सोलापूर (प्रतिनिधी): मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टीने त्याग केला ही एक बाजू असली तरी आम्ही आमच्या आमदारकी, मंत्रीपद धोक्यात घालून सत्तांतर घडवून आणले म्हणूनच भाजपा आज सत्तेत असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या त्याग केल्याच्या वक्तव्याला आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठीच आम्ही गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला होता”, असे शहाजी बापू पाटील म्हणाले. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी आमच्या शिवसैनिकांची भावना आहे. मात्र महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेता होण्यावरून मतभेद निर्माण होणार आणि फूट पडणार”, असे सांगत, राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी सर्वजण राजकारणात प्रयत्न करत असतात. मात्र सांगोल्यातील टेंभू म्हैसाळ या पाण्याच्या योजनांना निधी मीच आणल्याचा दावा आमदार शहाजी भाऊ पाटील यांनी केला. सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे आणि माझ्यात चर्चा सुरू आहे. लवकरच दीपक आबा उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतील अशी मला आशा असल्याचे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.