– भालचंद्र कुबल
तो आणि मी एकमेकांना ओळखत होतोही आणि नव्हतोही. हल्ली मधल्या काळात साधं बोलणंसुद्धा होत नसे. खऱ्या अर्थाने त्याची ओळख झाली विनय आपटेने दिग्दर्शित केलेल्या अफलातून नाटकाच्या रिहर्सल्सच्या वेळी रुईयातून विनय, आय. एन. टी. व उन्मेष या स्पर्धांसाठी एकांकिका बसवत होता आणि त्याच वेळी भद्रकाली या मच्छींद्र कांबळी यांच्या संस्थेसाठी अफलातून हे व्यावसायिक नाटक माझ्यावर दिग्दर्शकीय संस्कार झालेल्यांमध्ये विनय आपटेचा नंबर पहिलाच लागतो. जादुगाराने भुल घातल्याप्रमाणे रुईयातले आम्ही काही जण आमची रिहर्सल संपली की, त्याचा शर्ट पकडून त्याच्यामागून अफलातूनच्या रिहर्सलला जाऊन बसायचो. आजही रंगभूमीवरील मल्टीस्टारकास्ट नाटक म्हणून त्या नाटकाचा उल्लेख व्हायला हवा. कोण नव्हतं त्यात…! महेश मांजरेकर, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, विनय आपटे, चंदू पारखी, दिलीप कुलकर्णी, दूरदर्शनवरील आवो मारी साथे गाजवलेले किशोर भट, दिलीप गुजर, गजानन वारंग, नेत्रा वेदक व असे अनेक अन्य आणि अतुल परचुरे. तालमीला एकंदर तीन दिग्दर्शक होते. आनंद मोडक प्रथम सर्वांचा गळा साफ करून घेत, कारण नाटक म्युझिकल होते, नंतर अरुण चांदिवाले कोरीओग्राफीमध्ये सर्वांचे घामटे काढत आणि सरते शेवटी विनय संवाद आणि दिग्दर्शनाचे वर्कशाॅप घ्यायचा. अतुल सर्वात वयाने आणि शरीरयष्टीने लहान वाटायचा, नव्हे तो होताच. त्यामुळे विनयचा सर्वात लाडका. नाटकात तुम्हाला गाणे पाहिजे की सीन? यावर अतुलने सीन मागून घेतला होता. विक्रम भागवतांनी एक कडकडीत सीन अतुलसाठी लिहूनही दिला. गाण्यांच्या, नाचाच्या आणि वेस्ट साईड स्टोरी चित्रपटाचा प्रभाव असलेल्या नाटकात कुणाचेही वैयक्तिक सीन्स लक्षात रहाणार नाहीत, हा अंदाज अतुलने फोल ठरवला होता. जेमतेम तीन-चार मिनिटांच्या प्रसंगात अतुल डोळ्यांत पाणी आणायचा. अफलातून सारख्या माॅबच्या नाटकात स्वतःला अधोरेखित करण्याची शैली अतुल सोडून कुणाच्यातही नव्हती हे विधान मी आज जबाबदारीने करतोय. मध्यमवर्गीय घरातली कैफियत मांडणारा अतुल आम्हाला आमचा प्रतिनिधी वाटला होता. तो राडेबाज नव्हता, त्यामुळे अफलातूनच्या बाकी गँगबरोबर तो कधीच नसायचा. आम्ही रिहर्सल बघायला गेलेल्यांमध्ये मात्र तो मिसळायचा आणि तिथेच तो आमचा होऊन गेला. खरंतर मध्यंतरीच्या आजारानंतर ‘सुर्याची पिल्ले’ या नाटकात तो भूमिका करणार आहे. या बातमीने मी सुखावलो होतो; परंतु पुन्हा बळावलेल्या आजाराने त्याने ड्राॅप घेतला. यथावकाश नाटक रंगभूमीवर आले सुद्धा; परंतु ते बघून त्यावर लिहावेसे न वाटायला खरा अतुलच कारणीभूत आहे. संजय मोने, स्वाती चिटणीस सारख्या अनेक घनिष्ट मैत्री असलेल्यांची काय अवस्था झाली असेल हे मी जाणतो. भीत भीत प्रमोद पवारला फोन केला, विचारलं ‘अरे अतुलवर एखादी आठवण लिहून देशील ?’ तर तो हो म्हणाला आणि मी देवाचे शतशः आभार मानले. कारण मित्रावर मृत्यूलेख लिहिण्याची वेळ शत्रूवरही येऊ नये. हल्लीच ‘स्थळ आले धावून’ या नाटकाच्या प्रयोगावेळी आम्ही शेवटचे भेटलो…आणि प्रमोद पवारने लिहिलेली त्याची आठवण मन हेलावून गेली..! मुद्दाम या लेखासोबत ती आठवण जोडतोय. मी हुशार आहे…!
