डॉ. वीणा खाडिलकर (लेखिका, राष्ट्रीय कीर्तनकार)
जाऊ स्त्री हृदयाच्या गावा |
घेऊ तेथेची विसावा ||
स्त्री मनाची कोमलता निर्मळ स्वभावत: अतूट प्रेमळता, सहज स्वभावता, हे स्त्री मनाचे स्वभावधर्म आहेत. तसेच प्रकट भावनांचा तो मूक अाविष्कारही आहे. महिला संतांच्या काव्यातून हा प्रत्यय नक्कीच येतो. विशेषत: तेराव्या शतकातील राजाई, गोणाई, निर्मला, सोयराबाई आदींच्या काव्यातूनही होणारा भावभावनांचा सहज अाविष्कारदेखील याची साक्ष देऊन जातात. संत नामदेवांची आई गोणाई आपला ‘नाम्या’ पोटापाण्यासाठी आवश्यक असलेली शिंपी कामाची कला शिकून कपडे शिवण्याऐवजी सदैव देव-देव करीत बसतो. त्याने संसाराला हातभार लावण्यासाठी सुई-दोरा हाती घ्यायलाच हवा. पण या प्रेमभऱ्या भावनेतून चिंतेचा सूरही स्वाभाविक उमटतो.
गोणाई म्हणे नाम्या वचन माझे ऐक । पोटीचे बालक म्हणोनी सांगे । शिवण्या-टिपण्या घातलेसे पाणी । न पाहसी परतोनी घराकडे। कैसी तुझी भक्ती या लौकिका वेगळी । संसाराची होळी केली नाम्या ।।
अशी आईच्या अंतरीची उमळून येणारी कळ चिंता पाहता पाहता काव्यरूप घेते. भक्त पुंडलिकालाही गोणाई फटकारते,कासया पितृभक्ती पुंडलिके केली ।विवसी आणिली पंढरीसी।।
विठ्ठलालाही आळवणी करतानाही काहीसे फटकारतच गोणाई म्हणते, तू कृपेच्या कोवळा म्हणती विश्वजन। त्या तुझे निर्वाण कळले नाही ।‘माझा नामा, माझं लेकरू मला परत कर’ म्हणून व्याकूळ होऊन अश्रू गाळते.
संत नामदेवरायांची पत्नी राजाईदेखील आपल्या पतीलाच प्रश्न करते.
लावोनी लंगोटी झाले ती गोसावी।
आमुची ठेवाठेवी कोण करील ।।
आपली वेदना राजाई मध्यरात्री ‘रखुमाई’कडे कळवळ्याने कथन करते.
‘अहो रखुमाबाई विठोबासी सांगा।
भ्रतारासी का गा वेडे केले ।।
असा उद्वेग व्यक्त करीत आपल्या संसाराचे वाटोळे झाले !
म्हणणारी ही राजाई आपल्या पतीचा नामदेवाचा भक्तीतील अधिकार जाणते तरीही देवासमक्ष क्रोध व्यक्त करते. म्हणूनच ही त्या माऊलीची ही विरोधाभक्ती कोणासाठी हो…? हीच तर तफावत असते स्त्री हृदयाची…!
संत सोयराबाई संत चोखामेळा यांची पत्नी. चोखोबांना जशी नामदेवांच्या भेटीची, त्यांच्या रसाळ कीर्तन श्रवणाची ओढ असे. तशी सोयराला नामदेवांच्या घरी जाऊन जनाई, गोराई नि राजाई यांना भेटून त्यांच्याशी गुजगोष्टी करायला अतिशय आवडायचे.
संत ज्ञानदेवांच्या मांदियाळीतील सर्वच संतांनी ‘आवडीने भावे हरिनाम घेसी’ असे आपापल्या काव्यातून सांगितले आहे. अर्थात ‘आधी केले मग सांगितले!’ या उक्तीनुसार कृती, उक्तीतून समन्वय साधत सांगितले. मग सोयराही तर आधी नामाचा छंद लावून घेते. आत्मसुखाचा आनंद त्यातून रोमरोमी भेदून घेते. त्यात जीवन संसारातील पावलोपावली वाट्याला येणाऱ्या यातना, अवहेलना सारं सारं विसरते अन् अंती शांतिसरिता होऊन नाम जपात रमते! सोयराबाईंनी काढलेले हे आत्मप्रचीतीचे बोल दिशादर्शक नव्हेत काय?
