सुजाता पाटील ( माजी सहा. पोलीस आयुक्त, मुंबई )
पण २१ ऑक्टोबर हा दिवस भारतीय शहीद पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा करतो. सतत का कोण जाणे मला लतादीदींनी गायलेल्या गाण्याची एक ओळ आठवली ‘‘ए मेरे वतन के लोगो… मत भूलो सीमा पर विरों ने है प्राण गवाये, कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आये’’. भारतीय शहीद पोलीस स्मृतिदिनानिमित्त आपोआप डोळे पाणावतात. हृदयाचा कंप सुरू होतो आणि त्या शूरवीरांच्या गाथांची पाने भराभर आठवणीने उघडायला लागतात. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणांची आहुती दिली होती. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी शहीद जवानांना सलामी दिली जाते. त्यानंतर सुद्धा एकेक अशा काही घटना घडत गेल्या की, त्याही मन हादरवून टाकणाऱ्या होत्या. सीमेवर त्याचप्रमाणे भारतीय पोलीस दलामध्ये, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये बरेच जवान, अधिकारी वेगवेगळ्या घटनांमध्ये जनतेची सेवा करत असतात. काही जवान भारतमातेच्या संरक्षणार्थ भारत मातेला प्रिय झाले. त्यांनी त्यांच्या प्राणांची आहुती तुमच्या आमच्यासाठी दिलेली आहे. त्यांच्या हुतात्मेमुळे आज आम्ही जिवंत आहोत. कर्तव्य करत असताना भ्याड अतिरेकी हल्ल्यांमध्ये आम्ही वाचलो ते निव्वळ या शहीद झालेल्या जवानांमुळेच. या माझ्या जवानांचे व अधिकाऱ्यांचे शौर्य शब्दांमध्ये वर्णन करण्यासारखे नाही या ठिकाणी शब्दकोष अपुरा पडतो. कारण हे माझे जवान भारत मातेसाठी नुसते शहीद नाही झाले तर त्यांच्या शहीद होण्यामागे त्यांनी बऱ्याच लोकांचे प्राण सुद्धा वाचवलेले आहेत. त्यांनी अतिरेकी, देशद्रोही यांना यमसदनी पाठवलेलं आहे. या शहीद जवानांचे योगदान आभाळाला गवसनी घातल्यासारखे आहे.
२१ ऑक्टोबर हा दिवस शहीद दिन म्हणून सर्वत्र सन्मानाने साजरा करून हुतात्मा जवानांना अंतकरणापासून सलामी दिली जाते. त्यांच्या शौर्य गाथा आठवल्या जातात. मी १९८७ साली महाराष्ट्र पोलीस दलात पाऊल ठेवले, त्यानंतर २१ ऑक्टोबर शहीद पोलीस दिनादिवशी हुतात्मांना सलामी देण्याचे सौभाग्य मला नेहमीच लाभले. मला या सर्व घटना कालच घडलेल्या आहेत असे का वाटतं का त्याचा थांगपत्ता अजून लागलेला नाही. हुतात्म्यांना आदरांजली देताना हात थरथरतात. आपण कुठेतरी कमी पडत आहोत याची जाणीव निर्माण होते. कारण प्राणाची आहुती देणे म्हणजे भारत मातेसाठी गतप्राण शहीद होणे. किती मोठा सन्मान यासाठी सुद्धा खूप मोठे भाग्य असावे लागते. हा एक सुवर्ण अक्षरांचा इतिहास आहे. ज्या ज्या ठिकाणी भारत मातेच्या पुत्रांचे पुतळे, स्मारक आहेत त्या ठिकाणी समाजातील तळागाळातील लोक सुज्ञ व्यक्ती, विद्यार्थी पोलीस फोर्स इतर स्वतःहून हजर राहून त्यांना आदरांजली वाहिली जाते. जमा असणाऱ्या जनतेला त्यांच्या शौर्यगाथा सांगितल्या जातात.
