फिरता फिरता – मेघना साने
धनगरांचा जन्म म्हणजे कायम जोखीम! मेंढ्यांचा पसारा सांभाळत कधी पायी, तर कधी घोड्यांवरून मुलखावर जाणं आणि कुणा शेतकऱ्याच्या शेतात मेंढ्यांना बसवून वाऱ्या पावसात आयुष्य जगणं! तात्पुरत्या बांधलेल्या पालांमध्ये सुरक्षित निवारा कसा आणि किती मिळणार? भर पावसात यांची पोरं बाळे ओल्या जमिनीवर गोधड्या टाकून झोपतात. अंधाराची तर यांना सवयच होते. यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश कधी येणार? धनगर समाजातील एक साधासा मुलगा नागू विरकर यांनी शिक्षणाची मोट बांधली आणि शिकून सवरून शिक्षक झाला, त्या संघर्षाची कथा म्हणजे ‘हेडाम’ कादंबरी!
कादंबरीत माणदेशातील परिसर येतो. माणदेशातील वातावरणच असं आहे की, पाऊस पाणी वेळेवर नाही. उजाड माळरान आसल्याने जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी. विहिरींना पाणी कमी. कधी कधी मातीची मशागतही वाया जाते. मेंढरं चारणं, वाढवणं आणि विकणं यातच पैसा कमावणारी ही धनगर जमात! मेंढरांना चारापाणी मिळावा म्हणून सतत जागेच्या शोधात असते.
नागू विरकर यांनी लिहिलेली, बोली भाषेत असलेली ‘हेडाम’ ही कादंबरी म्हणजे धनगरांच्या जगण्याच्या पद्धतीचा लेखाजोखाच! म्हणून या कादंबरीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आई-वडील मुलुखावर निघायचे, तर छोटा नागू देखील त्यांच्यासोबत घोड्यावरून निघायचा. मुलगा मोठा झाला की, त्याला मेंढपाळ करायचा हा विचार सोडून आई बाबांना दुसरे काही सुचतच नव्हते. पण समजायला लागल्यावर नागूने सुशिक्षित व्हायचे ठरवले. आपण मास्तर होणार, चांगल्या वातावरणात राहणार असे स्वप्न पाहिले. थोडे दिवस म्हसवडच्या शाळेत दाखल केल्यावर पोळ नावाच्या गुरुजींनी त्याला प्रेमाने अभ्यासाकडे वळवले. पण आई-वडिलांपुढे प्रश्न होता की, आपण मुलुखावर गेल्यावर छोटा नागु राहणार कोणाकडे? अखेर सगळा वाडा मुलखावर निघाला तेव्हा आईने नागूला घोड्यावर बसवले आणि घोड्याला मार्गस्थ करीत सारी निघाली. पण नागूच्या नशिबात काही वेगळा मार्ग होता.
ही सारी मंडळी शाळेवरून जात असताना पोळ गुरुजींनी त्यांना थांबवले आणि नागूला अभ्यासासाठी आपल्याकडे ठेवण्याची तयारी दाखवली. आईनेही त्याला विश्वासाने त्यांच्या सुपूर्द केले आणि नागूचा शिक्षणाचा मार्ग चालू लागला. तो मुळात हुशार होता हे पोळ गुरुजींनी जाणले होते. गुरुजींकडे काही महिने राहून नंतर नागू आपल्या आजीच्या आश्रयाने राहिला. आजीला स्वयंपाक झेपत नव्हता, म्हणून स्वतः स्वयंपाक करू लागला. त्या घरात वीज नव्हतीच. माणसे अंधारात बसलेली असायची. कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करताना नागूचा चेहरा रापून जायचा. अनेक मैल तुडवत शाळेत जावे लागे. पुढे वडिलांनी सायकल घेऊन दिली. शाळेचा ड्रेस सोडून दुसरे कपडे नव्हतेच. किशोर अवस्थेत नागूला शेतीही पाहावी लागली. शिक्षणासाठी पैसे जमवायला माती कामगार व्हावे लागले. पण बारावीपर्यंत शिक्षण घेताना तो नेहमीच चांगल्या मार्कांनी पास झाला. कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये गेल्यावर योगासन, कबड्डी यातही त्यांनी प्राविण्य मिळवून दाखवले.
कितीही गरिबी असली तरी नात्यातील माणसांचे बंध किती पक्के होते हे देखील ‘हेडाम’ कादंबरीत अनेक प्रसंगांमधून दिसते. नागू शिक्षणासाठी परगावी निघतो तेव्हा त्याचे वडील स्टँडवर सोडायला येतात. मी तुला तूप अंडी पाठवीन. कोल्हापूरला जाऊन सराव कर असे सांगतात. वडिलांना त्याला पैलवान करायचे असते. घरात घड्याळ नसल्याने एसटी चुकते. प्रवासाला चांगली पेटी पण नसते. भाऊ त्याच्यासाठी परगावी लागतील अशा उपयोगी वस्तू घेऊन येतो. बहीण, मावशी, काकू प्रेमाने पदार्थ करून बरोबर देतात. शिक्षणासाठी नागूची परगावी पाठवणी हा प्रसंग हृदयाला पाझर फोडणारा आहे. नागूची एसटी पुन्हा घरावरूनच जाते तेव्हा आई धावत एसटीकडे येताना दिसते. नागू बस थांबवतो.
“अंड्याचा पोळा तव्यावरच राहिला होता. अंधारात दिसलाच नाही. भाकरीबरोबर तुला खायला घेऊन आले.” असे म्हणत आईने बांधून दिलेले ते पदार्थ घेताना नागूच्या डोळ्यांत पाणी येते. कंडक्टर देखील गहिवरून जातो. तरुण वय हे भरकटण्याचे वय आहे. यावेळी चांगला सल्ला देणारी माणसे भेटावी लागतात. कॉलेजचा खर्च करता यावा म्हणून नागू विरकर हॉटेलात नोकरी करू लागला होता. तेव्हा खडतरे सर अन पाटील यांनी त्याला योग्य सल्ला दिला, “आरं, हॉटलात काम करून किती पैसे मिळतात ते महत्त्वाचे नाही. आपले विचार कामगारांसारखे होतात. आपण शेतकऱ्यांची पोरं हाय.” या मार्गदर्शनाचा अर्थ नागूला बरोबर कळला आणि पुढे तो चांगल्या संगतीत राहिला. हॉटेल कामगारांच्या शिळोप्याच्या गप्पांमध्ये आपण भरकटू शकलो असतो, हे नंतर त्याने कबूल केले. एका अशिक्षित, गरीब धनगर कुटुंबातील नागू विरकर या मुलाने डी. एड. पास होऊन गव्हर्मेंटची मास्तरची नोकरी मिळवणे ही खूप मोठी गोष्ट होती. नोकरीला लागल्यावर त्याने प्रथम आईला सोन्याची माळ केली. कारण कोल्हापूरला होस्टेलमध्ये शिकण्यासाठी आईने आपली लाडकी सोन्याची माळ मोडूनच त्याला पैसे पाठवले होते. हा नागू विरकर आता या कादंबरीचा लेखक होऊन अनेक पारितोषिके मिळवत आहे. या कादंबरीने सातासमुद्रापार भरारी मारली असून तिचा अनुवाद इंग्रजी व कन्नड भाषेतही होत आहे. धनगरी बोली भाषेतील ही कादंबरी धनगरी लोकसंस्कृतीचेही दर्शन देत असल्याने मराठी साहित्याला अधिकच समृद्ध करते.