साठच्या दशकात जन्माला आलेली पिढी कसोटी क्रिकेट, मराठी व हिंदी चित्रपट, त्यातील संगीत आणि भरभरून वाचन यात रमत त्याचा आनंद घेत वाढलेली. अतुल परचुरेही त्याच पिढीतील होते. बालकलाकार म्हणून वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केलेल्या अतुल परचुरेंनी अनेक नाटके, चित्रपट व मालिका या तिन्ही माध्यमांतून त्या प्रत्येक माध्यमाची वैशिष्टय़े, शैली, गरजा जाणून घेत रसिकांना हसवण्याचे काम केले.
प्रवीण दवणे – ज्येष्ठ साहित्यिक
माझ्या मते, अतुलजी ‘मेरा नाम जोकर’ या राज कपूर यांच्या गाजलेल्या चित्रपटातील नायकाप्रमाणे होते. आपली वेदना झाकून ठेवत इतरांना हसवत राहण्याचा वसा त्यांनी अखेरपर्यंत जपला. आता देहाने ते आपल्यातून निघून गेले आहेत. मात्र दुसऱ्या एखाद्या सृष्टीला आनंद देण्यासाठी, खुलवण्यासाठी तो आत्मा गेला आहे, अशीच माझी भावना आहे. अतुलजींना भावपूर्ण आदरांजली!
अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्याशी माझे बहुपेडी नाते होते. ठाण्यामध्ये बराच काळ त्यांचे वास्तव्य असायचे. त्यांची पत्नी सोनिया परचुरे यांनी अनेकदा माझ्या गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. आमच्यातील नात्यामधला हा पहिला धागा म्हणता येईल. दुसरी बाब म्हणजे आम्हा दोघांच्याही मुली एकाच वर्गात होत्या. त्यामुळे पालक म्हणूनही मी त्यांना पाहिले आहे. ते किती जागरूक पालक आहेत, मुलीवर त्यांचे किती प्रेम आहे, तिच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी किती प्रयत्न केले आहेत आणि ते तिचा सतत कसा विचार करतात, हेदेखील मी जवळून पाहिले. थोडक्यात, कोणाला माहिती नसणारे परचुरे मी पाहिले आहेत. असे रंगमंचापलीकडचे; तरल, हळुवार असणारे अतुलजी खऱ्या अर्थाने माणूसप्रेमी होते. आधी अनेकदा पाहिले असले तरी ‘नातीगोती’ हे नाटक पाहिल्यानंतर त्यांची एक विशेष छबी मनात निर्माण झाली, कारण या नाटकात त्यांनी साकारलेली विशेष मुलाची भूमिका मन व्याकूळ करणारी होती. या कामातून त्यांचे निरीक्षण, चलन स्पष्ट दिसत होते. एकदा गप्पांमध्ये अशी भूमिका साकारण्याच्या मानसिकतेबद्दल विचारले असता ते म्हणाले होते की, केवळ शारीरिकदृष्ट्या अभिनय करून चालत नाही तर त्या व्यक्तिरेखेचे मन कसे असेल, ती व्यक्ती कोणत्या प्रकारे विचार करते हे लक्षात घेऊन अभिनय करावा लागतो. त्यावेळी आपले स्वत:चे मन, विचार बाजूला ठेवत दुसऱ्याच्या मनात शिरत देहबोली निर्माण करण्यासाठी निरीक्षण आणि चलनाला पर्याय नाही. हे सगळे ऐकताना मला अतुलजींमधील चैतन्यशील कलावंत दिसला होता.
