३ दिवसांची पोलिस कोठडी
मालवण : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणाची राज्यभरात चांगलीच चर्चा झाली होती. या प्रकरणानंतर राज्य सरकारच्या वतीने गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. परमेश्वर यादव असे या आरोपीचे नाव असून यादव याने या पुतळ्याचे वेल्डिंग नीट केले नसल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश मधील मिर्जापुर येथून यादव याला अटक करण्यात आली आहे. आता त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मालवणीतील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फूट उंच पुतळा बसवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण देखील झाले होते. मात्र, २६ ऑगस्ट रोजी हा पुतळा कोसळला. त्यामुळे राज्यभरातून यावर जोरदार टीका झाली. छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या कारणावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते.
गंज लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे उघड
या प्रकरणात तपासाची चक्रे फिरल्यानंतर तांत्रिक दोषामुळे तसेच निकृष्ट दर्जाचे काम केल्याने गंज लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे कारण समोर आले. या प्रकरणात पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आता उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून आणखी एक आरोपी यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. याच परमेश्वर यादवने या पुतळ्याची वेल्डिंग केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.