प्रत्येक विधानसभा मतदार संघात १५ महिला मेळावे घेण्याचे कार्यकर्त्यांना निर्देश
मुंबई : मागील दोन वर्षांत महायुती सरकारने सर्वच जाती धर्माच्या लोकांना न्याय देणा-या योजना राबवल्या. याउलट अडीच वर्षात ते केवळ अडीच दिवस मंत्रालयात गेले. अडीच वर्षात त्यांनी कोविड काळात खिचडी घोटाळा, बॉडीबॅग आणि कोविड सेंटरमध्ये घोटाळा केला. रस्त्यांच्या डांबरामध्ये पैसे खाल्ले. अडीच वर्षात त्यांनी खंडणीसाठी उद्योगपतींच्या घराखाली स्फोटकं ठेवण्याचे काम केले. ज्यांनी बॉम्ब ठेवले त्यांना पाठिशी घालण्याचे काम केले. कोरोना काळात लोकांना मरणाच्या दारात सोडून स्वत: घरात बसून राहिले, अशी सडकून टीका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उबाठावर केली. शिवाजी मंदीर येथे पार पडलेल्या शिवसेना पदाधिका-यांच्या बैठकीनंतर खासदार डॉ. शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या बैठकीत खासदार डॉ. शिंदे यांचा महिला योजनांवर विशेष भर होता. प्रत्येक विधानसभेत १५ महिला मेळावे आयोजित करावेत. पुढील एक महिना डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं असून सरकारची कामे तळागाळातील लोकांपर्यंत, प्रत्येक समाजापर्यंत पोहोचवा. असे आवाहन त्यांनी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी केले. ते पुढे म्हणाले की, मागील दोन वर्षात महायुतीचे काम पाहता पूर्ण पाच वर्षात किती होईल, याची कल्पना करा. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना करत आहे. मागील दोन वर्षात राज्याच्या कानाकोप-यातून विविध पक्षांचे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत शिवसैनिकाला न्याय दिला जातो. आपल्याला खूर्चीचा वारसदार व्हायचं नसून सामान्य शिवसैनिक म्हणून काम करायचं आहे, असे खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, मागील दोन वर्षात महायुती सरकारने लोकांसाठी रेकॉर्डतोड निर्णय घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मोफत गॅस सिलिंडर, शेतक-यांना मोफत वीज दिली. कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मेट्रो तीन सारखे रखडलेले प्रकल्प पूर्ण केले. मुंबईकरांसाठी टोल माफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आज ‘एफडीआय’, इन्फ्रास्ट्रक्चर, स्टार्टअप्स आणि उद्योगात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांनी अडीच वर्षात केवळ अडीच कोटी खर्च केले, महायुतीमध्ये ३५० कोटी खर्च झाले. प्रत्येक तालुक्यात संविधान भवन आपण बनवतोय. अनुसूचित जाती आणि बौद्ध समाजासाठी काम करणा-या संस्थांना १० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला, अशी माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.
वरळीत तीन तीन आमदार असून देखील वरळीत विकास झाला नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना गरीबांची किंमत कळणार नाही, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकास कामे आणि कल्याणकारी योजनांसाठी दिल्लीला जातात, तुमच्या सारखे ‘मलाच मुख्यमंत्री करा’ असं बोलायला जात नाही, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. विरोधकांनी लोकसभेला एकवेळा फेक नरेटिव्ह पसरवला. प्रत्येकवेळी खोटं बोलून तुम्ही लोकांची दिशाभूल करु शकत नाहीत हे हरियाणामधील जनतेने दाखवून दिले. कुठलं सरकार आपल्यासाठी काम करते हे महाराष्ट्रातील लोकांना माहित आहे, असे ते म्हणाले. सरकारने प्रत्येक जाती धर्मासाठी काम केले, विरोधकांप्रमाणे मतांचे धुव्रीकरण करत नाहीत, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.