खरं तर मेलेली जनावरे ओढून नेण्याचे अत्यंत अवघड काम केवळ जन्माने वाट्याला आलेल्या संत चोखोबांची जी वाट्याला आलेली दु:ख होती ती ढीगभर सोबत असताना त्यांची पत्नी म्हणून त्याच्या जखमा अंतरी काय कमी सलत असणार? त्यात पतीला लागलेला विठ्ठल भक्तीचा, विठुनामाचा लळा जोपासताना पडणारा प्रपंचाचा भार सोसत सोयराने पतीला त्यापासून न तोडता उलट त्या मार्गाशी त्यातील नामाशी स्वत:ला जोडून घेतले ! तसे तर ‘जोडतो तो धर्म ! नि तोडतो तो अधर्म !’
यावरून आजची स्त्री ही संसारासाठी वेगवेगळ्या स्तरावर लढा देत संसारासाठी, परिवाराकरीताच हातभार लावत असते पण तिचे मन, भावना, जाणिवा, अमूर्त राहतात, दडपल्या जातात असे चित्र प्रत्येक घरात असते.असे म्हणतात मग सोयराने स्वकृतीद्वारा स्वधर्म तर सांगितला- सर्वार्थाने अध्यात्म अंगीकारून समाजाला आपल्या सहज सुंदर अभंग – काव्यातून वस्तुपाठ दिला ! आत्मानुभव कथन केला.
सोयरा म्हणे माझा जीवप्राण तुम्ही ।
आणिक तो आम्ही दृढ धरा ।।
विठ्ठलाला सोयराने आपल्या अनन्य भक्तिभावाने असे आपलेसे करून घेतले की, तिला आता प्रपंचातील ‘नित्य दिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती असताना प्रत्येक कसोटीच्या क्षणी आपल्या सोबत आपला जीवाचा जीवलग प्राणसखा विठुरायाच आहे! हा अंतरीचा दुर्दम्य विश्वासच तिला उदंड बळ देत असे! त्यामुळे तिच्यातील भयगंड मावळला. निर्भय होऊन तिला प्रपंच नि परमार्थ साधता आला. मानव जन्म दुर्लभ असे म्हटले जाते त्यात स्त्री जन्म मिळणे म्हणजे शाप की वरदान…!! असा आपल्यासारख्या सामान्य स्त्रीच्या मनात संभ्रम निर्माण होतो. यावर एकच सांगावेसे वाटते, स्त्री मन हृदय भावना अंतस्थ हृदयातून समजणे देवाला ही कठीण गेले मग जोडीदाराची काय कथा…!!
सोयराबाईंचे पाहा ना…! भक्तिरंगात रंगून गेली असली तरी तिला प्रत्यक्ष प्रपंचात प्राणांतिक प्रसंगांना सामोरे जाण्याच्या दिव्यातून नेहमीच जावे लागे. स्पृश्य-अस्पृश्य भेद! या रूढी-परंपरांचे जोखड! त्यामुळे जागोजागी होणारी जीवाची फरपट! याचे शल्य सोयराच्या मनातून व्यक्त झालेले दिसते…!
अंतरीची शुद्धता, निर्मळता नि सात्त्विकता यांची साक्षात धारणकर्ती असूनही समाजाने मला दूर ठेवावे! आपल्या सावलीचाही विटाळ मानावा!
विठ्ठला…
देहासी विटाळ म्हणती सकळ ।
आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध।
देहीचा विटाळ देहीच जन्मला ।
सोवळा तो झाला कवण धर्म ।।
असा प्रश्न सोयराच्या मनात उपस्थित व्हावा? या केवळ या सर्व संकल्पना संकुचितपणाच्या द्योतक आहेत! वास्तविक ‘देहाचा विटाळ’ ‘आत्म्याला’ असतोच कुठे? आत्मा तर सर्वंकष निर्लेप आहे…!! कोणत्याही अक्षरांच्या शाळेत न जाताही सोयरासारख्या स्त्रिया केवळ भक्तीच्या अनुभूतीच्या आधारे आत्म्याची ओळख करून देतात नि तसा सर्वसामान्यांनाही व्हावा. या सामाजिक जाणिवेने त्या लोक कल्याणास्तव आपल्या कवितेतून असे आपले अनुभव विश्व साकारतात ! एका स्त्रीची बौद्धिक क्षमता परिवारास जाणवते की, नाही हा संशोधनाचा विषय…! आजच्या युगातील प्रत्येक स्त्री ही काही विशेषत्वने कार्य करीत असते पण तिला ही आजच्या युगातील अनेक संकटे, अनेक कसोट्या, अनेक अडथळे पार करावेच लागतात. त्यांच्याही अडथळ्यांची सुरुवात घरातूनच होत असते, पण तिची हाक कोण ऐकतो…? म्हणून म्हणतात की, अवघ्या विश्वाची स्त्री कथा हीच…!
