Thursday, December 12, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकॅनडाबरोबरचे नाराजीनाट्य...

कॅनडाबरोबरचे नाराजीनाट्य…

– शंतनू चिंचाळकर

हरदीपसिंग निज्जर या शीख फुटीरतावाद्याच्या हत्या प्रकरणात भारतीय उच्चायुक्त आणि राजनैतिक अधिकाऱ्यांवर कॅनडाकडून निराधार आरोप झाले आणि पुढील मोठे नाराजीनाट्य घडले. त्यामुळे कॅनडाच्या राजनयिक अधिकाऱ्यांची भारतातून हकालपट्टी करणे हा स्वागतार्ह निर्णय ठरला. एव्हाना भारत-कॅनडा संबंधांमधील दुरावा हा बहुचर्चीत विषय बनला आहे. यामुळे भारताच्या सन्मानाचा जगभरात यथोचित आदर राखला जाईल.

भारताने आजवर आपल्या मुत्सद्दी राजकीय धोरणाद्वारे जगभरातल्या प्रमुख देशांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. दहशतवादी आणि फुटीरतावादी शक्तींशी दोन हात करत जगात स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले. देशांतर्गत आणि परदेशात घडणाऱ्या काही घटना बरेचदा संभ्रमावस्थेत नेतात. त्यातून परस्पर सामंजस्याने मार्ग काढण्यासाठी भारताने नेहमी पुढाकार घेतला. अर्थात जिथे आत्मसन्मानाचा प्रश्न उभा राहिला, तिथे काही कठोर निर्णय घेण्याचाही खंबीरपणा दाखवावा लागला. कॅनडामध्ये शीख फुटीरतावाद्याच्या झालेल्या हत्येनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत जगाला त्याचा प्रत्यय आला. या विषयावरून तापलेले वातावरण एका अनपेक्षित, दुर्दैवी वळणावर येऊन ठेपले असताना परराष्ट्रीय धोरणात भारताने एक खंबीर पाऊल उचलल्याचे मात्र पाहायला मिळत आहे. भारतासारखा विकसनशील देश जगभरातल्या देशांशी व्यापारातून वृद्धी, दहशतवादाशी लढा आणि साधन सामग्रीबाबत आत्मनिर्भरता या तत्त्वांवर संबंध ठेऊन पुढे जात असतो. कॅनडा सरकारशी आलेल्या वितुष्टापायी त्या धोरणाला कुठे तरी आडकाठी येते. हरदीपसिंग निज्जर या फुटीरतावादी शीख नेत्याची ब्रिटिश कोलंबिया(बीसी), कॅनडामधील सरे येथील गुरुद्वाराबाहेर, पार्किंगमध्ये गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. हरप्रीतसिंग निज्जर हा मूळचा जालंधरजवळचा रहिवासी होता, पण तो बराच काळ कॅनडामध्ये राहत होता. त्याचे अनेक प्रतिबंधित शीख संघटनांशी संबंध होते. पंजाबमध्ये काही काळापूर्वी झालेल्या हिंदू नेत्यांच्या टार्गेट किलिंगमध्येही त्याचा हात होता. तो बीसीमधील प्रमुख शीख नेता आणि वेगळ्या खलिस्तानी राज्याचा मुख्य समर्थक होता. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये अनपेक्षितपणे मरण पावलेली निज्जर ही तिसरी खलिस्तानवादी प्रमुख शीख व्यक्ती आहे. खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख अवतारसिंग खांडा, परमजीतसिंग पंजावर यांच्या हत्यांनंतर निज्जर याची हत्या झाली. पंजाबमध्ये काही काळापूर्वी झालेल्या हिंदू नेत्यांच्या टार्गेट किलिंगमध्ये त्याचा हात होता. सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा निराधार आरोप केला आणि कॅनडाच्या गुप्तचरांनी त्यांचा मृत्यू आणि भारतीय एजंट यांचे संबंध असल्याचे मत मांडले. भारत सरकारने या हत्येमध्ये कोणत्याही प्रकारे आपला हात असल्याचा इन्कार केला. एवढेच नव्हे, तर आपल्यावर होत असलेल्या निराधार आरोपांमागे कॅनडास्थित शीख समुदायाच्या वोट बँकेचे राजकारण आहे, हे ठणकावून सांगितले.

