बाधितांचा आकडा हजारावर, १७ दिवसांतच ६६ नवे रुग्ण
नाशिक : पावसाळा संपल्यानंतरही डेंग्यूचा (Dengue) प्रकोप कायम असून, सातपूर विभागातील पाच वर्षीय बालकाचा रविवारी डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली. खासगी रुग्णालयाच्या अहवालानुसार, या बालकाला डेंग्यूचे निदान झाले होते. त्यामुळे वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला असून, वैद्यकीय विभागाच्या पथकाने या बालकाच्या घरी धाव घेत परिसरात औषध, तसेच धूरफवारणी केली. दरम्यान ऑक्टोबरच्या १७ दिवसांतच डेंग्यूचे ६६ नवे रुग्ण आढळले असून, बाधितांचा एकूण आकडा १,०३८ वर पोहोचला आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात डेग्यू, स्वाइन फ्लु, चिकनगुनियासारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. जूनपासून डेंग्यू आजाराचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मेमध्ये या आजाराचे तब्बल ३३ नवे रुग्ण आढळले होते. जूनमध्ये डेंग्यूचे १६३ नवे रुग्ण आढळले, तर जुलैमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर या आजाराचे विक्रमी ३०७ रुग्ण आढळले होते. पावसाच्या पाण्याची ठिकठिकाणी साचलेली डबकी या आजाराच्या उद्रेकास कारणीभूत ठरली.
ऑगस्टमध्ये डेंग्यूचे १९८ नवे रुग्ण आढळले, तर सप्टेंबरमध्येही या आजाराची लागण झालेल्या नवीन रुग्णांचा आकडा १९८ इतकाच होता. पावसाळा आता परतीच्या मार्गावर असताना डेग्यूचा उद्रेक मात्र कायम राहिला आहे. २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरदरम्यान डेंग्यूचे ६६ नवे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे एक जानेवारी ते १४ ऑक्टोबर या कालावधीतील डेंग्यू बाधितांचा एकूण आकडा आता १,०३८ वर पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा डेंग्यूचा उद्रेक अधिक पाहायला मिळत आहे.