तर ही गोष्ट आहे पाचवी-सहावीत असलेल्या बालमोहन शाळेतल्या दोन मस्तीखोर मुलांची आणि त्यांच्याबरोबर रंगभूमीवर येऊ इच्छिणाऱ्या मुलांची… त्यांची भेट झाली वंदना विटणकर लिखित, सुलभा देशपांडे दिग्दर्शित ‘बजरबट्टू’ या बालनाट्यात. वंदना विटणकर आणि त्यांचे चित्रकार पती यांची देखणी निर्मिती. विद्या पटवर्धन यांच्या तालमीत कितीतरी कलाकार तयार झालेले… त्यातले हे दोघे… अतुल परचुरे आणि आशिष पेठे, त्यांच्याबरोबर लीना साठे ही होती. अतुलने उत्तम कलाकार म्हणून नाव कमावलं, आशिष पेठेने वडिलोपार्जित उद्योग वामन हरी पेठे भरभराटीला आणला, तर लीना अमेरिकेत चित्रकलेचे अभ्यास वर्ग घेतेय, चित्रही काढतेय. आज का हे सगळं आठवतेय, तर जीवघेण्या आजाराने आज अतुल हे जग सोडून गेला. भराभर ते सगळे दिवस नजरेसमोरून सरकले, त्यातले कितीतरी कलाकार अत्यंत यशस्वी होताना दिसत आहेत…ते आठवले. अतुलचा नंबर अर्थात सर्वात वर. याचं कारणही उघड होतं… स्पष्टवक्ता असलेल्या अतुलचा हजरजबाबीपणा, मिश्किल स्वभाव, यामुळे सहज मैफल जिंकणारा तो गोलमटोल लाडूसारखा डोळ्यांसमोर येतोय. १९८२ साली मुंबई मराठी साहित्य संघातर्फे विश्राम बेडेकर लिखित दिग्दर्शित टिळक आणि आगरकर नाटकाची निर्मिती होत होती. त्यासाठी अनेक कलाकारांमधून आमची निवड झाली होती. त्यामधे भक्ती बर्वे, श्याम पोंक्षे, निवेदिता जोशी, सुषमा सावरकर, जयंत सावरकर, सुधाकर भानुशे, जयवंत वाडकर, सुरेश टाकळे अशी मंडळी जमली. त्यातल्या नाना आगरकरची भूमिका करायला चुणचुणीत मुलगा हवा होता. बेडेकरकाका तसे शिस्तीचे कडक तरी त्यांच्यात एक मिश्किल मूल दडल्याचं हळू हळू जाणवू लागलं होतं आणि आमचाही धीर चेपू लागला होता. काकांनी मला नानाच्या भूमिकेसाठी छान मुलगा शोधा असे सांगितले, कारण बरीच मुले त्याअगोदर येऊन गेली होती आणि त्यांना पसंत पडली नव्हती. तेव्हा मला फक्त अतुल परचुरेची आठवण झाली. सचिन हॉटेलच्या गल्लीत माझे टेलिफोनचे ऑफिस त्याच्याच बाजूला अतुल राहायचा. त्यामुळे त्याला शोधायला मला फार वेळ गेला नाही.