२१ ऑक्टोबर भारतीय शहीद पोलीस स्मृतिदिनानिमित्त शासनाचे विविध उपक्रम राबविले जातात. तसेच पोलीस विभागातर्फे त्यांची अंमलबजावणी देखील केली जाते. या दिवशी एक प्रकारचा दुखवटा आम्ही पाळतो… २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यामध्ये माझे सहकारी जे शहीद झाले ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. किती भयानक होती ती काळरात्र. माझे सहकारी ज्यांच्या बरोबर मी काम केले ते माझ्या डोळ्यांदेखत धरतीवर पडले. तुकाराम ओंबाळे साहेबांसारख्या माझ्या जवानाच्या शौर्यामुळे कितीतरी लोकांचे प्राण वाचले. माझा बॅचमेट सहकारी शशांक शिंदे हा कर्तव्य बजावत असताना, प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी धावला व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गतप्राण झाला. हे पाहताच जीवाचा आकरंद झाला. करकरे साहेब, कामते साहेब, साळसकर साहेब, संदीप उन्नीकृष्णन सर किती जणांची नावे घेणार. एकापाठोपाठ एक शहिदांचा आकडा वाढत होता. या घटनेने संपूर्ण जनता हादरली होती. आम्ही मुंबई पोलीस सर्व कर्तव्यावर सज्ज होतो. मृत्यूचे तांडव समोर रात्रभर चालू होते. अजूनही माझ्या शूरवीरांच्या शौर्यगाथा सांगताना आपोआप डोळ्यांच्या पापण्यांच्या कडातून अश्रूंचा बांध फूटतो. ते भ्याड अतिरेकी आठवले तरी आपोआप संतापाने हाताच्या मुठी आवळल्या जातात. माझ्या शूर लढवय्या सहकार्यांना मी मुकले, एक खंत शल्य कुठेतरी टोचत असते. हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाच्या घटना, शौर्यगाथा मुलांना, विद्यार्थ्यांना, सर्व पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगाव्यात. नवीन भरती होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्या जाणून घ्याव्यात आणि सर्वांनी त्यावर उपाययोजना सुद्धा कराव्यात.
११ ऑगस्ट २०१३ रोजी रजा अकादमी व अन्य मुस्लीम संघटनांनी आसाम व म्यानमार या राज्यांमध्ये मुस्लीम धर्मीयांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रजा अकादमी व अन्य मुस्लीम संघटनेने एकत्रित आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा काढला होता. सदर मोर्चामध्ये काही समाजकंटक, दंगेखोरांनी घुसखोरी करून त्या मोर्चाला वेगळे वळण लागून हिंसा चालू केली होती. माझी नेमणूक त्यावेळेला माटुंगा वाहतूक विभागात होती. मोर्चातील घुसखोर निदर्शकांनी पोलिसांच्या गाड्यांची मोडतोड केली. त्यात पोलीस जखमी झाले. आझाद मैदान मुंबई येथे १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वतंत्र्य लढ्यातील शहीद सैनिकांना समर्पित पवित्र युद्ध स्मारक आहे. ‘‘अमर जवानत् ज्योती’’ याची दंगलखोरांनी विटंबना केली. शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. माझ्या अंगाचा थरकाप झाला, माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. मी हा अपमान सहन करू शकले नाही आणि घडलेल्या आझाद मैदान दंगलीवर मी एक कविता लिहिली जी “संवाद” या पोलीस पत्रकामध्ये प्रसिद्ध झाली. या कवितेचा विपर्यास दंगलखोरांनी करून मला वेठीस धरले. अमर जवान ज्योतीवर हल्ला करणाऱ्या दंगलखोरांना सजा व्हावी याचे कवितेत विस्तृत वर्णन केले होते. माझ्या जीवितास धोका निर्माण झाला. मला भीती वाटत नव्हती कारण मी माझ्या शहीद जवानांसाठी लढत होते. पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. माझ्या फावल्या वेळेत मी या शौर्यगाथा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असते. २१ ऑक्टोबर शहीद पोलीस स्मृतिदिनानिमित्त जवानांना माझी नतमस्तक आदरांजली. जय हिंद!