आर्थिक विषयाची किमान माहिती व्हावी म्हणून काही प्राथमिक संकल्पना आपल्याला माहिती असाव्यात असे वाटते मागील लेखात त्यापैकी मालमत्ता(अँसेट), वार्षिक अहवाल (अँन्युअल स्टेटमेंट), ताळेबंद (जमाखर्च), उच्च आर्थिक मूल्य असलेले समभाग (ब्लुचिप शेअर्स), रोखे (बॉण्ड), भांडवली नफा (कॅपिटल गेन) या संकल्पना थोडक्यात माहिती करून घेतल्या. आता आणखी काही संकल्पना समजून घेऊ या.
उदय पिंगळे – मुंबई ग्राहक पंचायत
रोख प्रवाह – (Cash Flow)
नावाप्रमाणेच याचा संबंध खेळत्या पैशाशी आहे. उद्योगात अनेकदा पैशांची देवाण-घेवाण करावी लागते. विविध ठिकाणांहून कच्चा माल खरेदी करावा लागतो. तो उत्पादन ठिकाणापर्यंत पोहोचवणे, त्यावर प्रक्रिया करणे, उत्पादन बनवणे, त्याची वर्गवारी करणे, त्यासाठी ग्राहक शोधणे, त्याच्याकडे माल पोहोचवणे यामध्ये निश्चित कालावधीत व्यवहार पुरा करावा लागतो. संबंधितांना ठरलेल्या वेळी त्यांची रक्कम द्यावी लागते, कामगारांचे पगार, वीज बिल यांसारखे नियमित खर्च करावे लागतात. विक्री केलेल्या मालाच्या पैशांची वेळेत वसुली करावी लागते. उधारी लांबल्यास पर्यायी व्यवस्था करावी लागते. ती न केल्यास उद्योग पूर्ण कार्यक्षम पद्धतीने चालू शकत नाही. रोखता प्रवाह हा उद्योगात कुठून कोणत्या कालावधीत कसे पैसे आले आणि कसे खर्च झाले याचा आरसा असतो. त्यावरून कंपनीचे आर्थिक आरोग्य समजते. सकारात्मक रोखता प्रवाह तुमच्या मालमत्तेतील वाढ दर्शवतो आणि निश्चित ध्येयाकडे वाटचाल करीत असल्याचे सूचित करतो.
बाजारातील पत (Credit) –
आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात क्रेडिट हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो; परंतु हा सावकार आणि कर्जदार यांच्यातील कराराच्या तरतुदीचा भाग आहे. यात कर्ज घेतलेल्या रकमेवरील व्याजाचा समावेश असू अथवा नसू शकतो. व्यवसायात अनेकदा क्रेडिट घ्यावे लागते तसेच द्यावेही लागते त्याची नियमानुसार फेड होत असेल, तर आपोआपच तुमची विश्वासार्हता वाढते. तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी सहज उपलब्ध होऊ शकतात, त्याचे पैसे कालांतराने दिले तरी चालतात. तसेच तुम्हालाही तुमच्या ग्राहकांवर विश्वास ठेवून उत्पादित माल द्यावा लागतो. यातून व्यवसाय वृद्धी होऊन स्नेह वाढू शकतो. अनेक वित्तीय संस्था तुमच्या या कर्जाचा लेखाजोखा ठेवतात. त्यातून व्यक्ती, संस्था यांची बाजारातील पत (क्रेडिट स्कोर) तयार होत असतो.
घसारा निधी – (Depression)
जमीन वगळता सर्व स्थिर मालमत्ता म्हणजे इमारत, यंत्रसामग्री, फर्निचर, उपकरणे यांच्या किमतीत सातत्याने घट होत असते. या मालमत्ता वापरण्यास अयोग्य झाल्यावर त्याऐवजी नव्या मालमत्ता खरेदी कराव्या लागतात. यासाठी मूळ मालमत्तेच्या कमी झालेल्या मूल्याएवढी तजवीज करावी लागते, त्यास घसारा असे म्हणतात. घसारा मोजण्यासाठी सदर मालमत्ता उपयोगी पडण्याचा कालावधी, काही कालावधीनंतर मालमत्तेची विक्री केली असता येऊ शकणारी किंमत, नवीन मालमत्तेची खरेदी करण्यासाठी लागणारी सर्व रक्कम ज्यात वाहतूक खर्च, स्थापना खर्च, कर इत्यादी सर्वांचा विचार केला जातो. केवळ वस्तूच्या वापरामुळे नाही तर तंत्रज्ञानातील बदलामुळेही एखादी वापरातील वस्तू कालबाह्य होऊन नवीन वस्तू घ्यावी लागते यासाठी काही तरतूद करून ठेवावी लागते. घसारा हा खर्च समजला जाऊन तो कोणत्या वस्तूसाठी किती प्रमाणात घेतला जावा याविषयी कायद्यात असलेल्या तरतुदीप्रमाणेच रक्कम बाजूला ठेवावी लागते.