त्याला नाटकाची आवड होती हे तो बालनाट्य करत असल्यापासून माहीत होते. पण त्याचे कुंटुंबिय गुहागरचे, नाट्य वेडे त्यामुळे रक्तात नाटक वेड होतच… मग काय मी नाटकासाठी विचारताच त्याच्या वडिलांनीही होकार दिला. बेडेकर काकांनी त्याचे वाचन घेतले आणि त्याला पसंतीची पावती दिली; पण ती हात राखूनच. तालमीत नाटक रंगू लागले… दाजी भाटवडेकर सहदिग्दर्शक होते. त्यांचाही अतुलवर वरदहस्त होता. तो तेव्हा दहावीत होता. काकांना शंका आली म्हणून सहज त्याला विचारले, ‘अहो परचुरे…’ ते नेहमी समोरच्याला अहो जाहो म्हणत कितीही लहान असला तरी (तेव्हा काकांचे वय ७१ होते आणि अतुल १४)…परीक्षेचे काय? नाटक करून परीक्षा कशी देणार, अभ्यास कधी करणार? काकांच्या प्रश्नाला तितक्याच तत्परतेने त्याने उत्तर दिले… त्यात काय? ‘मी हुशार आहे’ काकाही मिश्किल हसले…आणि उत्तम प्रयोगापर्यंतचा प्रवास सुरू झाला.
या नाटकाचे धडाधड प्रयोग सुरू झाले… दौरे सुरू झाले…त्यामुळे आम्ही सगळे अधिक जवळ आलो. कुठेही बाहेर जायचे, तर सर्व १२/१४ जण एकत्र असायचो, भक्ती बर्वे या नामांकित अभिनेत्री, त्यांची तशी दहशत ही होती; पण आमच्या वागण्यामुळे त्याही आमच्यात मिळून मिसळून गेल्या. अतुल त्यानंतर खूप मोठा अभिनेता झाला, स्वतःला सिद्ध केले. तरुण तुर्क मधला त्याचा मुकुंदा तितकाच लोभसवाणा होता. नाती-गोती मधला बच्यु अशा कितीतरी विविधांगी भूमिका त्याला करता आल्या. याच्या अनेक भूमिका विनोदी अंगाच्या होत्या; पण तो विनोद घरंदाज असायचा. त्याच्या जाहिराती, त्याने केलेले कितीतरी कार्यक्रमांचे निवेदन, बहुरूपी पू. ल. त्याने ‘असा मी असा मी’ मध्ये साकारले. त्यावेळी पू. ल. निही त्याची पाठ थोपटली होती. आजारपणातून तो बरा झाल्याची खबर आली. त्याने ‘सूर्याची पिल्ले’ची तालीम ही केली, पण प्रयोगापूर्वी ५/६ दिवस असताना त्याला पुन्हा आजाराने गाठले आणि सूर्याच्या पिल्लाचा शेवटाचा प्रवास सुरू झाला. त्याच्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण तीव्रतेने येते… तो मनस्वी होता, तितकाच दिलदार ही होता… किती तरी मोठी राजकारणी मंडळी त्याचे मित्र होते; पण त्याचा गैरफायदा किंवा फायदा त्याने कधीच घेतला नाही… आज चित्रीकरणाच्या ठिकाणी मला कळले, अगदी मुंबई बाहेरून ही बातमी खरी की, खोटी यासाठी मित्र विचारत होते… काल आनंद म्हसवेकर गेले, दोन महिन्यापूर्वी विजय कदम गेला आणि आज मी हुशार आहे असे ठामपणे सांगणारा अतुल गेला… एकेक कोपरा रिकामा होत चाललाय… अतुलची कितीतरी कामे बघायची होती… कारण तो एक आनंद देणारा निखळ धबधबा होता, तो खरंच सूर्याचा वारसा सांगणारा ‘पिल्लू’ होता.
मला आजही बजरबट्टू मधला तो गोबऱ्या गालांचा, गोड मस्ती करणारा अतुल आठवतोय… हो कारण मोठे होतो तसे मागच्या गोष्टी एक तर विसरतो किंवा आठवणीत तरी राहतात… आणि काही गोष्टी, काही माणसं ही न विसरता येणारी असतात… त्यातला अतुल.