अमेरिकन सरकारच्या गुप्तचर दस्तऐवजांवरून झाले उघड
इराण : गाझा,दक्षिण लेबनॉननंतर, इस्रायली सैन्य इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाची दोन कागदपत्रे लीक झाली असून, इस्त्रायली सैन्य इराणवर हल्ला करू शकते, असे उघड झाले आहे. इराणच्या विरोधात प्रत्युत्तरादाखल होणाऱ्या कारवाईच्या इस्रायलच्या योजनांची आत्यंतिक गोपनीय माहिती लिक झाल्याने मोठी खळबळ उडाली.अमेरिकी संवेदनशील कागदपत्रे यामध्ये इराणवर संभाव्य हल्ल्यासाठी इस्रायलची लष्करी तयारी उघड करणारी दोन उच्च वर्गीकृत यूएस गुप्तचर कागदपत्रे लिक झाली आहेत. गुप्तचर माहिती लीक झाल्यामुळे अमेरिका खूप चिंतेत आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे. १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी ही कागदपत्रे ‘मिडल ईस्ट स्पेक्टेटर’ या इराणशी जोडलेल्या टेलिग्राम खात्यावर प्रकाशित करण्यात आली होती. या दस्तऐवजांमध्ये इराणवर संभाव्य हल्ल्यासाठी इस्रायलच्या तयारीची माहिती आहे.
गुप्तचर दस्तऐवजांमध्ये आहेत टॉप सिक्रेट
या दस्तऐवजांचे वर्णन टॉप सिक्रेट म्हणून करण्यात आले आहे. त्यांच्यावर अशा खुणा आहेत ज्यात असे म्हटले आहे की ते फक्त यूएस आणि त्याच्या ‘फाइव्ह आयज’ (यूएस, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड आणि ब्रिटन) मित्रांच्या मालकीचे असावे. दस्तऐवजातील हल्ल्याच्या तयारीमध्ये एअर-टू-एअर रिफ्युलिंग ऑपरेशन्स, शोध आणि बचाव कार्ये आणि संभाव्य इराणी हल्ल्यांच्या अपेक्षेने क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करणे समाविष्ट होते. यामध्ये इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायल काय तयारी करत आहे हे सांगण्यात आले आहे. नॅशनल जिओस्पेशिअल-इंटेलिजन्स एजन्सीने संकलित केलेल्या दस्तऐवजात असे म्हटले आहे की, या योजनेत इस्रायलमध्ये दारूगोळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा समावेश आहे. दुसऱ्या एका दस्तऐवजात इस्रायली हवाई दलाच्या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांशी संबंधित सरावाची माहिती देण्यात आली आहे. इराणवर हल्ला करण्याच्या तयारीसाठी हा सराव केला जात असल्याचे मानले जात आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, कथित पेंटागॉन दस्तऐवजांपर्यंत कोणाची पोहोच होती याची तपासणी केली जात आहे. अशा कोणत्याही लीकची पेंटागॉन आणि यूएस गुप्तचर संस्था तसेच एफबीआयद्वारे चौकशी केली जाईल. एफबीआयने टिप्पणी करण्यास नकार दिला. हे दस्तऐवज एखाद्या निम्न-स्तरीय यूएस सरकारी कर्मचाऱ्याने घेतले असावेत असे प्राथमिक संकेत आहेत.