मुंबई : विधानसभा निवडणुकीत विजयी वाटचाल करण्याच्या दृष्टीने महायुतीने रणनीती आखली आहे. २८८ मतदार संघात उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीने मोर्चेबांधणी केली आहे. महायुतीतील जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला असून ३०-३५ जागांचा तिढा दिल्ली दरबारी एक दोन दिवसांत सुटेल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
जागा वाटपावर महायुतीची चर्चा सकारात्मक सुरू असून चर्चा अंतिम टप्प्यात आहे. सर्व जागांबाबत १-२ दिवसांत निर्णय होईल. ३०-३५ जागांवर निर्णय बाकी आहे. तो ही लवकरच होईल. राज्यात तो निर्णय सुटला नाही तर गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक बैठक होईल. त्यावर त्याविषयी तोडगा निघेल, असे एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकीत विजयी होणारे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा महायुतीत सुरू आहे. जागा वाटपाबाबत महायुतीत कुठलाही वाद नाही. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी ही महायुतीची सकारात्मक चर्चा झाली आहे. ज्या अडचणीच्या जागा होत्या त्यात अर्ध्यापेक्षा जास्त जागांवर तोडगा निघाला आहे. उरलेल्या जागा दोन दिवसांत फायनल होतील. ज्या जागांवर शिक्कामोर्तब झाले त्या त्या जागा त्या पक्षाने आपल्या सोयीप्रमाणे जाहीर करावे, भाजपची यादी लवकरच जाहीर होईल. परंतु भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याबाबत भाजपच्या पद्धतीनुसार केंद्रीय मंडळ निर्णय घेतील,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महायुतीत जागा वाटपात वर योग्य प्रकारे चर्चा सुरू आहे. काही जागांवर चर्चा सुरु असून त्यावरही लवकरच निर्णय होईल. जागावाटप फॉर्म भरण्याच्या आत होईल, महायुतीच्या जागा वाटपाबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालानंतरच
महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालानंतरच ठरणार, यावर महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे. महायुतीतील जागा वाटपाचा तिढा आणि तदानुषंगिक मुद्यांवर शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची दिल्लीत अमित शाहांसोबत चर्चा झाली. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा यावर अद्याप निर्णय झाला नसून यासंदर्भात, महायुतीकडून कोणत्याही नेत्याचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर केला जाणार नाही याची काळजी घेतली जावी, असे निर्देश अमित शाहांनी तिन्ही नेत्यांना दिले. तसेच निकालानंतर ज्याच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री होण्याबाबतही एकमत झाल्याचे समजते. महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांनी स्पष्ट केले होते की, आधी महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला की मग आमचाही चेहरा उघड करू. मात्र आता मुख्यमंत्री पदाच्या चेहर्याबाबतचे गूढ अजूनच वाढताना दिसत आहे.