शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची घणाघाती टीका
नाना पटोले यांची मविआ बैठकीतून हकालपट्टी
मविआसाठी मुख्यमंत्रीपद म्हणजे संगीत खुर्चीचा खेळ
मुंबई : महाविकास आघाडी म्हणजे सत्तापिपासू लोकांची टोळी असून मुख्यमंत्रीपदासाठी ते एकमेकांना लाथाळ्या मारु लागलेत. महाविकास आघाडीच्या बैठकीतून काँग्रेसचे नाना पटोले यांची हकालपट्टी झाली असून मुख्यमंत्रीपदासाठी मविआच्या तिन्ही पक्षांमध्ये गँगवॉर सुरु झाल्याची घणाघाती टीका शिवसेना आमदार व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी केली. महाविकास आघाडीसाठी मुख्यमंत्रीपद म्हणजे संगीत खुर्ची खेळ सुरु असल्याचा टोला डॉ. कायंदे यांनी लगावला.
डॉ. कायंदे पुढे म्हणाल्या की, राज्यात मागील काही महिन्यांपासून ‘मला मुख्यमंत्री करा’ हे नाटक काहीजण करत आहेत. या नाटकाचे दिल्लीत देखील प्रयोग झाले पण काही उपयोग झाला नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना घरात बसून फेसबुक लाईव्ह केले. या काळात केवळ दोन वेळा मंत्रालयात गेले आणि आता तेच लोक मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा म्हणून दिल्लीत काँग्रेसच्या दारी फे-या मारत आहेत, अशी टीका डॉ. कायंदे यांनी केली. काँग्रेस आणि शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करण्यास नकार दिल्याने उबाठाची कोंडी झाली आहे. उबाठाने नाना पटोलेंविरोधात दिल्लीत तक्रार केली आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते सक्षम नाहीत, असे सांगून राऊत यांनी महाविकास आघाडीला सुरुंग लावला, असे डॉ. कायंदे म्हणाल्या. मविआच्या बैठकीतून नाना पटोलेंची हकालपट्टी झाली त्यामुळे आजच्या मविआच्या पत्रकार परिषदेत उबाठा आणि काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले, असे त्या म्हणाल्या.
शरद पवारांनी जयंत पाटील यांचे नाव सुचवले आहे. काँग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वड्डेटीवार, बाळासाहेब थोरात असे इच्छुक आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार, काँग्रेस आणि उबाठा अशा तिन्ही पक्षांतील किमान डझनभर नेते गुडघ्याला बाशिंग बांधून असून त्यांनी संगीत खुर्चीचा खेळ केला असा टोला डॉ. कायंदे यांनी लगावला.
जागा वाटपात डावलेले जात असल्याने समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्षाने देखील महाविकास आघाडीवर उघड नाराजी व्यक्त केली. सांगोल्यातील शेकाप नेत्यांनी उबाठाला इशारा दिला. समाजवादी पक्षाचे नेते अबु असीम आझमी यांनी गृहित धरु नका, असा इशारा महाविकास आघाडीला दिलाय. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसलेल्या महाविकास आघाडीत लवकरच बिघाडी होईल, असे डॉ. कायंदे म्हणाल्या.