Tuesday, December 10, 2024

चंदा ओ चंदा

हलकं-फुलकं – राजश्री वटे

तुझं शरद पौर्णिमेचं तेजस्वी रूप बघायचं की चौदहवी का चांद म्हणून तुझं मिरवणं बघायचं…
आजच्या तुझ्या रूपावर सगळेच फिदा…किती मोहक तुझं दिसणं…ते लख्ख तेजाळणं…अन्… ते बरसणारं चांदणं, नजर हटेना आज!!या चांदण्यात चिंब भिजायचं…स्वतःमध्ये रमायचं…चांदणचुरा अंगावर झेलत एक गिरकी घेत बेभान उधळायचं… अगदी तुझ्यासारखं!!काळी साडी नेसून ती यामिनी मिरवते चांदण्याची खडी लेवून… त्यात ती शुक्राची चांदणी जरा जास्तच लखलखते! अन् लगट करते तुझ्याशी… बाकीच्या चांदण्या जळतात तिच्यावर… पण त्यांना हे कळत नाही यामुळे त्या आणखीनच चमकदार होतात! टिपूर चांदण्यांनी नभ भरून जातं… किती सुंदर हे नक्षत्राचं देणं!!प्रेमींच्या जगामध्ये फार भाव तुला…प्रेमाच्या आणाभाका तुझ्याच साक्षीने…प्रेमिकेला उपमा तुझ्याच रूपाची…किती… किती… महत्त्व तुला! लहानग्यांनी तर “मामा’’ बनवलंय तुला!!

किती नशीबवान आहेस तू… कधी मिश्कील असतो… तर कधी खट्याळ! पण तेवढाच भित्रा देखील अमावसच्या रात्रीला अंधाराला घाबरून गुडूप होऊन जातोस कुठेतरी… हळूहळू नंतर हळूच डोकवायला लागतो व पौर्णिमेला पुन्हा हसत हसत आभाळभर मिरवतो! अमावस्येनंतर तुझं कलेकलेनं वाढत जाणं आणि आजचं तुझं पूर्ण गोलाकार लख्ख रूप डोळ्यांचं पारणं फेडतंय… तुझी अनेक रूप साकार होतात या भव्य तारांगणात!!शरदाच्या चांदण्यात संगमरवरी शुभ्र ताजमहालचं खुलणारं सौंदर्य… वेड लावणारं.. प्रेमाचंच प्रतीक… नेत्रदीपक सोहळा! तुझं चांदणं आकंठ पिऊन त्या सागराला भरती येते, फेसाळणाऱ्या लाटांच्या नृत्याला बहार येते! बहिणीसाठी भाऊबीजेला तुला भावाचा सुद्धा दर्जा मिळतो रे… या हळव्या क्षणाचा साक्षीदार होतोस तू! कधी एखाद्या क्षणी… तुझं चांदणं झेलताना… एकांती… जिथे सागराला धरणी मिळते… त्या किनाऱ्यावर… भावनांनाहीवाट करून द्यावी मोकळी… मनसोक्त… अनावर होऊन जावे… चंद्राच्या साक्षीने…तू आहेच तसा रे…जो भी हो तुम खुदा कि कसम लाजवाब हो…चौदहवी का चांद हो…!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -