दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा
सेऊल : युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी उत्तर कोरियाने आपले १२,००० सैन्य पाठविले आहे. यामध्ये तगड्या सैन्य तुकडीचा विशेष मोहिमांसाठी समावेश असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांनी दिली आहे.
योनहापने राष्ट्रीय गुप्तचर सेवे (एनआयएस)च्या हवाल्याने म्हटलंय की, रशियाला मदत करण्यासाठी उत्तर कोरियाचे सैन्य आधीच रवाना झाले आहेत. हे माहिती समोर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांनी तातडीची बैठक घेतली.
दक्षिण कोरियाच्या कार्यालयाने केलेल्या निवेदनानुसार, उत्तर कोरियाकडून सैन्य पाठवणे हा दक्षिण कोरिया आणि जगाच्या सुरक्षेला गंभीर धोका असल्याची भीती बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आता या घडामोडींमुळे तणावामध्ये आणखी वाढ झाली आहे.
महायुद्ध : झेलेन्स्की
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितलंय की, युक्रेनच्या विरुद्ध लढणाऱ्या रशियन सैन्याला मदत करण्यासाठी १०,००० उत्तर कोरियाचे सैन्य तयार केले जात असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली आहे. जर यामध्ये तिसरा देश युद्धात सामील झाला तर संघर्ष “महायुद्धात” बदलू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अशीही मदत…
नाटोचे महासचिव मार्क रटे यांनी म्हटलंय की, आमच्याकडे उत्तर कोरियाचे सैन्य युद्धात सहभागी झाल्याचा कोणताही पुरावा नाही आहे. मात्र, रशियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा, युद्धात पाठिंबा देण्यासाठी तांत्रिक पुरवठा अशा अनेक मार्गांनी उत्तर कोरिया मदत करत आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे, असे त्यांनी सांगितले.
ओलिसांना साेडणार नाही : हमास
– ७ ऑक्टाेबर २०२३ राेजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हमासचा म्हाेरक्या याह्या सिनवार ठार झाल्याचे हमासने मान्य केले.
– शस्त्रसंधी जाेपर्यंत हाेत नाही, ताेपर्यंत इस्रायलच्या ओलीस नागरिकांची सुटका करणार नसल्याचे हमासने जाहीर केलं आहे. तर, दुसरीकडे इस्रायलने युद्ध सुरूच ठेवण्याच ठरवलं आहे.
पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ व २३ ऑक्टोबर रोजी ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी या परिषदेसाठी निमंत्रित केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
ब्रिक्स पश्चिमविरोधी नाही : पुतिन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी कोणाला विरोध करणे हा ब्रिक्सचा उद्देश नसल्याचा दावा त्यांनी शुक्रवारी केला. ब्रिक्स हा पश्चिमेत्तर गट जरी असला तरी त्याचा पश्चिम देशांना विरोध नसल्याचे पुतिन यांनी म्हटलंय.
ब्रिक्स परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रशियातील कझान येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यादरम्यान ते अनेक नेत्यांशी चर्चादेखील करतील. ही भेट युद्ध सुरू असताना होत असल्याने ही परिषद महत्त्वाची मानली जाते आहे.