– मनस्विनी – पूर्णिमा शिंदे
- समाजामध्ये आज पैसा सर्वश्रेष्ठ झालेला आहे. सर्व काही आपण पैशाने मिळवू शकतो हा खोटा आत्मविश्वास बळवला आहे. त्याचे कारण आहे नीतीमूल्य, नीतिमत्ता, गुणवत्ता आणि सत्ता. त्याचप्रमाणे देशात भ्रष्टाचार फोफावलेला आहे. म्हणजे दाम घेऊन काम केल्याचा भरभक्कम पुरावा आहे. आज क्षेत्र कोणतेही असो पण टेबलाखालून दिले जातात आणि आरामात माणूस समता, ऐकता, बंधुता, मानवता हे सारं काही विसरून गेलेला आहे. आज वर्तमानपत्रांमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये ज्या बातम्या येतात त्या बातम्यांमध्ये वारंवार पाहायला मिळते की, खूप मोठमोठ्या ठिकाणी सर्वच क्षेत्रांमध्ये बळावलेला हा भ्रष्टाचार टेबलाखालून दिला की, काम झाले. याला इतके हजारोंची लाच घेताना पकडले. त्याला तिकडे पकडले. सर्रासपणे हे सगळीकडे चालू आहे. शासकीय निमशासकीय कोर्ट-कचेऱ्या, दवाखाने, मेडिकल, विद्यालये, स्थानिक संस्था, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय ज्ञान मंदिरामध्ये सुद्धा. ज्ञानभक्ती, शक्तीची मंदिरे, धार्मिक कार्यालय, जत्रा सप्ताह, समुदाय मंडळे संस्था हे देखील या स्थराला जातात. पैशांचे लालूच माणसाला अघोरी, अनैतिक कामे करायला भाग पाडते.
- काळा पैसा घेऊन व देऊन प्रत्यक्ष बेहिशेबी मालमत्तेची सुरक्षा केली जाते. टॅक्स वाचवला जातो. खिसा गरम केला की, साहेब खूश होऊन आपले हवे ते काम करून देतात. कोणतेही क्षेत्र असो आतून भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. आता उमेदवाराची शैक्षणिक अर्हता न पाहता खिसा किती गरम करणार, टेबलाखालून किती देणार यावर त्याला पद देणार असे चालले आहे. म्हणजेच गुणवत्ता ढासळत जाऊन भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनला आहे.
- कारण आमचे राजकारणी यांची शैक्षणिक पात्रता कमी व बोगस असणे. जन्मनोंद जुनी माणूस हयात असून देखील मी तुझा दाखला किंवा मेला तरी मृत्यूचा दाखलाच नाही पैसे भरून कार्यालयीन कागदपत्रे बदलली जातात. त्याची योग्य ती पडताळणी केली जात नाही का? सगळा भोंगळ कारभार. मात्र त्यांच्या हाती हे दाम करी कामचे उत्तम उदा. आहे. पात्रता नसताना उच्च पद मिळवून आज देश, समाज आणि युवापिढी रसातळाला गेली आहे. हे काळे बाजारीकरण कुठेतरी थांबले पाहिजे पण तसे कोठेही होत नाही. वैद्यकीय दाखले खोटे, कोर्टात सादरीकरण कागदपत्रांचे खोटे शासकीयदृष्ट्या तपासले जावेत आणि योग्य ती कार्यवाही दंड ठोठावले जावेत पण असे मात्र होत नाही. कायद्याचा बडगा हा गोरगरिबांना सहन करावा लागतो. कोर्टाच्या चक्रा गोरगरिबांना सहन कराव्या लागतात आणि टॅक्स दंड भरण दंडवसुली हे देखील सर्वसामान्य जनतेकडून वसूल केले जातात. पण उच्चभ्रू श्रीमंतांचे मात्र लाड चोचले पुरवले जातात. आपण म्हणतो पर्व पैसा हा काही सर्वश्रेष्ठ नाही पण पैसाच नसेल तर कोणी कोणाला विचारतही नाही हो. पैसा हा असावा तो श्रमाने, कष्टाने, घामाने मिळवलेला असावा. कारण यामध्ये एकच आहे कोणतीही गोष्टही लाचलुचपत, भ्रष्टाचार किंवा कोणाच्या तरी तळतळाट आणि हाय लागून मिळाली असेल तर त्याचा आपल्याला कधीही फलद्रूप होत नाही. यशाला जात नाही, अगदी टक्केवारी असून सुद्धा गुणवत्ता, सर्व प्रमाण, पात्रता, अटी-शर्थी आणि नियम हे पायदळी तुडवले जातात. आंधळा कारभार वाढीस वाढ म्हणजे आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खातं. आजकाल हे काही नवे नाही. पण पैशाची लालूच, अामिष दिल्याशिवाय काम हे कधी पूर्ण होतच नाही ना! मग हाल कोणाचे होतात? गोरगरिबांचे! आजकाल हे कुठेतरी थांबले पाहिजे. आरटीआय आहे. ग्राहक संरक्षण कायदा आहे. तसेच देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार आणि हक्क बजावता आला पाहिजे! त्याची मुस्कटदाबी करून सत्य आणि न्यायाची बाजू दबाव आणून ते झाकले जाते. ती प्रामाणिकता प्रत्येकामध्ये एक सच्चा, सुजाण नागरिक म्हणून आली पाहिजे. बघा पटतंय का विचार करा! निश्चित परिवर्तन करा. त्यात सर्वांचेच भले आहे.