२८० बसची तपासणी; १७१ बसचालकांवर कारवाई
पिंपरी : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या २८० बसची तपासणी केली. त्यापैकी १७१ बसचालकांनी मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. या बसचालकांवर ‘आरटीओ’कडून कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १७ लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात २९५७ एकूण स्कूल बसची नोंदणी आहे. तसेच रिक्षांमधूनही शालेय विद्यार्थांची वाहतूक केली जाते.
पुण्यात शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या बस चालकाकडून दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेनंतर प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेमध्ये एकूण २८० विद्यार्थी प्रवासी बसची तपासणी केली.
आरटीओकडून शहरातील विविध भागांत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. १७१ बस चालकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी म्हटले.