हरप्रीतसिंग निज्जर या ४५ वर्षीय शीख नेत्याच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या प्रक्षोभामुळे काही गटांनी भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे दोन टक्के असलेल्या धार्मिक अल्पसंख्याक शिखांसाठी कॅनडामध्ये स्वतंत्र मातृभूमीची मागणी केली. त्यामुळे हवालदील झालेल्या कॅनडा सरकारकडून आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी निज्जर यांच्या मृत्यूला भारत सरकार जबाबदार असल्याचा निराधार आरोप करण्यात येत आहे. त्याचा परिणाम भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संबंधांवर होऊन ते ताणले गेले. भारताने याबाबत कठोर भूमिका घेऊन, कॅनडातील आपल्या उच्चायुक्त आणि अन्य राजनैतिकांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला. अलीकडच्या काळात हिंसाचार आणि दहशतवाद याच्या छत्रछायेखाली असलेल्या कॅनडामध्ये आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे राहणे सुरक्षित नसल्याचे सांगून भारताने त्यांना परत बोलाऊन घेतले. त्याच वेळी कॅनडाच्याही सहा अधिकाऱ्यांची भारतातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. खलिस्तान चळवळीला भारताने पूर्वीपासून कडाडून विरोध केला आहे. १९८० च्या दशकात पंजाबमध्ये खालिस्तान या वेगळ्या राज्याची चळवळ शिखरावर होती. त्यामध्ये अनेक हिंसक हल्ले आणि मृत्यू झाले. सशस्त्र दलांनी चळवळीविरुद्ध विशेष कारवाया केल्यानंतर या संदर्भातील देशांतर्गत वाफ कमी झाली; परंतु परदेशस्थित खलिस्तानवादी समुदायातील समर्थकांनी वेगळ्या राज्यासाठी आपले आंदोलन चालू ठेवले, जे अलीकडच्या वर्षांमध्ये तीव्र झाले.
पंजाबसह देशातील सर्व मुख्य राजकीय पक्षांनी हिंसाचार आणि फुटीरतावादाचा निषेध केला आहे. भारताने म्हटले की निज्जर हा एक खलिस्तानी दहशतवादी होता आणि त्याने एका अतिरेकी फुटीरतावादी गटाचे नेतृत्व केले. हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी चार भारतीयांना अटक केली होती. कॅनेडियन पोलिसांचे तपास पथक असलेल्या इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीमने सांगितले की, त्यांनी या प्रकरणी, यापूर्वीच करण ब्रार, कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग यांना अटक केली होती. आता त्यांनी चौथा आरोपी असलेल्या अमनदीप सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली असून त्याच्यावर फर्स्ट डिग्री खून आणि कॅनेडियन नागरिक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप लावला आहे. हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीवर यापूर्वीच शस्त्र तस्करीचा गुन्हा नोंद असून तो पोलीस कोठडीत आहे. कोठडीत असलेल्या आरोपीवर हत्येचा आणि कट रचल्याचा आरोप नव्याने ठेवण्यात आला आहे. अल्पसंख्याकांच्या मतांवर डोळा ठेऊन एकूण प्रकरण हाताळले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भारतातील वॉंटेड दहशतवाद्यांच्या ४० नावांच्या यादीत निज्जरचा समावेश होता. त्या आधारे कॅनडाच्या सरकारने भारतावर निज्जरच्या हत्येचा आरोप केला.

भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले जायला आणखी एक घटना कारणीभूत झाली. टोरंटो कार्यक्रमातील काही पोस्टर्समध्ये ‘किल इंडिया’ असे लिहिले होते आणि कॅनडातील भारतीय मुत्सद्दींचे वर्णन ‘मारेकरी’ असे केले होते. त्यामुळे भारत सरकारने कॅनडाच्या राजदूताला पाचारण केले होते. निज्जर हे स्वतंत्र शीख राज्याच्या प्रश्नावर सप्टेंबरमध्ये सरे येथे नॉन-बाइंडिंग सार्वमताची योजना आखत होते. ते खलिस्तानच्या निर्मितीबाबत एकमताचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या जागतिक सर्वेक्षणाचा एक भाग होते. निज्जर यांच्या हत्येबाबत कॅनडाच्या सरकारने केलेल्या आरोपानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधही मंदावले. भारताने जस्टिन ट्रुडो सरकारकडे या हत्याकांडात भारताच्या सहभागाचे पुरावे मागितले. मात्र आजपर्यंत असे कोणतेच पुरावे मिळालेले नाहीत. भारत आणि कॅनडाच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याच्या दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे माजी सहयोगी आणि न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे (एनडीपी) नेते जगमीत सिंग यांनीही आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. कॅनडातील शीख भयभीत आणि त्रस्त असल्याचा दावा त्यांनी केला. या खलिस्तान समर्थक खासदाराने कॅनडाच्या सरकारने या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली. त्याने भारतावर राजनयिक निर्बंध घालण्याची विनंती केली. जगमीत सिंग यांनी एक निवेदन जारी करून आपल्या राजनैतिक मुत्सद्दींना बाहेर काढण्याच्या भारताच्या निर्णयाला पाठिंबा देताना त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेटवर्कवर कॅनडामध्ये बंदी घालावी, ही मागणीदेखील केली.
जगमित सिंग म्हणतो की, कॅनडाच्या भूमीवर गुन्हेगारी कार्यात गुंतलेल्या कोणालाही गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. कॅनडामधील राजकीय गणिते अलीकडे बदलत आहेत. येथील रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी जारी केलेल्या माहितीनुसार त्यांचा पक्ष अत्यंत चिंतेत आहे. जगमितच्या मते कॅनडातील शीख समुदाय घाबरला आहे. याचे कारण भारतीय अधिकाऱ्यांकडून कथित धमक्या, छळ आणि हिंसाचार होत आहे. हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारतीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे विश्वसनीय पुरावे कॅनडाकडे असल्याचा आरोप त्याने केला आहे. तो सांगतो, ‘कॅनडाच्या भूमीवर हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत नरेंद्र मोदी सरकारचा हात असल्याचे विश्वसनीय पुरावे कॅनडाकडे फार पूर्वीपासून आहेत. संबंधित गुन्ह्यांसाठी अमेरिकेने यापूर्वीच अनेकांना दोषी
ठरवले आहे.’

स्वतःच्या देशात अतिरेक्यांना आश्रय देऊन अतिरेकी कारवायांना प्रोत्साहन देणे, ही चोरी अंगलटी आल्यावर उद्भवलेल्या परिस्थितीचा दोष दुसऱ्याला देणे यातून राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेण्याचा डाव स्वतःवरच कसा उलटतो, याचे जिवंत उदाहरण कॅनडाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. भारतासारखा विकसनशील देश जगभरातल्या देशांशी व्यापारातून वृद्धी, दहशतवादाशी लढा आणि साधन सामग्रीबाबत आत्मनिर्भरता या तत्त्वांवर संबंध ठेऊन पुढे जात असतो. कॅनडा सरकारशी आलेल्या वितुष्टापायी त्या धोरणाला कुठे तरी आडकाठी येते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -