होणाऱ्या परिणामांमुळे मुले थकून जातात. जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा मुलांच्या वाढ विकासात अडथळे निर्माण होतात. त्यांच्या बौद्धिक कार्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो. मूड डिसऑर्डर होण्याचीही शक्यता असते. अति पार्ट्या केल्यास अभ्यासाचे वेळापत्रक कोलमडते. टाईम मॅनेजमेंट जमत नाही. ताण वाढत जातो. त्यातून शैक्षणिक प्रगती ढासळत जाते. तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात.

●प्रोकास्टिनेशन अर्थात गोष्टी पुढे ढकलत जाणे : जो होमवर्क, जे प्रोजेक्ट्स, ॲक्टिव्हिटीज, असाईनमेन्टस दिले जातात ते वेळेवर पूर्ण करण्यात मुले बरेचदा अपयशी ठरतात. दिलेल्या डेडलाईन्स आणि अभ्यासाचा ताण यातून ते ओव्हरव्हेल्म होतात. हे त्यांच्यासाठी चॅलेंजिंग ठरते. मग अपयशाची भीती मनात निर्माण होते. उद्दिष्टांबद्दल अनिश्चितता वाटू लागते. शेवटच्या टप्प्यापर्यंत धावपळ सुरू असते. या साऱ्याचा परिणाम मुलांच्या परफाॅरर्मन्सवर होतो.

यासाठी काय करायला हवे? एक अचूक वेळापत्रक तयार करायचे आणि त्यानुसार अभ्यास करायचा. छोट्या छोट्या भागात अभ्यास करायचा. मध्ये आवश्यक आणि योग्य ब्रेक घ्यायचे. वास्तविक उद्दिष्टे ठरवायची ज्यामुळे मुले या प्रोकास्टिनेशनमधून बाहेर पडू शकतील.

●परीक्षेची चिंता, काळजी, ताण : बऱ्याच मुलांना परीक्षेचा ताण वाटतो. चिंता वाटते. मुले खूप काळजी करतात. याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. आपण परीक्षेत चांगला परफाॅरर्मन्स देऊ शकू की, नाही ही भीती मनात असते.

याकरिता काय करता येईल? प्रोत्साहन देणारे वातावरण, मानसिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने संवाद केल्यास मुलांच्या अभ्यासाविषयक सवयी प्रभावी बनतात. यातून ताण, तर कमी होत जातो आणि अभ्यासातील एकाग्रता वाढत जाते. शाळा ही शिकण्याची, विकास होण्याची, आनंदित होण्याची जागा आहे. त्याचबरोबर अतीव ताण, चिंता देखील इथेच निर्माण होते. काही मुलांच्या मनावर याचा परिणाम होतो.मार्क, ग्रेडस्,परीक्षा याचा विचार करत मुलांना असे सारखे वाटत राहते की, आपण नापास होऊ. खूप चिंता वाटते. पण जर मुलांनी ठरवले तर ते यातून नक्कीच बाहेर पडू शकतील. मात्र पालकांकडून त्यांना भावनिक पाठिंबा मिळायला हवा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -