नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड
एकनाथ आव्हाड हे बालसाहित्यकार म्हणून सर्वदूर परिचित आहेत. त्यांचा साहित्य प्रवास हा एककेंद्री, बालांसाठी राहित्याने, आणि इतर लेखकांनी साहित्य आणि बालसाहित्य या दोन्ही साहित्य प्रकारांत लेखणी चालवल्याने एकनाथांचे बालसाहित्यातील स्थान अढळ ध्रुवासारखे निश्चित झाले आहे. त्यांना उत्कृष्टतेचे परिमाण आहे. गतिमानता आहे. काव्यात्मता, गेयता आहे. महानगरपालिकेच्या शाळेत, छोट्या मुलांच्या जगात रमणारा हा शिक्षक मी स्वत: पाहिला आहे. मुलात मूल होणे सोपे नाही, हे का मी आपल्याला नव्याने सांगायला हवे? एकनाथांना ते सहजी जमले आहे. त्यांची गेल्या २५ वर्षांत ३० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सगळीच्या सगळी बालांसाठीच लिहिलेली आहेत. नामवंत प्रकाशन संस्था त्यांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी उत्सुक असतात. सुंदर चित्रांनी ती सजवितात आणि देखण्या दिमाखात ती प्रकाशित करतात. हे एकनाथांचे भाग्य आहे. ‘किशोर’सारखी मासिके त्यांच्या कवितांना ठळक मानाचे स्थान देतात तेव्हा मनास आनंद वाटतो. एकनाथ आहाड यांच्या साहित्य प्रवासावर नजर टाकली तर, दिल खूश हो जाता है। साधी, सोपी, बालसुलभ कथा कल्पना, आकर्षक शब्द, नादमयता आणि नाट्यमयता या दोहोंचा मधुर मिलाफ यामुळे वाचकही भारावून जातात. अथ पासून इतिपर्यंत वाचत राहतात. आपल्या मुलांना भोवती बसवून त्या कवितांचे साहित्य प्रकाराचे प्रकट वाचन करतात. बच्चेकंपनीस आनंद होतो. सुख मिळते. ते त्यांच्या निरागस चेहऱ्यावर उमटते आणि उमलते. याहून कोणते भाग्य हवे हो? एकनाथ आव्हाड हे त्या अर्थाने, बालांचे आवडते साहित्यकार आहेत.
एकनाथ आव्हाड हे एक उत्तम शिक्षक आहेत. उत्तम शिक्षक कसा असतो? जो सर्व मुलांवर सारखेच प्रेम करतो. मी शिक्षणक्षेत्रात लहान मुलांवर निस्सीम प्रेम करत २७ वर्षे काम केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यात एखादा तरी गुण असतोच असतो. कोणी दयाळू असतो, तर कोणी मदतशील. कोणी हुशार असतो, तर कोणी गणिती! ‘मराठी’ हा विषय माझ्या प्रीतीचा. त्यात मी रमून जाई. गिरिजा कीर या लेखिकेवर मनापासून प्रेम केले मी! असो, माझ्याबद्दल खूप बोलले मी! ही लेखणी एकनाथांचे साहित्यिक गुणवैशिष्ट्यावर लेख लिहिण्यासाठी वापरण्याची आहे याचे मला भान आहे. एकनाथ आव्हाड यांनी इतर साहित्यावर लक्ष केंद्रित केले नाही. त्यांना बालांच्या जगात रमावेसे वाटले. लिहावे बालांसाठी, कथा सांगाव्यात बालकांच्या जगातल्या (मग प्रेक्षक मोठे असले तरी चालतात. कधीतरी ते लहानच होते ना? लहानपणीच्या आठवणी जागवणे त्यांना आवडतेच ना? मग बरं!) एकनाथ आव्हाड यांच्या या नव्या सुंदर पुस्तकांत वेगवेगळ्या छान छान तीस कविता आहेत. प्रसिद्ध चित्रकार त्या नटविणार आहेत. मुद्दा लेखनशक्तीचा आहे. मुलांना तुम्ही लिहिलेले किती आवडते? याचा आहे. बालप्रेक्षक ‘बेक्कार’, ‘झक्कास’‘जम्याऽऽ‘ असे अभिप्राय न डरता देतात. आवडलेले साहित्य त्यांच्या चेहराभर दाद देते.
एखादी गोष्ट त्यांना रडवते. एखादी मनमुराद हसवते, तर एखाद्या गोष्टीच्या श्रवणाने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आनंद पसरतो. ह्या साऱ्या भावभावनांचा खुला खेळ एकनाथ आव्हाड आपल्या साहित्य प्रकारात मांडतात, ज्यात छोटे मोठे सारेच मश्गुल होतात. आनंदाचे हे वाटणे अविस्मरणीय आहे. मुख्य म्हणजे ‘बालसाहित्य’ या विषयावरच जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे एकनाथांची या विषयावर ‘मास्टरी’ झाली आहे. बालांना काय आवडते, काय आवडत नाही हे त्यांच्या सहवासात रमणाऱ्या या त्यांच्या आवडत्या शिक्षकाला चांगले समजते. आबालवृद्धांना त्यांचे लिखाण आवडते. रुचते आणि ते ही कथाकथन, कविता पठण हा कार्यक्रम मोठ्या आवडीने आणि सातत्याने करतात. मला आठवते, एका कार्यक्रमात त्यांच्या कविता सादरीकरणाचे कौतुक मा. नितीन गडकरी यांनी खुल्या मनाने केले होते. एकनाथांना मोहरून जातांना मी पाहिले आहे.
आता येणाऱ्या पुस्तकात “मैत्री आमची भारी” या कवितांच्या पुस्तकात एकून ३० कविता आहेत. हे बालकवितांचे पुस्तक असल्याने त्यांची सुंदर चित्रांनी सजावट ओघानेच आली. बहुधा संतोष धोंगडे चित्रे काढतील. अर्थात त्यांच्या वेळाचे गणितात हे पुस्तक बसले पाहिजे! प्रत्येक साहित्यकृतीचे एक भाग्य असते. मला आठवते त्यांची (एकनाथांची) एक कविता. “सविता पाटेकर-वर्गात गैरहजर” अशा ओळी माझ्या पक्क्या स्मरणात आहेत. एकनाथ कवितांचे सादरीकरण फार सुरेख, फार प्रभावीपणे करतात. ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेण्याची अवघड कला त्यांना उत्कृष्ट साधली आहे. एका चांगल्या शिक्षकाला वर्गात हुशारी गाजवणाऱ्या मुलाचे कौतुक असतेच असते पण कोणी एखादं चुकलं कोकरू त्याच्या नजरेतून निसटत नाही ही का बरं गैरहजर राहिली? अशी चुटपुट एका उत्तम शिक्षकाला लागतेच लागते.
एकनाथ आव्हाड,“मैत्री आमची भारी” या ३२ व्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मजकडून खूप खूप शुभेच्छा आणि मगंल आशीर्वाद.
आपले हे ३२ वे पुस्तक! इतर ३१ पुस्तकांसारखेच वाचकांचे लाडके होवो ही शुभेच्छा. साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार तरुण वयात लाभलेला हा कवी लेखक-बालाच्या आणि प्रौढाच्या जगात मानाचे पान पटकावो अशा शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद!
‘जगी सर्वत्र नाव होवो’ ही शुभकामना. राज्यपुरस्कार मिळो ही सदिच्छा!