Tuesday, December 10, 2024

सात्यकी

भालचंद्र ठोंबरे

सात्यकी! एक यदुवंशीय योद्धा होता. कौरव-पांडव युद्धात पांडवांच्या सैन्याचा तो सेनापती होता. श्रीकृष्णाचा परमभक्त व मित्र. सात्त्यक नामक एका अधिकाऱ्याचा मुलगा म्हणून सात्यकी. सात्यकी हा दारूक, शैनेय, युयुधान नावानेही ओळखला जातो. कौरव-पांडव युद्ध टळावे या हेतूने पांडवांच्या वतीने कौरवाकडे शिष्टाई करण्यास गेलेल्या श्रीकृष्णासोबत सात्यकी होता. श्रीकृष्णाला भर सभेत अटक करण्याचे दुर्योधनाचे कारस्थान पाहून सात्यकी सभेतच दुर्योधनाला मारण्यासाठी तलवार उपसून धावला, तेव्हा त्याला श्रीकृष्णाने भिमाने केलेल्या प्रतिज्ञेची जाणीव करून देऊन थांबविले.
युद्ध अटळ आहे हे निश्चित झाल्यावर दुर्योधन व अर्जुन दोघेही एकाच वेळेस भगवान श्रीकृष्णाकडे मदतीसाठी गेले. भगवान श्रीकृष्ण त्यावेळेस झोपले होते. प्रथम आलेला दुर्योधन श्रीकृष्णाच्या उशाशी बसला, त्यानंतर आलेला अर्जुन पायापाशी बसला. झोपेतून उठताच श्री कृष्णाची नजर प्रथम अर्जुनावर पडली. भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जूनाला इच्छा व्यक्त करण्यास सांगितले. पण आपण प्रथम आलो तेव्हा पहिले मी मागणार असे दुर्योधनाने म्हटले. ते मान्य करून श्रीकृष्ण म्हणाले की, युद्धात मी शस्त्र हाती धरणार नाही. तेव्हा मी किंवा माझी एक अक्षौहिणी सेना यापैकी काय हवे असे प्रथम आलेल्या दुर्योधनाला विचारले. दुर्योधनाने एक अक्षौहिणी सेनेची मागणी केली. तेव्हा कृष्ण अनायसेच पांडवाच्या बाजूने आले. एक अक्षौहिणी सेनेत २१८७० हत्ती, २१८७० रथी, ६५६१० घोडेस्वार, व १०९३५० पायदळ सैनिक यांचा समावेश असतो. कृतवर्माच्या नेतृत्वाखाली ही एक अक्षौहिणी नारायणी सेना कौरवांतर्फे लढली. सात्यकिने अर्जुनाकडून शिक्षा ग्रहण केली असल्याने कौरवाकडे गेल्यास गुरूच्या म्हणजे अर्जुनाच्या विरुद्ध लढावे लागेल अशी परिस्थिती येईल. त्यामुळे सात्यकीने कृष्णाला पांडवांच्या बाजूने लढू देण्याची विनंती केली व कृष्णानेही ते मान्य केले.

महाभारत युद्धात अर्जुन पुत्र अभिमन्यूला एकटे गाठून सहा ते सात महारथींनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केले व तो मरणासन्न अवस्थेत असताना जयद्रथाने त्याला लाथ मारली. हे ऐकून अर्जुनाने जयद्रथाच्या वधाची प्रतिज्ञा केली. त्यामुळे अर्जुन जयद्रथाचा शोध घेत युद्धभूमीत फिरत असताना युधिष्ठिराच्या रक्षणाची जबाबदारी सात्यकीकडे सोपविण्यात आली. अर्जुनाला अन्य ठिकाणी युद्धात गुंतवून धर्मराजाला बंदी करण्याचा डाव कौरवांनी आखला होता. ही जबाबदारी द्रोणाचार्यांवर सोपविण्यात आली. द्रोणाचार्य युधिष्ठिराला बंदी करण्यास निघाले, तेव्हा सात्यकीने द्रोणाचार्यांशी लढून युधिष्ठिराचे रक्षण केले.

महाभारत युद्धात भुरिश्रवा सोबतच्या युद्धात भुरिश्रवाने सात्यकीला रथाबाहेर ओढून मारण्यासाठी तलवार उगारली असता अर्जुनाने बाणाने तलवारीसह भुरिश्रवाचा हात तोडून सात्यकीचे प्राण वाचविले. सावध झालेल्या सात्यकीने नंतर भुरिश्रवाचा वध केला. भुरिश्रवाचा वध झाल्याचे ऐकून त्याचा पिता सोमदत्त याने सात्यकीशी युद्ध केले. सात्त्यकीने त्यांनाही पराजित करून त्यांचा वध केला. तसेच सात्त्यकीने याच युद्धात एक वेळा नरकासुराचा पुत्र महापराक्रमी भगदत्तलाही पराभूत केले होते.
महाभारत युद्धानंतर पांडवाकडे जिवंत राहिलेल्या व्यक्तींमध्ये सात्यकीचा समावेश होता. युद्धानंतर छत्तीस वर्षांनंतर एकदा सर्व यादव धार्मिक यात्रेनिमित्त नदी तीरावर गेले असता त्या ठिकाणी कौरवातर्फे लढलेल्या कृतवर्माची सात्त्यकीने कृतवर्मा‌‍ने झोपेत असलेल्या पांडव पुत्रांची हत्या केल्याबद्दल टिंगल केली, तर कृतवर्मानेही हात नसलेल्या भुरिश्रवाची हत्या केल्याबद्दल सात्यकीची टिंगल केली. याचे पर्यावसन वादावादीत होऊन नंतर भांडणात झाले. या झालेल्या यादवी युद्धात सात्त्यकीने कृतवर्माचा वध केला, ते पाहून कृतवर्माचे समर्थक सात्यकीवर धावून गेले व त्यांनी सात्यकीचा वध केला. या युद्धात श्रीकृष्ण व बलराम वगळता श्रीकृष्णाच्या यदुवंशाचा नाश झाल्याचे मानले जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -