आतापर्यंत नऊ जण ताब्यात
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निर्घृण हत्येचं प्रकरण तपासात नवनवे खुलासे उघड होत आहेत. १२ ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असली तरी तपासात आणखी एका धक्कादायक कनेक्शनचा उलगडा झाला आहे.
डोंबिवलीतील नितीन सप्रे गँगलाही सुरुवातीला सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. शुभम लोणकर या व्यक्तीने सप्रे गँगशी संपर्क साधून गोळीबारासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र सप्रे गँगची मागणी जास्त असल्याने, नंतर बिश्नोई गँगच्या धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग आणि शिवकुमार या शूटर्सनाच काम देण्यात आले.
आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात पनवेल, कर्जत, आणि डोंबिवलीतील व्यक्तींचाही समावेश आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, पोलिस तपासाच्या वेगवान हालचाली सुरू आहेत.