पालघर (प्रतिनिधी): पालघर जिल्ह्यात शह-काटशहच्या राजकारणाला प्रचंड उधाण आले आहे.कोण कोणासोबत आहे,या विषयावर सतत चर्चा रंगू लागली आहे. पण कोणताही निर्णय दृष्टीक्षेपात येत नसल्यामुळे अनेक राजकीय नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते आता संभ्रमावस्थेत सापडले आहेत. दररोज वेगवेगळ्या अफवा पसरत असल्यामुळे प्रत्येक जण सध्या आपण काय करायचे?,अशा विवंचनेत सापडला आहे.समाजमाध्यमे मात्र या परिस्थितीचा फायदा घेत आग लावण्याचे काम करत आहेत. मुलाखती घेण्याच्या नावाखाली अनेक पत्रकार या सर्व घडामोडींना हवा देत आहेत. त्यामुळे समज व गैरसमज वाढू लागले आहेत.या सर्व घडामोडीबाबत आ.हितेंद्र ठाकूर व माजी महापौर राजीव पाटील हे दोघेही चकार शब्द बोलायला तयार नाहीत. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यानी होर्डिंग व बॅनर्सवरील दोघांचे एकत्रितपणे फोटो लावणे टाळले आहे. राजीव पाटील हे लवकरच भाजपमध्ये सामील होतील व त्यांच्यासमवेत नालासोपारा शहरातील १० ते १२ नगरसेवक देखील प्रवेश करतील,अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
गेल्या सात दिवसापासून हा धुरळा उडत असून प्रत्यक्षात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया कोणाकडूनही व्यक्त करण्यात आलेली नाही. तसेच राजीव पाटील व त्यांचे १० ते १२ माजी नगरसेवक यांचा भाजपमध्ये प्रवेश,याविषयी भाजपचे स्थानिक नेत्यापैकी एकही जण माध्यमांशी बोलायला तयार नाही. तसेच मुंबई व दिल्लीच्या राजकीय आघाडीवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.भाजपचे वरिष्ठ नेते सध्या जागावाटपाच्या कामात गुंतून पडले आहेत,त्यामुळे या विषयात ज्येष्ठ नेते लक्ष घालत नसल्याचे स्पष्ट होत आहे.निर्णय सतत लांबणीवर पडत असल्यामुळे कार्यकर्ते मात्र विमनस्क अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे.