आमच्या मुळेबाई मला
आवडतात खूप
नेहमीच असतात त्या
सदा हसतमुख
स्वभाव त्यांचा
आहे फारच गोड
मायेला त्यांच्या
नाही कसली तोड
मराठी शिकवण्यात
त्यांचा हातखंडा
नसतो कधी हातात
छडीचा दांडा
पुस्तकातल्या कविता
गातात किती छान
कथाकथन ऐकून त्यांचे
हरपून जाते भान
अडचणी सोडविण्यात
नेहमी असतात तत्पर
प्रत्येक प्रश्नाला असते
त्यांच्याकडे उत्तर
नाही कधी बडबडत
नाही बोलत रागावून
चुकले तर आईसारखे
सांगतात त्या समजावून
म्हणूनच आम्हाला प्रिय
आमच्या मुळेबाई
त्यांच्यामुळेच शाळेची
आठवण सदा येई
काव्यकोडी : एकनाथ आव्हाड
१) अन्न खातो
पाणी पितो
खेळ खेळतो
गाणी गातो
वाक्याचा अर्थ
जो पूर्ण करतो
क्रियावाचक शब्दाला
काय बरं म्हणतो?
२) कंटाळवाण्या भाषणाला
म्हणे ‘एरंडाचे गुऱ्हाळ’
रागीट माणसाला
म्हणे ‘आग्या वेताळ’
‘कुबेर’ म्हणतात
सारेच श्रीमंताला
कुणामुळे सौंदर्य लाभे
मराठमोळ्या भाषेला?
३) दासबोध, मनाचे श्लोकांची
निर्मिती केली
सद्वर्तनाची शिकवण
समाजाला दिली
बालोपासना करण्याचा
मार्ग सांगितला
‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’
संदेश कोणी दिला?