समभाग-(Shares)
व्यवसायाची उभारणी करण्यासाठी मोठे भांडवल लागते. हे भांडवल प्रवर्तक, जनता आणि बाजारातून कर्ज घेऊन उभे केले जाते. कर्जासाठी तारण ठेवावे लागते किंवा हमीदार लागतो. याशिवाय त्यावर व्याजही द्यावे लागत असल्याने देयता वाढते. याउलट प्रवर्तक, जनता, गुंतवणूक कंपन्या यांच्याकडून भांडवल गोळा केल्यास त्यामुळे देयता न वाढल्याने कमी दरात मोठी रक्कम भांडवल रूपाने उपलब्ध होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीच्या मालकांच्या मालकीचा भांडवलाचा एक भाग. यावर कोणत्याही निश्चित परताव्याची हमी नसते. दुय्यम बाजारात हे भाग विकता येतात किंवा विकत घेता येतात. त्यामुळे त्यात बऱ्यापैकी तरलता असते. कंपनीची मालमत्ता आणि दायित्वे माहिती असल्यास मालमत्तेतून दायित्वे वजा केली असता येणारी रक्कम ही त्या समभागांची एकूण रक्कम असते. कंपनी कायद्यातील या तरतुदीमुळे व्यावसायिकांना कमी खर्चात भांडवल उपलब्ध होते, तर गुंतवणूकदारांना त्यांनी स्वीकारलेल्या जोखमीच्या तुलनेत कोणत्याही अतिरिक्त देयते शिवाय आकर्षक परतावा मिळण्याची शक्यता असते.
प्रति समभाग कमाई-(Earning per share)
समभाग (शेअर्स) हा कंपनीच्या मालकीचे प्रतिनिधित्व करीत असल्याने कंपनीस झालेल्या निव्वळ नफ्यातून कर देऊन झाल्यावर प्रति समभाग किती कमाईखाली याची माहिती देणारे आर्थिक गुणोत्तर आहे. प्रति समभाग उच्च उत्पन्न मिळवणाऱ्या कंपन्यांची गणना सुदृढ कंपन्यात होते. या कंपन्या आपल्या भागधारकांना सातत्याने लाभांश, हक्कभाग आणि बोनस शेअर्स देत असतात. साहजिकच या कंपन्या आपल्याकडे असाव्यात, असे अनेकांना वाटल्याने त्यांना अधिक मागणी असते. त्यामुळेच त्यांचा बाजारभावही अधिक असतो.
प्रारंभिक भाग विक्री-(Initial Public Offer)
बाजारात प्रथमच एखाद्या खासगी कंपनीस सार्वजनिक करून शेअर्स उपलब्ध झाल्याचे आपण वाचतो या प्रक्रियेत गुंतवणूकदारांना कंपनीचे समभाग नव्याने उपलब्ध करून दिले जातात आणि अथवा प्रवर्तकांकडून काही भाग विक्रीस काढले जातात. हे भाव सममूल्याने अथवा अधिभार देऊन दिले जातात. यात अधिभार किती घ्यावा हे कंपनीने नेमलेल्या लीड मॅनेजरच्या सल्ल्याने ठरवण्यात येते. कोणत्या कंपनीने अधिमूल्य किती घ्यावे यावर सध्या कोणतेही बंधन नाही. बाजारात अस्तित्वात असलेल्या कंपनीने सर्वांसाठी शेअर्स विक्रीसाठी काढल्यास त्याला फॉलो ऑन ऑफर असे म्हटले जाते.
आयकर विवरणपत्र-(Income Tax Returns)
सर्व मार्गाने मिळालेले एकूण उत्पन्न नवीन प्रणालीनुसार तीन लाखांहून अधिक अथवा जुन्या प्रणालीनुसार वयानुसार अडीच ते पाच लाखांहून अधिक असेल तर आपल्या सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाची मोजणी म्हणजेच व्यवसाय अगर पगाराचे उत्पन्न, मिळालेले व्याज, भांडवली नफा, घरभाडे असल्यास अन्य उत्पन्न याचा लागू असलेल्या प्रकारचा तपशीलवार फॉर्म भरून विशिष्ट मुदतीत एकूण उत्पन्न जाहीर करावे लागते. त्या फॉर्मला आयकर विवरणपत्र असे म्हणतात. हा फार्म भरणे आणि कर भरणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. यामुळे आपले निश्चित उत्पन्न किती आहे यास पुष्टी मिळते, जी कर्ज घेणे, जामीन राहणे यासाठी आवश्यक आहे. हाच फार्म वेळेत भरून अधिक कापलेला कर आपल्याला परत मिळवता येतो.