माेरपीस – पूजा काळे
मी मराठी, अभिमान मराठी. इथे मराठीचीये नगरी. मराठी भाषेचा आनंद सोहळा आपण नेहमीच अनुभवतो, तसा तो नुकताच अनुभवला. वाचन प्रेरणा दिनी तो जपण्याचे आश्वासन दिले. अटकेपार गेलेला राजभाषा मराठीचा झेंडा प्रत्येकाच्या तनामनात आहे. राजभाषेच्या निमित्ताने सोनियाच्या पावलांनी दारात आलेल्या साहित्य, संस्कृतीची नवनवीन दालनं निर्माण होतील, जी पाहायला आणि वाचायला मिळतील. ज्यामुळे मराठी भाषेचा इतिहास पुनरुज्जीवित होऊन जगासमोर येईल. त्याचप्रमाणे साहित्यातील विविध रूप आणि अंग त्यायोगे वाचता येतील. समृद्ध भाषा साहित्याला फुलवेल. भाषेत रमणाऱ्यांसाठी ती आनंदी खूण ठरेल.
त्याचे असे झाले की, मागे एकदा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ प्रतिभावंत कवींना ऐकण्याचा योग आला. दस्तुरखुद्द कवी बोलताना मुखोद्गत कविता तळपू लागली. लख्ख प्रकाशाने भारावू लागली. “कवी जेव्हा बोलतो” या ओळीपाशी बराच वेळ घुटमळत होते मी. साधी वाटावी इतकी साधी रचना नव्हती ती. कवितेतल्या विशिष्ट शब्दांचा विचार तेजीने घोळू लागला डोक्यात. निरीक्षणाअंती माझे मन कवी मागे अन् त्याच्या गतीपुढे धावू लागले. त्याच्या सर्वज्ञ रूपातली मन नावाची गोष्ट मला आकर्षित करू लागली. साकारू लागलेला कवी आकारू लागला कवितेतून. माझा अभ्यास त्याचे नियम केवळ एका कवीपुरते मर्यादित नव्हते, तर सारासार विचाराअंती कळलेले साहित्यिक, कवी हे असे काहीसे होते…
निर्मळ मनातून समर्थ होणारे काव्य आणि जगातली महान सत्य, ज्याला जाणवतात ते कवी. नाद, छंद, ध्यास, श्वासाच्या टप्प्यात आत्मपरीक्षणाच्या चक्रात, अनावश्यक शब्दांच्या पसाऱ्यात न अडकता, अर्थवाही प्रतिमांचा शोध घेतो, त्याला कविता सापडते. इथंवर शोध घेत मी आले.
गाई पाण्यावरी काय
म्हणूनी आल्या
का ग् गंगा-यमुना
या मिळाल्या…!
गंगा यमुनेच्या मेळाचे एकमेव ठिकाण कवी तिच्या डोळ्यांत पाहतो ना…! तेव्हा, नयनातले भाव लेखणीत उदृक्त होतात. उपमा, अलंकाराचा साज चढवत कविता मार्गस्थ होते पुढे पुढे. सहजरीत्या सुंदर अर्थाने स्पष्ट होते. मनातले उत्स्फूर्त विचार ओठावर येता काव्याचा जन्म होतो. मनात काव्यासारखे एखादे अपत्य जन्माला घालणे म्हणजे कवीचा होणारा दुसरा जन्मच जणू. याला स्वानुभूतीतून प्रकटलेली जिवंतपणाची अस्सल शाळा म्हणता येईल. वास्तविक अवास्तविकाच्या पलीकडे ज्याची बुद्धी जाते तो कवी. त्याच्या सृजनशीलतेला समजण्यासाठी आधी त्याला म्हणजे कवीला समजून घ्यावे लागेल. जीवन विद्या मिशन नेहमी शिकण्यासाठीच असल्याने ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांच्या सहाय्याने जीवन अवस्थेशी संवाद साधणारा कवी अभ्यासायला हवा. कवीला नसते वावड परिस्थितीचे म्हणूनच उभ्या आयुष्यात रेखाटली जातात चित्र समाजमनाची. गुंतागुंतीच्या प्रकरणात एखाद्या समयी सरमिसळ होत असेलही भावनांची. पण आत्मसंतुष्टीच्या जागराने चैन पडत नसावे त्याला. जबर निरीक्षण शक्तीच्या ताकदीवर शब्दात पेरतो कवी त्याचा अनुभव. गाभाळलेल्या नभाला नेत्रांच्या परिघात खेचून आणतो कवी. धरणीला बांध सोडायला लावतो कवी. व्यथेत जळतो कवी अन् जीवाला छळतो कवी. स्वागतासाठी मन, मनगट, मेंदूवर स्वार गातो विराण्या. मांडतो कैफियत आर्त गझलेच्या शेरात. अमर्यादेच्या पलीकडचा प्रवास सुंदर शब्दांत गुंफतो कवी आणि समोरचा आपलीच व्यथा समजून मुरतो त्यात मुरांब्यासारखा.
कल्पनाविष्काराच्या निर्मिती कारखान्यातून परिपक्व रसायनाचे शिंतोडे उडवतो कवी. शरीर यंत्रणेसह मनोव्यापाराच्या महासंगणकीय मेंदूला जाणतो कवी. तेव्हा गती येते त्याच्या चेतनेला, लेखणी मांडते गाव-गाड्याचे रूप, शहराची वास्तवता. धिंड निघते नराधमांची, गटारगंगेतून निघतो गाळ, भूकबळीचे सत्य पाझरते निळ्या शाईतून. विव्हळ मनाचे तरंग, निसर्गगान मिलाप म्हणजे कवी कालिदासाच्या हृदयातून अवतरलेले प्रतिकात्मक संदेशकाव्य. जो प्रियेला पाठवलेला सर्वांग सुंदर संदेश होय. एका विशिष्ट मनोज्ञ काव्यरचनेमुळे कालिदास संस्कृत साहित्याचे महत्त्वाचे पान होऊन महाकवी झाला. पाण्याने भरलेल्या घनाला दूत अर्थाने संबोधणाऱ्या कालिदासाच्या कल्पनाशक्तीला तेवढ्याच ताकदीने तपासायला हवे. मराठी साहित्यातील गद्य-पद्यची अंग वेगळी असल्याने प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीचा कस लागतो इथे. शब्दाला जसे फुलवावे तसे ते फुलतात, या अर्थाने शब्दाला न्याय देता आला, तर शब्द तुम्हाला श्रीमंती देतील. शब्दाला प्रतिशब्द, धाटणी, मांडणी, विषय, हाताळणी, उच्चार, सादरीकरण अशा विविध कसोटीवर चमकते लेखणी. व्यक्तिमत्त्वाला धार येते, त्यातून वाहते शब्दगंगा. गंगेतून वर येतो परिस. परिसामुळे झळाळून उठतं सोन्यापरिस मनं. मनाला साथ देतो देह. देह असतो कवीचा आणि जिथेे कवी महत्त्वाचा तिथे सन्मान मराठी राजभाषेचा. सहृदयी कवी मनाचे कोपरे तपासले असता तो आपल्या आसपास दडल्याची खात्री पटेल. ते स्वीकारता कवी कळेल. कारण तो आहे आगळा-वेगळा. गूढ रहस्यमयता घेऊन कवी कुठल्या कुठे जातो. भरकटतो, यशस्वी होतो. संपतो आणि संपवतो सुद्धा. एकूणच काय, मी म्हणेन, कवी होणे सोपे नसते मित्रा. कवी होणे सोपे नसते…!