रमेश तांबे
एक चिमणीचे पिल्लू सकाळी सकाळी घरट्याच्या बाहेर पडले आणि छान भराऱ्या मारू लागले. उडता उडता आपल्या मित्रांना हाका मारू लागले. अरे अरे चला लवकर बाहेर या तुम्ही भरभर सूर्य आपली पाहतो वाट बघा त्याचा तुम्ही थाट! पण चिमणीला कोणीच प्रतिसाद देईना. कोणीच घरट्याबाहेर येईना. मग तिने ठरवले प्रत्येक घरट्याच्या जवळ जायचे जोरजोरात हाका मारायच्या. सर्व मित्रांना गोळा करायचे आणि खूप खेळायचे, खूप मज्जा करायची! मग चिमणीचे पिल्लू गेले आंब्याच्या झाडाजवळ तिथे होते त्याच्या मित्राचे घरटे. पिल्लू तिथे जाऊन म्हणू लागले. अरे माझ्या प्रिय मित्रा
असा काय घरात बसलास घर कोंबडा झालास का तू उडायचं तू का रे विसरलास! पण घरट्यातून कुणीच बाहेर आले नाही. मग पिल्लू गेले चिंचेच्या झाडाजवळ. तिथे त्याच्या दोन मित्रांची घरटी होती. पिल्लू त्यांना मोठ्याने म्हणाले, उठा उठा बाहेर या सूर्य देवाचे दर्शन घ्या लाल पिवळं आकाश बघा.
गार हवेत मजा करा! पण कोणीच बाहेर आले नाही. आता चिमणीचे पिल्लू गेले वडाच्या झाडाजवळ. तिथे खूप वेगवेगळ्या पक्ष्यांची घरटी होती. तिथे जाऊन पिल्लू म्हणाले, ऐका ऐका मित्रांनो घरट्याच्या बाहेर बघा जरा माझ्यासोबत कोण आलाय आकाश आपलं लाल झालाय! पिल्लाचे बोलणे ऐकून घरट्यातून मैनेचे पिल्लू टकामका बघू लागले. त्याने बघितले, चिमणीचे पिल्लू छान भराऱ्या मारताय गार गार हवेत! तेवढ्यात मैनेच्या पिल्लाची आई म्हणाली, “अगं वेडे त्या चिमणीच्या पिल्लाबरोबर कुठे जातेस. बस घरात!” मग ते मैनेचे पिल्लू बिचारे हिरमुसले आणि परत घरट्यात जाऊन बसले. आता मात्र चिमणीला कळेना काय करावे? तरीसुद्धा ती हिंमत हरली नाही. आता ती एका पिंपळाच्या झाडाकडे गेली. तेथे खूप पोपट राहत होते. चिमणीला कळेना पोपट आपल्याबरोबर फिरायला येतील का? त्यांना हाक मारावी का? तरीसुद्धा तिने मनाचा हिय्या करून सगळ्या पोपटांच्या पिल्लांना हाक मारली.
अरे माझ्या पोपट मित्रांनोघरट्यात तुम्ही का रे बसलात? लवकर या बाहेर तुम्ही करूया आपण आकाशात मस्ती! पण तिच्या सोबत कुणीच यायला तयार नव्हते. आता मात्र चिमणीचे पिल्लू एका जांभळाच्या झाडावर जाऊन बसले आणि विचार करू लागले. काय करता येईल म्हणजे माझ्यासोबत कोणीतरी खेळायला येईल? विचार करता करता इकडे तिकडे बघता बघता तिला झाडाच्या फांदीला एक पतंग अडकलेला दिसला. लाल, पिवळ्या रंगातला, लांबलचक शेपटी असलेला! तो पतंग पाहून चिमणीच्या पिल्लाला एक कल्पना सुचली. मग तिने मोठ्या आनंदाने त्या पतंगाच्या दिशेने झेप घेतली. झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेला तो रंगीत पतंग तिने हळूच बाहेर काढला. पतंगाचे एक टोक आपल्या पायात पकडून ते आकाशात भराऱ्या मारू लागलं. पतंगाला घेऊन चिमणीचे पिल्लू गिरक्या घेऊ लागले. तसा पतंगही वाऱ्यावर फडफडू लागला. त्याची लांबलचक शेपटी वाऱ्यावर मस्त नाचू लागली. आता मात्र चिमणी कुणालाही न हाक मारता सगळीकडे आनंदाने फिरू लागली. गिरक्या घेताना वाऱ्याच्या झोताबरोबर पतंगाचा आणि त्याच्या शेपटीचा आवाज येऊ लागला. ते ऐकून सगळी पक्ष्यांची पिल्ले टकामका बघू लागली. चिमणीच्या पिल्लाने धरलेला तो पतंग, त्याची ती लांबलचक शेपटी, त्या पतंगाचा रंगीबेरंगी रंग पाहून तो पतंग आपणही पायात धरावा आणि गिरक्या घ्याव्यात असे साऱ्यांनाच वाटू लागले. तितक्यात मघाशी घरट्याबाहेर डोकावणारे मैनेचे पिल्लू आईला न सांगताच घरट्याच्या बाहेर पडले आणि चिमणीच्या पिल्लाला म्हणाले, “अरे चिमणीच्या पिल्ला मला दे ना तुझा पतंग! मलाही तो पायात पकडू दे आणि आकाशात त्याच्यासोबत गिरक्या घेऊ दे!” मग लगेचच चिमणीच्या पिल्लाने मैनेच्या पिल्लाला तो पतंग दिला. मग काय मैनेचे पिल्लू वर खाली गिरक्या घेत आनंदाने विहार करू लागले. तशी पटापटा सगळ्या पक्ष्यांची पिल्ले बाहेर आली. आपल्याला पतंग कधी उडवायला मिळेल याची वाट पाहू लागली. आता सारे आकाश पक्ष्यांच्या पिल्लांनी भरून गेले. मोठ्या आनंदाने किलबिलाट करत सगळेजण त्या पतंगाच्या मागे उडू लागले. अशाप्रकारे चिमणीच्या पिल्लाने घरट्यात बसलेल्या आपल्या सगळ्या मित्रांना बाहेर काढले. आकाशाच्या मैदानात खेळण्यासाठी!