‘नातीगोती’ करताना अतुलजी अगदी तरुण होते. अवघ्या २५-२६ वर्षांचे वय असेल. मात्र इतकी आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारून त्यांनी शाबासकी मिळवली आणि त्या नाटकातूनच त्यांचे रंगभूमीशी नाते निर्माण झाले आणि रुजले. नंतर त्यांना अनेकदा रंगभूमीवर बघण्याचा योग आला. ‘विनोदी अभिनेता’ अशी त्यांची ओळखही निर्माण झाली. पण खरे तर मला ते कधीच केवळ विनोदी अभिनेता वाटले नाहीत. कारण विनोदी भूमिका प्रभावीपणे निभावलीच, पण त्याबरोबरीने प्रत्येक भूमिकेचा पोत समजून अभिनय केला. त्याचे अतिशय मोठे उदाहरण म्हणजे अर्थातच ‘व्यक्ती आणि वल्ली’. पुलं असताना अतुलजी पडद्यावर त्यांची व्यक्तिरेखा कशी उरतवतील अशी आमच्यासारख्या पुलं पाहिलेल्या लोकांबरोबरच स्वत: पुलंनाही उत्सुकता होती. मात्र अतुलजींनी कोणालाच निराश केले नाही. या भूमिकेद्वारे त्यांनी लोकांचे मन जिंकले. पुलंची अनौपचारिकता, सहजसंवादी भाव त्यांनी इतक्या सहजपणे आणले की, स्वत: पुलंच बोलत असल्याचे वाटून गेले. स्वत: पुलंनी ‘तू भाई साकार केलास’ असे म्हणत मनमोकळी दाद दिली. पुलंसारख्या व्यक्तीने स्वत: आपल्या व्यक्तिरेखेला दाद देणे ही वाटते तेवढी सोपी बाब नव्हती. पण अतुलजींनी ती मिळवत स्वत:ची क्षमता सिद्ध केली.
एकदा प्रभाकर पणशीकर ‘नाट्यसंपदा’तर्फे माझे ‘कँटीन’ नामक नाटक रंगभूमीवर आणण्याची तयारी सुरू होती. त्यातील कँटीन चाचा या व्यक्तिरेखेसाठी तुमच्या मनात कोणता नट आहे, असे मला विचारण्यात आले. त्यावेळी ओठांवर आलेले पहिले नाव अतुल परचुरे हेच होते. मी त्यांना संबंधित भूमिकेबद्दल विचारले होते. अतुलजींना व्यक्तिरेखा आवडली होती. पण कामाच्या वाढत्या व्यापामुळे हे काम स्वीकारणे जमले नाही. अतुलजींचे वाचन अफाट होते. आम्ही अनेकदा एका व्यासपीठावर बोललो आहोत. त्यावेळी रंगभूमीवर इतके व्यग्र असूनही त्यांचा व्यासंग, वाचनातील वैविध्य, उत्सुकता स्पष्टपणे जाणवायची. एखादा प्राध्यापक वा शिक्षकही वाचनात पुरे पडू शकणार नाहीत, इतके वाचनप्रेम या कलावंताने जपले होते. त्यांना जी. ए. कुलकर्णी, ग्रेस, पुलं विशेष आवडायचे.
सोनिया आणि अतुलजी यांचे सहजीवनही खूप सुंदर होते. संवादी होते. दोघेही कलावंत असल्यामुळे मजेशीरही होते. ते एकमेकांना खूप छान समजून घेत असत. एकदा गप्पांमध्ये तुमच्या घरात कसे वातावरण असते, असे मी त्यांना विचारले होते. तेव्हा हसत त्यांनी उत्तर दिले होते, ‘घरात मी तिच्या तालावर नाचतो…’ एकूणच हा सतत हसतमुख असणारा माणूस होता. इतका दुर्धर आजार जडूनही त्यांनी हार मानली नव्हती. विकल रूप असूनही ते आनंदी होते, पण त्यांना तसे बघून आम्ही मात्र खचत जात होतो. ते पुन्हा उभे राहिले पाहिजेत, असे सतत वाटत होते. समाजाला निखळ, निर्मळ आणि निर्विवाद आनंद देणारे असे लोक देवाघरचे प्राजक्त असतात. त्यामुळे असे चेहरे पडद्याआड गेले की, रंगभूमीचा देव्हारा प्राजक्ताची फुले कोमेजल्यानंतर होतो तसा सुना, मुका आणि एकाकी झाल्यासारखा वाटतो.
