मायभाषा – डॉ. वीणा सानेकर
माझा निधीशी फारसा परिचय नव्हता पण त्यादिवशी तिने मला मुलांसाठी उपयुक्त मराठी पुस्तकांची नावे विचारली नि मनापासून बोलू लागली. ‘‘माझ्या एका मैत्रिणीला तिच्या वाढदिवसाला पत्र लिहून चकित करायचे ठरवले नि चक्क लिहायला घेतले. मोबाईल आल्यापासून पत्र वगैरे विसरायलाच झाले आहे. आता खूप दिवसांनी लिहायला बसले आणि मनासारखे शब्दच आठवेनात. जणू माझी भाषाच आटली आहे असे वाटले नि भीतीच वाटली. मराठी माध्यमात शिकलेल्या माझे असे होऊ शकते तर माझ्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या नि आमच्या त्रिकोणी कुटुंबात वाढणाऱ्या मुलांच्या मराठीचे काय होणार?’’
तिच्या संवादातलेे ‘जणू माझी भाषाच आटली आहे, असेे वाटले.’ हे वाक्य मला पुन्हा पुन्हा आठवत राहिले. आपली भाषा आटून जाणे म्हणजे काय? शब्दच न सुचणेे, व्यक्त होता न येणे, मनात खूप काही दाटून येणे नि हे सारे शब्दबद्ध न करता येणे. हे जाणवण्याइतकी संंवेदनशीलता प्रत्येकात असतेेच असे नाही. कारण दैनंदिन चाकोरीत भाषेचा इतका विचार करणेच सुचत नाही.
निधीला ते जाणवते आहे, ही गोष्ट मला महत्त्वाची वाटली. तिच्या बोलण्यातला आणखी एक शब्द मला महत्त्वाचा वाटला. तो म्हणजे, ‘त्रिकोणी कुटुंबात वाढणारा मुलगा.’ आजी-आजोबांकडून होणाऱ्या संस्कारांपासून त्रिकोणी कुटुंबातील मुले वंंचित राहतात. या संस्कारांंमध्ये ‘भाषा’ हा भाग प्रमुख असतो. गोष्टी, गाणी यांंच्यातून भाषा हे मूल्य आजी- आजोबांकडून नकळतपणे मुलांच्या मनावर ठसवले जाते.
मुलांकडे खरे तर अनेक भाषा शिकण्याची क्षमता असतेे. पण अलीकडेेे दिसणारे चित्र हे की, इंंग्रजी माध्यमात शिकणारी मुले इंग्रजी किंवा फार तर एका विदेशी भाषेशी जोडलेली राहतात, पण मातृभाषेसकट अन्य प्रादेशिक भाषांपासूून मुले दूर जातात किंवा त्यांना दूर ठेवले जाते. असे घडल्याने मुलांंचा कोणता तोटा होतो? मुलांच्या भावनिक विकासात त्यामुळे काही कोऱ्या जागा राहून जातात.
पालकांंचा कल मुलांंच्या शारीरिक व बौद्धिक विकासाकडे असतो पण मुलांचा भावनिक विकासही समांंतरपणे तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्या भाषेतील साहित्य मुलांंच्या मनाचे भरणपोषण करतेे. यातून त्यांंची संवेदनशीलता आपसुुक घडत जाते. भगवत रावत या हिंदी कवीची कविता आठवते आहेे. मुलाला आपल्या भाषेेपासून लहानपणापासून दूर ठेवलेे नि तो विदेशात जायला निघताना जाणवलेे की, सोबत द्यायला भाषाच नाही. रावत यांच्या कवितेतील हा निवडक अंश
“जवळ नव्हता एकही असा शब्द
जो देऊन म्हणू शकलो असतो…
घ्या. याला सांंभाळून ठेवा. हा संकटकाळी कामी येईल.
किंवा हा तुम्हाला
पडण्यापासून सावरेल
किंवा तुम्ही याच्या आधारेे कोणत्याही नीचपणाचा सामना करू शकाल.
किंवा इतकेच की, कधी कधी तुम्ही याने आपले रितेपण भरू शकाल
पण काहीच नव्हते माझ्यापाशी
‘काहीच नाहीय’ हे सांंगायलाही
भाषा नव्हती.’’