कल्याण : आज पहाटेपासून लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. कारण मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर पुन्हा एकदा परिणाम झाला आहे. कसारा दिशेने धावणाऱ्या सर्व लोकलसेवा तब्बल १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहेत. त्यामुळे ठाणे, कल्याण आणि इतर महत्वाच्या स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. सध्या वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे. लोकलची वाहतूक सलग दोन दिवस विस्कळीत झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, कसारा स्थानकात शनिवारी मध्यरात्री ३:२० वाजेपासून ते रविवारी मध्यरात्री १:२० मिनिटांपर्यंत तब्बल २२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. २२ लोकल ट्रेन या ब्लॉकमुळे नजीकच्या स्थानकापर्यंतच धावणार आहेत. यासोबतच कर्नाक बंदर पुलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते साडेतीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
लोकल सेवेवर ब्लॉकचा होईल असा परिणाम
मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा ब्लॉकमुळे शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते साडेतीन वाजेदरम्यान वडाळा, भायखळा रोडपासून सीएसएमटी स्थानकापर्यंत बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील ८ लोकलसेवा रद्द होतील. वसई रोड, भिवंडी रोड आणि ठाणे स्थानकादरम्यान वळवलेल्या सर्व गाड्यांसाठी दोन मिनिटांचा अतिरिक्त थांबा मिळेल.
हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक राहणार बंद
हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे तर कुर्ला आणि वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. परिणामी सीएसएमटीहून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीसाठी जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकलसेवा पूर्णपणे बंद राहतील.
सीएसएमटीहून कुर्ला आणि पनवेल- वाशी या मार्गांवर ब्लॉक कालावधीत विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी संध्याकाळी १० ते ६ या कालावधीत ठाणे-वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे. दरम्यान, मध्य रेल्वेवरील शनिवार मध्यरात्री १२.३० ते पहाटे रविवार पहाटे ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.
सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकलसेवा या ब्लॉकमुळे मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या गाड्या कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकावर थांबणार नाही. तसेच कल्याणहून सकाळी ३.२३ आणि ३.५७ वाजता सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या गाड्यासुद्धा ठाकुर्ली व कोपर स्थानकांवर थांबणार नाही.