अर्थात गंभीर आजारातून सावरत त्यांनी ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकाच्या तालीमही सुरू केली होती. हे ऐकून आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता. कारण बरेचदा कलावंताला केवळ डॉक्टरांनी दिलेले औषध पुरत नाही. समोर प्रेक्षक असतात, टाळ्यांचा गजर होतो, हशा पेरला जातो आणि त्यातून कलावंताच्या नसानसात पेरली जाणारी ऊर्जा पुनरुज्जीवित केली जाते. त्याला जगण्याची नवी संधी मिळते. अतुलजींबाबत हेच होईल अशी आशा होती. ‘अलिबाबा आणि चाळिशीतील चोर’ या चित्रपटातील त्यांचा वावरही सुखावून गेला होता. प्रख्यात कलावंतांबरोबरची त्यांची केमिस्ट्री, मिश्कीलपणा भावला होता. अतुलदादा फ्रेश वाटले, असे उद्गार कुटुंबीयांकडूनही निघाले होते. इतक्या दुर्धर व्याधीतून उठून कामाला लागल्याबाबत सगळ्यांनाच त्यांचे कौतुक वाटत होते. आता ही व्याधी भूतकाळाचा भाग झाली असून यापुढे तिची आठवणही होणार नाही, इतपत आमच्या घरात बोलणे झाले. मात्र अशी निश्चितता वाटत असताना अचानकच त्यांच्या निधनाची बातमी आली आणि काय बोलावे तेच समजेना. अर्थात हे वास्तव स्वीकारण्याशिवाय हाती काही राहत नाही. माझ्या मते, अतुलजी ‘मेरा नाम जोकर’ या राज कपूर यांच्या गाजलेल्या चित्रपटातील नायकाप्रमाणे होते. आपली वेदना झाकून ठेवत इतरांना हसवत राहण्याचा वसा त्यांनी अखेरपर्यंत जपला. आता देहाने ते आपल्यातून निघून गेले आहेत. मात्र दुसऱ्या एखाद्या सृष्टीला आनंद देण्यासाठी, खुलवण्यासाठी तो आत्मा गेला आहे, अशीच माझी भावना आहे. अतुलजींना भावपूर्ण आदरांजली!
आता आठवणींची सोबत
अतुल परचुरे याच्या रूपाने भाषेवर प्रभुत्व असणारा एक गुणी अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. तो सामाजिक, सांस्कृतिक भान असणारा गुणवंत माणूस होता. माझ्या दृष्टीने बोलायचे, तर एक चांगला मार्गदर्शक गमावला आहे. मुंबईत आल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात अतुलने दिलेला पाठिंबा कधीच विसरू शकत नाही. बदलत्या स्थितीत तग धरून राहण्याची; आलेल्या संकटांना, अस्थिरतेला सामोरे जाण्याची मानसिक तयारी असली तरी बाहेरून आलेल्या माणसांना एखाद्याच्या पाठिंब्याची आत्यंतिक गरज असते. त्यांनी ‘सगळे चांगलेच होईल रे…’ असे म्हटले की, आश्वस्तता वाटते. काम करण्यास उभारी येते. अतुलने मला हाच आधार दिला. तेव्हा तो व्यावसायिक रंगभूमीवर स्थिरावलेला, कामात व्यग्र असणारा लोकप्रिय कलावंत होता. स्वाभाविकच त्याची साथ मोलाची ठरली. आमच्या गप्पांमध्ये अनेक विषय असायचे. आपण नवे काय ऐकले, काय पाहिले याबाबत कायम चर्चा व्हायची. लताबाईंची गाणी हा आम्हा दोघांमधील समान धागा होता. त्यांची दुर्मिळातील दुर्मीळ गाणी एकमेकांना पाठवून आम्ही त्यावर बोलत बसायचो. असेच एकदा एका कार्यक्रमाला एकत्र होतो. अचानकच तिथे ‘या चिमण्यांनो परत फिरा रे…’ हे गाणे लावले गेले आणि ऐकत असताना नकळत दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळू लागले. ‘काय आहे हे…’ असे आम्ही डोळ्यांनी एकमेकांशी बोलत होतो. सांगायचा भाग म्हणजे इतक्या पातळीपर्यंत संवेदना जुळलेल्या होत्या. आता तो जगात नाही, पण अशा अनेक आठवणींच्या रूपाने नेहमीच माझ्याबरोबर असेल.