महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे आणि त्यात बिघाडी होणारच आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावात गेले होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौऱ्याच्या धावपळीतसुद्धा गाईंच्या गोठ्यात जाऊन तेथील गाईंना चारा खायला घातल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, ”देवाला काही मागावं नाही लागत, दडवाला सगळं माहित आहे. बळिराजाला चांगले दिवस येऊ देत असं मागणं मागतो. बळिराजाचा सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार आहे. महाराष्ट्रातील लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्या आहेत. महाविकास आघाडीची अडिच वर्षांची कारकिर्द आणि महायुतीची दोन ते सव्वादोन वर्षांची कारकिर्दची तुलना तुम्ही कराच. जनतेच्या समोर जातोय दुध का दुध पाणी का पाणी आता जनताच करेल. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता महायुतीला पोहोच पावती देईल. आता महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कोणाला किती जागा मिळणार आहेत हे दोन दिवसांत ठरेल. सगळ्या गोष्टी सन्मानानं होतील. मुख्यमंत्रीपदासाठी विरोधकांकडे सगळे गल्लीत आणि दिल्लीत फिरत आहेत. महाविकास आघाडी ही फक्त स्वार्थासाठी झालेली आघाडी त्यात बिघाडीच होणार आहे. बाळसाहेबांचे विचार त्यांनी सोडले आहेत, त्यांना पराभव दिसत आहे त्यामुळे आता त्यांना सगळ्यात घोळ दिसत आहे, अशी टीका शिंदेनी केली आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या पक्षाने ठरवावं मुख्यमंत्री कोण हा त्यांचा अधिकार आहे. महायुतीलाच जनतेचा कौल असल्याने त्यांनी आता विरोधी पक्ष नेत्याचा उमेदवार ठरवायला हवा. आमच्यात कोणताच वाद नाही आम्ही आमच्या कामाला आणि विकासाला महत्व देतो. मी कॉमन मॅन मुख्यमंत्री आहे. जनता आम्हाला आमच्या कामाची पोचपावती देईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.