प्रा. देवबा पाटील
एके दिवशी जयश्री आपल्या डोळ्यांची उघडझाप करीतच घरात आली. ते बघून तिला “असे काय करतेस गं?” असा आईने प्रश्न विचारला. “आई आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची सतत उघडझाप का होते?” जयश्रीने उलट आईलाच प्रश्न विचारला. आई म्हणाली, “आपल्या पापण्या या डोळ्यांच्या संरक्षणाचे काम करतात. या पापण्यांमध्ये खूप स्नायू असतात. आपल्या डोळ्यांच्या आतील बुबुळ व बाहुली अशा नाजूक भागांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची सतत उघडझाप होत असते. ही एक उत्स्फूर्त म्हणजे अनैच्छिक क्रिया आहे.” “ ए आई, अमुक डोळा फडफडणे आपल्यासाठी शुभ व तमुक डोळा फडफडणे अशुभ असते असे म्हणतात. ते खरे असते काय गं? डोळा कसा काय फडफडतो?” जयश्रीने विचारले. “ एखादेवेळी काही कारणाने अश्रुरुपी द्रव डोळ्यांत नीट न पसरल्याने डोळे स्वच्छ होण्याच्या नैसर्गिक क्रियेत जर काही अडथळा आला असेल तर मेंदूकडे तसा संदेश जातो. मग मेंदू पापणीच्या स्नायूंना अधिक वेगाने कार्यरत होण्याचा आदेश देतो. त्यामुळे पापणीची उघडझाप अतिशय वेगाने होते. त्यालाच लोक पापणीचे फडफडणे किंवा डोळा फडफडणे असे म्हणतात व त्यासोबत शुभ-अशुभाच्या अशास्त्रीय अशा अश्रद्ध कल्पना चिकटवतात. त्या साफ
खोट्या आहेत.
पापणीची उघडझाप वेगाने झाल्याने अश्रूंची निर्मिती पटकन होते व ते डोळ्यांत लवकर पसरतात नि डोळे चांगले राहतात; परंतु धूळीमुळे वा डोळ्यांत कचरा गेल्याने पापण्यांची जी वेगाने उघडझाप होते ती मात्र प्रतिक्षिप्त क्रिया असते. जास्त हवेने डोळे कोरडे पडू नये म्हणूनसुद्धा ही क्रिया नैसर्गिकरीत्या होते. पापण्यांच्या कडेला जे केस असतात त्यांच्यामध्ये तेल तयार करणाऱ्या ग्रंथी असतात. पापण्या बंद होण्याच्या क्रियेत या ग्रंथींतून तेल बाहेर पडते व ते पूर्ण डोळ्यांवर पसरते. त्यामुळे डोळे कोरडे होत नाहीत; परंतु ज्यांच्या एखाद्या डोळ्याच्या पापण्यांचे हे स्नायू अति कमकुवत असतात त्यांच्या त्याच डोळ्याच्या पापण्यांची काहीच कारण नसतांनासुध्दा सतत उघडझाप होत असते.” आईने स्पष्टीकरण दिले. “ आई, आपल्या पापण्यांची हालचाल किंवा उघडझाप ही वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी असते की, एकसारखी असते?” जयश्रीने प्रश्न केला. “ मानव सहसा दर पाच सेकंदांनी पापण्यांची हालचाल करत असतो; परंतु मानवी डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप किंवा हालचाल ही कधीच सारखी नसते, तर ती वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी असते. मानवाच्या सभोवताली घडणाऱ्या बहुविध क्रियांना मानवाच्या शरीराचे प्रतिसाद हे निरनिराळे असतात. त्यामुळे पापण्यांची उघडझाप ही मानवाच्या विविध क्रियांप्रमाणे निरनिराळी होत असते. म्हणजे पापण्यांच्या उघडझापेचा वेग आणि कालावधी हा आपण करीत असलेल्या कामानुसार बदलत असतो. तसेच मानवी मनातील भावभावनांवरसुद्धा ती अवलंबून असते व त्यानुसारही पापण्यांची हालचाल ही वेगवेगळी होत असते. उदा. बोलताना जी पापण्यांची उघडझाप होत असते त्यापेक्षा वाचताना पापण्यांची जी हालचाल होते ती कमी असते. कारण आपली नजर पुस्तकावर स्थिर असते. व्यक्ती जेव्हा थकलेली किंवा कंटाळलेली असते तेव्हा पापण्यांची हालचाल त्याहीपेक्षा कमी वेळा होते. साधे चालतांना पापण्यांची हालचाल कमी असते, तर वाहन चालवतांना पापण्यांची उघडझाप वाढते. कारण आपल्याला वाहन चालवताना जास्त सतर्क राहावे लागते.
“ आई काल कांदा कापतांना डोळ्यांतून पाणी आले होते. तसेच रडतांना डोळ्यांतून अश्रू का येतात व नाकातूनही का पाणी येते?” जयश्रीने प्रश्न केला. “ वाहती हवा, थंड वारा, विषारी वायू यांमुळे डोळ्यांत अश्रू येतात. तसेच दु:ख, भीती, राग यांसारख्या मनोविकारांनी भावनांचा उद्रेक झाला म्हणजे अश्रुग्रंथींवरील नियंत्रण सुटते व भरपूर प्रमाणात अश्रू निर्माण होतात व ते डोळ्यांतून बाहेर वाहू लागतात. कधीकधी आनंदाचा अतिरेक झाल्यानेही किंवा मोठमोठ्याने खूप वेळ हसल्यानेसुद्धा अशाचप्रकारे खूप अश्रू पाझरतात. त्यांना आनंदाश्रू म्हणतात. डोळे आणि नाक यांना जोडणाऱ्या नासाश्रुवाहिनीद्वारा हे अश्रू नाकात जातात व नाकातूनही बाहेर पडतात. अश्रूंमध्ये क्षार व पाणी असल्याने त्यांची चव किंचितसी खारट असते.” आईने समजावून सांगितले. अशी त्यादिवशी त्यांची चर्चा संपली.