प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
धारण तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. मला ‘रमेश यादव’ या साहित्यिक मित्राचा फोन आला. “आमच्या समर्थ ग्रंथालयासाठी तुम्ही स्वतःची काही पुस्तके पाठवू शकाल का? सोबत बिलही पाठवा.”मी आनंदाने होकार दिला. दुसऱ्या दिवशी त्यांना पुस्तके कुरियर केली आणि काही दिवसांतच मी पाठवलेल्या बिलानुसार माझ्या बँकेत ती रक्कम जमा झाली.असे त्यांनी जवळपास एकशे पंचवीस साहित्यिकांना फोन करून त्यांची पुस्तके मागविली आणि वेळेवर त्यांचे पेमेंटही केले. ग्रंथ संचालनालय पुस्तक खरेदी, कर्मचाऱ्यांचे पगार व कार्यक्रम करण्यासाठी वार्षिक अनुदान महाराष्ट्राच्या शेकडो ग्रंथालयांना देते. म्हणजे सरकारी अनुदानातून काही टक्के रक्कम थेट लेखकांकडून पुस्तक खरेदी करण्यासाठी, तर काही टक्के प्रकाशक किंवा वितरकांकडून खरेदी करण्यासाठी वापरावी अशी त्यांची योजना होती. याचा प्रचार-प्रसार होऊन अन्य ग्रंथालयांनी ही अशी योजना सुरू करावी, व लेखकांना याचा थोडा तरी लाभ मिळावा, हा त्यांचा मुख्य हेतू होता. पण दुर्दैवाने तसे काही घडले नाही, ही त्यांची खंत आहे.
काही दिवसानंतर रमेश यादव भेटले. परीक्षक या नात्याने आम्ही एका संस्थेमध्ये गेलो होतो, तिकडचे काम झाल्यानंतर अवांतर गप्पा झाल्या. त्यावेळेस मलाही अधिकची माहिती मिळाली. ते म्हणाले, “मी समर्थ ग्रंथालय प्रमुख असताना काही नवीन उपक्रम चालू केले. त्यापैकी एका उपक्रमाचा तुम्हीसुद्धा भाग होतात.” हे सांगितल्यावर, मला त्यांनी माझी पुस्तके मागवल्याचे आठवले. मग ते पुढे बरेच काही सांगत होते आणि त्या निमित्ताने मला एक वेगळी आणि नवीन माहिती मिळाली. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रकाशक लेखकांची पुस्तके विकतात पण काही प्रकाशक त्याचा लाभ किंवा रॉयल्टी लेखकांना प्रामाणिकपणे देत नाहीत. किती पुस्तके विकली गेली याचा हिशेबही मिळत नाही.
अलीकडे अनेक प्रकाशक पैसे घेऊन पुस्तके फक्त छापून देतात. प्रूफ चेकिंगचे काम ही लेखकालाच करावे लागते. प्रकाशकाला एक रकमी पैसे देऊन छापील पुस्तके साहित्यिकाच्या घरात गठ्ठ्यांनी येऊन पडतात. जी साहित्यिकाला बाजारात विकणे किंवा रसिक वाचकांपर्यंत पोहोचवणे कठीण जाते. मग तो साहित्यिक आपली पुस्तके आपल्या मित्रमंडळींना किंवा आपल्यापेक्षा दिग्गज अशा साहित्यिकांकडे आपली पुस्तके असावीत, या उद्देशाने भेट पाठवतात. या पार्श्वभूमीवर यादव यांना असे वाटले की, साहित्यिकांकडून थेट पुस्तके विकत घेतलीत, तर थोड्या फार प्रमाणात लेखकांना विक्रीचा फायदा मिळू शकतो आणि शिवाय खूप सारा आनंदही मिळू शकतो! रमेश यादव हे स्वतः साहित्यिक असल्यामुळे ते ज्या परिस्थितीतून गेलेत त्या परिस्थितीतून जाणाऱ्या इतर साहित्यिकांना त्यांनी आनंद द्यायचा विचार केला. परंपरेनुसार लायब्ररीतला स्टाफ किंवा प्रमुख दोन-चार प्रकाशकांकडून त्यांना मिळालेल्या अनुवादातून सरळ पुस्तके खरेदी करतात आणि पेमेंट करून मोकळे होतात. पण यादवांच्या योजनेनुसार हे काम सोपे आणि सरळ नव्हते. इतक्या साहित्यिकांना फोन करणे त्यांच्याकडून पुस्तके मागवणे आणि बिलाप्रमाणे पैसे बँकेत जमा करणे हे खूप कठीण आणि मेहनतीचे काम होते. आपल्या ग्रंथालयामार्फत त्यांनी एक वर्ष ही योजना यशस्वीरित्या राबविली. याचा काही प्रमाणात त्यांना आनंद मिळालाच पण लेखकांनाही याचा लाभ झाला. वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी जवळपास एकशे पंचवीस लेखकांना संपर्क केला, यापैकी २० टक्के साहित्यिकांनी दोन-तीनदा फोन करूनही पुस्तके पाठवली नाहीत. अनुदान, बिल व ऑडिटच्या संदर्भात त्यांनी ग्रंथ संचालनालय आणि सीएकडून माहिती घेतली. त्यानंतरच या योजनेची सुरुवात केली. त्यासाठी त्यांना आपला मौल्यवान वेळ घालवावा लागला पण तो सत्कारणी लागला अशी त्यांची भावना आहे.
पण हे करण्यामागचा त्यांचा उद्देश आणि कळकळ आपण समजून घेऊया की, त्यांना वाटले होते, ही योजना पुढे चालू राहील आणि इतर ग्रंथालयात अशी योजना सुरू होईल पण तसे काही झाले नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या त्यांच्या चांगल्या उपक्रमाचे स्वागत लेखकांनी केले पण याचा पाठपुरावा मात्र कोणीच केला नाही. तसेच इतर कोणत्याही लायब्ररीयांकडूनसुद्धा या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत झाले नाही याची खंत त्यांना आहे. या विषयावर सखोल चर्चा व्हायला हवी असे त्यांना वाटते. तसेच ‘ग्रंथ संचालनालया’कडून याविषयी परिपत्रकदेखील काढले गेले पाहिजे. तर मूळ मुद्दा असा आहे की, एखादा चांगला उपक्रम कोणी सुरू करतो तेव्हा त्याला मिळावी तशी दाद मिळत नाही आणि चांगले उपक्रम हे अशा रीतीने बंद पडतात.यासाठी कोणत्या पातळीवरून, कोणी आणि कोणते प्रयत्न करायला हवेत?, याविषयी मार्गदर्शन व्हायला हवे, यासाठी हा लेखप्रपंच!
pratibha.saraph@ gmail.com