अवघे सुखाचे सांगाती । दु:ख होता पळती आपोआप ।।
सोयराबाई हे वैश्विक सत्य अगदी सहज सांगून (जातात) हे स्त्रीयांचे सामाजिक शैल्यही सांगताना, त्यांनी अशा या स्त्री जीवन सूत्रांचाही सहज परिचय करून दिला आहे…! व्यक्त होणे हा मानवी स्वभावधर्म आहे.
बैसुनी एकांती बोलू गुजगोष्टी ।
केधवा भेटसी बाई मज।।
ही नीत नव्हे बरी । म्हणे चोखियाची महारी।।
अशा साक्षात विठ्ठलाशी गुजगोष्टी करू इच्छिणारी सोयराबाई अंतर्बाह्य किती निर्मळ आहे या वरून तरीही स्त्री हृदय जाणावे हे ध्यानी येते.संत साहित्यातील असे आत्मरंगी रंगून आत्मनिर्भर भावविश्व साकारलेले स्त्रीरचित काव्य तसे बेतानेच उपलब्ध आहे. स्त्री पुरुष हा भेद त्याही काळात होता का असे वाटावे इतपत स्त्री संत काव्य आजही दुर्मीळ आहे. सोयराबाईंचेही अवघे ‘साठ’च अभंग गाथेत सापडतात…? त्यातून व्यक्त होणं, कोंडलेल्या स्त्रियांच्या भावभावनांचे कितीतरी विविधरंगी पदर सापडतात. त्यांच्या प्रापंचिक जीवनाची झालेली हेळसांड, फरपट कदाचित अव्यक्त राहावी जणू हाच हेतू असावा की, काय असे वाटण्या इतपत दुर्लक्षित स्त्री संत असाव्यात असे वाटते. काळ बदलला, प्रगती झाली, मुलगी शिकली पण स्त्री समजली का हेचि तो विठ्ठल जाणे…!! प्रत्येकाच्या संसाराच्या व्यथा नि कथा आयुष्यभर अशा काही चालत राहतात की ‘अरे संसार संसार ।
जसा तवा चुल्यावर ।
आधी हाताला चटके ।
तेव्हा मिळते भाकर ।।’
असे आधुनिक काळातही संत ‘बहिणाबाई चौधरी’सारख्या कवयित्रीला म्हणावेसेच वाटले.
त्या माऊलीसही चटक्यांचा संसारानुभव घेत-घेत उपदेशात्मक व्यक्त व्हावेसेच वाटले.
पण अंतिम सत्य हे की, प्रपंच व परमार्थ या दोन्ही पातळ्यांवरून त्यांनी समर्थपणाने वाटचाल करून आत्महित कसे साधता येते? हेही मोठ्या विश्वासाने कथन केले आहे. हीच अंतिम सकारात्मकता मनी धरावी.
मरावे परी कीर्ती रूपे उरावे l हेच ध्यानी धरावे l
त्याचबरोबर ज्याला धड ‘प्रपंच कळत नाही !’ त्याला स्वत:चे हित नेमके कशात आहे? हेही कळत नाही ! मग अशी अज्ञानी माणसे संसारात सुखी राहू शकतील का बरे? संसार दु:ख मूळ असे संत म्हणतात पण स्त्री संत दु:ख वेशीवर टांगून केवळ कोरड्या निषेधाचे नारे न लावता समतेचा प्रेममंत्र जनता जनार्दनाच्या हृदयांपर्यंत पोहोचवतात. नुसते शिव शवा समान आहे व नुसती शक्ती अशक्त आहे. राक्षसासमान आहे असे आपण मानतो, मग स्त्री संत अप्रचलित का? हा प्रश्न निरुत्तरच राहतो.
तेव्हा स्त्री संतचरित्रांतील लक्षवेधी प्रसंग चित्रण करणाऱ्या युगप्रवर्तक स्त्रीसंतांची महती जाणून घेण्यापूर्वी मन, हृदय, भावना समजून घेणे अधिक योग्य होईल.
अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ।।
मी-तूपण गेले वाया । पाहता पंढरीच्या राया ।।
नाही भेदाचे ते काम । पळोनी गेले क्रोध काम।
असा स्त्री संतांच्या बाैद्धिक अनुभूतीचा आनंद घेणे हाच भाव मनी असावा l
त्यांची शब्द काळाकाळावर मात करू शकते ही ताकद, तो प्रभाव महिला संतांमध्ये होता हे त्यांचे लेखनवैभव सिद्धच आहे ! म्हणून आधुनिक स्त्रियांनी आदर्श मानावे l व पुरुषांनी जाणावे…!!